करिअर : इंजिनिअर न होता ‘आयटी’त काम करा, जाणून घ्या अधिक | पुढारी

करिअर : इंजिनिअर न होता 'आयटी'त काम करा, जाणून घ्या अधिक

करिअरमध्ये होणार्‍या बदलाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत असून ते बदल आपल्याला दिसत आहेत. पालकही पाल्यांच्या करिअरबाबत किंवा शिक्षणाबाबत जागरूक असले तरी डॉक्टर किंवा इंजिनिअरच व्हायचंय, हा पारंपरिक हट्ट आता सोडून देताना दिसून येत आहे.

शिक्षणात आणि करिअरमध्ये झालेल्या व्यापक बदलाने मुलांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मग संगीत असो किंवा माहिती आणि तंत्रज्ञान असो. याबाबत प्रशिक्षण देणार्‍या आणि नोकरी देणार्‍या असंख्य संस्था, कंपन्या निर्माण होत असल्याने कुशल मनुष्यबळाची दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे.

करिअरसाठी 250 पर्याय :

आज वाढती स्पर्धा आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे करिअरच्या नवनवीन वाटा निर्माण होत आहेत. देशातील पंधराहून अधिक मोठ्या उद्योगात करिअरचे अडीचशे पर्याय आहेत. आर्टस्, कॉमर्स, सायन्स फॅकल्टीतील मुलांना या कंपन्यात कोणता ना कोणता जॉब उपलब्ध आहे.

बारावीनंतर एमबीए करा :

बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमबीए प्रोग्रॅम देणारी आयआयएम इंदोर ही पहिली संस्था होय. या अभ्यासक्रमाला इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट म्हणजेच आयपीएम असे म्हटले जाते. हा एक युनिक क्रिएटिव्ह प्रोग्रॅम आहे. यासाठी किमान बारावी उत्तीर्ण किंवा तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

गणित किंवा विज्ञानाशिवाय आयआयटी :

आयआयटी मद्रास येथे पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमए अभ्यासक्रम दोन विषयांसाठी उपलब्ध आहेत. डेव्हलपमेंट स्टडीज आणि इंग्लिश स्टडीज असे ते अभ्यासक्रम होत. यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

ऑडिओ व्हिज्युअल, फिल्ममेकिंग, प्रॉडक्शन, फोटोग्राफी :

चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्रीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच पडद्यामागे काम करणार्‍या असंख्य कुशल तंत्रज्ञानदेखील असते. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन किंवा सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी या संस्थेत ऑडिओ व्हिज्युअल आणि बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्टस् आणि फोटोग्राफीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि विस्लिंग वूडस इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) या संस्था फिल्ममेकिंग, म्युझिक प्रॉडक्शन, स्क्रिन रायटिंग, साऊंड एडिटिंग अँड डिझाईन, आर्ट डायरेक्शन, प्रॉडक्शन डिझाईन यांसारखे असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

कम्बाईन फॅशन अँड सायन्स :

एनआयएफटी, व्हीआयटी यांसारख्या महाविद्यालयातून फॅशन टेक्नॉलॉजीसंदर्भात पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फॅशन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यासंबंधीचे शिक्षण घेऊन आपण करिअर करू शकतो. मोठमोठ्या टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये अशा अभियंत्याची मोठी मागणी आहे.

इंजिनिअर न होता आय. टी.त काम करा :

भारतात सध्या आय.टी. क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरत आहे. यूएक्स डिझायनर, इंटराक्शन डिझायनर, कंटेट रायटर, एचआर यांसारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी अभियंता असण्याची गरज नाही. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांत मनुष्यबळ खात्यात तज्ज्ञांची नेहमीच मागणी राहिलेली आहे. मुख्य प्रवाहात असलेल्या इंजिनिअरच्या समकक्ष सुविधा आयटीमध्ये अन्य क्षेत्रांत काम करणार्‍या कर्मचार्‍याला दिली जाते. या माध्यमातून ग्लोबल करिअरचा देखील मार्ग खुला होतो. कंपनीच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी आपल्याला हे क्षेत्र बहाल करते.

अपर्णा देवकर

Back to top button