स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग करिअर | पुढारी

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग करिअर

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा या ‘सायबर फिजिकल’ सिस्टिम्स म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माहितीचा संचय करून विश्लेषणाद्वारे टिकाऊ, उत्पादनक्षम व सुरक्षित अशा सुविधा निर्माण करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सन 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत स्मार्ट शहरे अभियान सुरू केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी 72 लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या अभियानांतर्गत पाच फेर्‍यांमध्ये एकूण शंभर शहरांची निवड करण्यात आली असून, ही शहरे क्षेत्र विकास आराखड्यानुसार श्रेणीसुधारित केली जातील. या स्मार्ट सिटी मिशनमध्ये महाराष्ट्र राज्यातून पुणे आणि पिंपरी- चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्प सुरू होऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत आणि आता काही शहरांमध्ये बदल दिसून येत आहेत. सर्वोत्तम पद्धती, माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शहर आणि शहरातील लोकांचे जीवनमान सुधारणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.

स्मार्ट सिटीचा कणा हा पायाभूत सुविधांच्या आर्थिक, सामाजिक, संस्थात्मक आणि भौतिक या चार स्तंभांवर आधारित आहे. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी स्मार्ट बिल्डिंग, स्मार्ट एनर्जी, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, स्मार्ट हेल्थ आणि स्मार्ट डिजिटल लेयर्स या मूलभूत फ्रेमवर्कची आवश्यकता आहे. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्मार्ट शहरांशी संबंधित वरील सर्व गोष्टींशी पाया प्रदान करते.

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा या ‘सायबर फिजिकल’ सिस्टिम्स म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माहितीचा संचय करून विश्लेषणाद्वारे टिकाऊ, उत्पादनक्षम व सुरक्षित अशा सुविधा निर्माण करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. साधारणतः माहिती, विश्लेषण व त्यावर आधारित बदल व सद्यःस्थिती आणि भविष्यातील गरजांची पूर्तता करण्याची क्षमता या चार तत्त्वांवर या सुविधा आधारित असतात. या सुविधा पुरविण्यामागे स्थापत्य अभियांत्रिकीचा मोठा सहभाग आहे.

लेबरचा खर्च कमी करण्यासाठी आणि उद्योगामध्ये अचूकता वाढविण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सहयोगी रोबोट्स, स्वायत्त उपकरणे, ड्रोन आधारित तपासणी आणि लेझर-आधारित भूप्रदेश मॅपिंग, मॉड्युलर बांधकामातील नॅनो मटेरियल्स आणि 3-डी प्रिंटिंग असे सध्याचे ट्रेंड विकसित आहेत. आता स्थापत्य अभियंते व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर), बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (बीआयएम), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), 3-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आदींसारख्या संगणकीय तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करताहेत.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वीच नियोजित बांधकामात पाऊल टाकण्याचा आभासी अनुभव प्रदान करते. हे प्रकल्पाच्या कामाच्या बांधकामापूर्वी उद्भवणार्‍या संभाव्य समस्या देखील ओळखू शकते. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी सिव्हिल इंजिनिअर्सना डिझाईन स्पेसिफिकेशन्स, आरोग्य आणि सुरक्षा चेतावणी आदींशी संबंधित उपयुक्त माहिती पुरवते.

सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काळानुरूप झालेले बदल, आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर आणि भविष्यवेधी बदलांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा पाया मजबूत करण्यासाठीचा प्रयत्न आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव जगातील सिव्हिल इंजिनिअरिंगमधील आव्हाने सोडविण्यासाठी नावीन्य कल्पना, गुंतागुंतीची संरचना विकसित करण्यासाठी आणि संशोधनांचा पाठपुरावा करण्याच्या द़ृष्टीने परिपूर्ण संधी मिळेल.

– प्रा. डॉ. गणेश इंगळे

Back to top button