भूलतज्ज्ञ : वैद्यकीय क्षेत्रात करिअर एक उत्तम पर्याय - पुढारी

भूलतज्ज्ञ : वैद्यकीय क्षेत्रात करिअर एक उत्तम पर्याय

प्रांजली देशमुख

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांसाठी भूलशास्त्र अर्थात अ‍ॅनेस्थेशियॉलॉजी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी चांगल्याच वाढल्या आहेत. शस्त्रक्रियेच्या काळात वेदना होऊ नयेत याकरिता रुग्णाला भूल दिली जाते. भूल देणार्‍या व्यक्तीला वैद्यकीय शास्त्रात अ‍ॅनेस्थेशियॉलॉजिस्ट/ भूलतज्ज्ञ असे म्हणतात.

भूलतज्ज्ञाचे काम केवळ भूल देण्यापुरते मर्यादित नसते. रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा करणे, गरज भासल्यास अतिदक्षता कक्षात (आयसीयू) दाखल करणे आदी कामे भूलतज्ज्ञाला करावी लागतात. अतिदक्षता कक्षातील रुग्णांना वेगवेगळे उपचार देण्यासाठी डॉक्टरांबरोबरच भूलतज्ज्ञाचीही गरज असते.

अलीकडच्या काळात मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्ये देखील रुग्णालयांची संख्या वाढू लागली आहे. यापुढील काळात महानगरांमध्ये तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णालयांची संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे भूलतज्ज्ञांना असणारी मागणीही वाढणार आहे. हे लक्षात घेऊन या क्षेत्रात करिअर करणे फायदेशीर ठरेल, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

* आवश्यक पात्रता :

भूलतज्ज्ञ बनण्यासाठी बी.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅनेस्थेशियॉलॉजी या विषयासाठी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भूलतज्ज्ञ म्हणून काम करता येते.

* नोकरीच्या संधी कोठे आहेत?

भूलतज्ज्ञांना खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात. भूलतज्ज्ञाला कार्डिऑलॉजी, क्रिटिकल केअर मेडिसीन, इंटरनल मेडिसीन, फार्माकॉलॉजी आणि सर्जरी या विषयांचाही अभ्यास करावा लागतो. तसेच, न्यूरो सर्जरी, कार्डिक अ‍ॅण्ड थोरेसिस सर्जरी, मॅक्सिलोफेसियल सर्जरी आदी विषयातही स्पेशलायझेशन करता येते.

* हेही लक्षात घ्या :

भूलतज्ज्ञाला वेगवेगळी चर्चासत्रे, परिसंवाद, नवा अभ्यासक्रम यांद्वारे आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. या पदावर काम करणार्‍या व्यक्तीचा स्वभाव शांत असावा लागतो. रुग्णांची काळजी घेणे, त्याच्या वेदनांची दखल घेणे अशा प्रकारची संवेदनशीलता त्याने दाखवावी लागते. तसेच, दीर्घकाळ काम करण्याची तयारी त्याला दाखवावी लागते.

या नोकरीकरिता वेळेचे बंधन नसते. आणीबाणीच्या प्रसंगात शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा स्वभाव असावा लागतो. याखेरीज संगणक आणि इतर तंत्रज्ञानावर प्रभुत्त्व मिळवणे आवश्यक आहे. आयआरसीयू, पेन क्लिनिंग, अ‍ॅक्सिडेंट रेस्क्यू, डिझास्टर मॅनेजमेंट अशा वेळवेगळ्या कामांत भूलतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची असते.

अ‍ॅनेस्थेशियॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यावे लागते. अ‍ॅनेस्थेशियाच्या उपकरणांची देखभाल करण्याचे काम अ‍ॅनेस्थेशिया टेक्निशियन करीत असतो.

* वेतन

खासगी तसेच सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांत भूलतज्ज्ञांना चांगले वेतन दिले जाते. या क्षेत्रात भरपूर अनुभव असेल तर व्यावसायिक पद्धतीनेही काम करता येते. काही भूलतज्ज्ञ तासावर मानधन घेतात.

Back to top button