वाणिज्य शाखा संधींची खाण | पुढारी

वाणिज्य शाखा संधींची खाण

आपल्यातल्या अनेकांना विशेषत: विज्ञान शाखेतल्या संधींविषयी बर्‍यापैकी माहिती असते, त्याविषयी चर्चाही बरीच होताना दिसते, पण वाणिज्य शाखा गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने विकसित होत आहे, त्यामानाने त्याबद्दल महाविद्यालयीन युवक-युवतींना माहिती मात्र पुरेशी नसल्याचेच दिसून येते. कॉमर्स म्हणजे फक्त ‘गणित’ असा समज अनेक विद्यार्थी-विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेला दिसतो. कॉमर्समध्ये गणित हा अनेक विषयांपैकी एक विषय असतो. त्यामुळे ‘माझं गणित चांगलं आहे म्हणून मी कॉमर्स निवडतो’असं करू नका आणि दुसरीकडे ‘आपल्याला गणित आवडतच नाही, त्यामुळे नको त्या कॉमर्सच्या वाटेला जायला’, अशीही भूमिका घेऊ नका.

खरंतर, जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यवसाय व व्यवहाराचे स्वरूप बदलल्याने वाणिज्य शाखाही अर्थातच अधिक विकास पावली आहे. अभ्यासविषय बदलले आहेत. त्यातून या विद्याशाखेतील करिअरच्या संधीही वाढल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीनंतर आपल्या अभ्यासाचा मार्ग ठरवण्यापूर्वी या नानाविध संधी समजून घेणे हिताचे ठरेल.

कॉमर्समधील बेसिक पदवीसोबत आता अकाऊंटिंग आणि फायनान्समधील बीएएफ, बँकिंग आणि इन्शुरन्समधले बीबीआय व फायनान्शिअल मार्केटिंगचं बीएफएम हे पदवीच्या पातळीचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत.

वाणिज्य शाखेचा अभ्यास करून बँकिंग क्षेत्रात जाण्यासाठी बीबीआय हा उत्तम पर्याय आहे आणि त्यात पुढे स्पेशलायझेशन करता येते.
वाणिज्य शाखेतील स्पेशलायझेशनसाठी अर्थशास्त्र, अकाऊंटिंग, फायनान्स, टॅक्सेशन, इ-कॉमर्स, बिझनेस लॉ, विमा, बिझनेस मॅनेजमेंट, ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

भारतासारख्या लोकशाही देशात उत्तम कायदा व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कायदा या विषयात चांगलं करिअर करता येतं. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. कंपनी लॉ, लेबर लॉमध्ये स्पेशलायझेशनच्या संधी आहेत. बारावीनंतर पाच वर्षं किंवा पदवीनंतर तीन वर्षांचा कोर्स आहे. त्याचबरोबर कामगार कायदा, बौद्धिक संपदा कायदा, करविषयक कायदे, बँकांचे कायदे, सायबरविषयक कायदे असे काही दूरस्थ शिक्षणाचे अभ्यासक्रमही आहेत.

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए अभ्यासक्रम खूप महत्त्वाचे आहेत. अकाऊंटसमध्ये करिअर करायचं असेल तर चार्टर्ड अकाऊंट आणि कॉस्ट अकाऊंट हे दोन पर्याय उत्तम. तसंच कंपनी कायद्यातील प्रावीण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हा कोर्सही उपलब्ध आहे. या कोर्सेसमध्ये प्रवेश करणं जरी सोपं असलं तरी तो पूर्ण करून बाहेर पडणं कठीण आहे हे लक्षात घेऊन त्याद़ृष्टीने प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे.

बीएएफ, बीबीआय, बीएफएम यासारखे कोर्स निवडून सहजरित्या सीए, सीएस, एमबीए होता येईल असे अनेकांना वाटत असते पण ते काही खरं नाही. त्यात यश मिळवण्यासाठी त्या त्या संदर्भातील प्रोफेशनल कोर्सचा वेगळा अभ्यास करावाच लागतो.

सीए, सीएस, आयसीडब्लूए, सीएफए यांसारख्या महत्त्वाच्या प्रोफेशनल अभ्यासक्रमात यश मिळविण्यासाठी हुशारीपेक्षाही जिद्द, अथक परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असणं आवश्यक आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

सत्यजित दुर्वेकर

Back to top button