स्पर्धा परीक्षेतील बदलांना सामोरे जाताना… | पुढारी

स्पर्धा परीक्षेतील बदलांना सामोरे जाताना...

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातही काही कालावधीनंतर बदल केले जातात आणि तसे होणेदेखील स्वाभाविकच आहे. बदलणारी समाजरचना, गरजा व इतर विकासात्मक धोरण निर्मिती या सर्वांचा विचार करता सक्षम अधिकारी वर्ग निवडणे हे एक मोठे आव्हान असते. अधिकाधिक कार्यक्षम अधिकारी निवडीसाठी हे बदल केले जातात. काही दिवसांपूर्वी MPSC ने परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले. या बदलांपैकी राज्यसेवा परीक्षा ही नेहमीप्रमाणेच तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. मात्र, या टप्प्यांमध्ये नेमके बदल काय आहेत, हे समजून घेऊ.

टप्पा 1 – पूर्व परीक्षा

या टप्प्यामध्ये दोन पेपरचा समावेश आहे. ज्यामध्ये पेपर क्र. 1 ः 200 गुणांसाठी असून तो अनिवार्य प्रकारात आहे. म्हणजे या पेपरचे गुण पूर्व परीक्षेच्या निकालासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजेच उमेदवाराने या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करणे गरजेचे असते.

पेपर क्र. 2 : ज्याला आपण CSAT असे म्हणतो ती आता बदलानुसार पात्रता पेपर असेल. म्हणजे या पेपरमध्ये उमेदवाराला किमान 33% गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. या पेपरचे गुण पूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
वरील दोन्ही पेपर हे वस्तुनिष्ठ (MCQ) स्वरूपाचे आहेत.

टप्पा 2 – मुख्य परीक्षा

जे उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी पुढील टप्पा हा मुख्य परीक्षेचा असेल. मुख्य परीक्षा ही संपूर्णपणे वर्णनात्मक स्वरूपाची करण्यात आली आहे. हा मोठा बदल मुख्य परीक्षेमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी मात्र ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती. ती आता बदलण्यात आली आहे. यासाठी एकूण नऊ पेपर्स असून 1750 गुणांसाठी परीक्षा होते. याचे पेपर्स पुढीलप्रमाणे असतील.

पेपर क्र. 1 – मराठी पेपर हा वर्णनात्मक स्वरूपाचा असून तो 25% गुणांसह पात्रता पेपर असेल. म्हणजेच यामध्ये 300 गुणांपैकी किमान 75 गुण पाडणे अनिवार्य असेल. यामधून मराठी भाषेचे ज्ञान व कौशल्ये तपासली जातील.

पेपर क्र. 2 – इंग्रजी पेपर हा वर्णनात्मक स्वरूपाचा असून तो 25% गुणांसह पात्रता पेपर म्हणजेच एकूण 300 पैकी किमान 75 गुण मिळविणे बंधनकारक असेल. यामधून इंग्रजी भाषेचे ज्ञान व कौशल्ये तपासली जातील.

वरील दोन्ही पेपर्सचे गुण हे अंतिम निवडीसाठीच्या गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. त्या पेपर्समध्ये फक्त उमेदवाराने 25% पात्र असावे.

पेपर क्र. 3 ते पेपर क्र. 7 हे अनुक्रमे निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 व सामान्य अध्ययन 4 असे असून सर्व पेपर्स हे वर्णनात्मक स्वरूपाचे असून त्यासाठी प्रत्येकी 3 तास कालावधी असेल. सर्व प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील याचे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील.

पेपर क्र. 8 व 9 – हे अनुक्रमे वैकल्पिक विषय 1 व 2 असे असून, उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या विषयांपैकी विषय निवडून हे पेपर्स देणे बंधनकारक आहे. सदर पेपर्स हे प्रत्येकी 250 गुणांसाठी 3 तास कालावधीत वर्णनात्मक स्वरूपात सोडविणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे मुख्य परीक्षेमधील पेपर क्र. 1 व 2 हे पात्रता तर पेपर क्र. 3 ते 9 हे आवश्यक पेपर्स असतील.

टप्पा 3 मुलाखत/ Interview

सदर टप्प्यामध्ये उमेदवाराचे पुस्तकी ज्ञान न तपासता इतर कौशल्ये तपासल्यावर भर दिला जातो. प्रस्तुत टप्पा हा एकूण 275 गुणांसाठी घेण्यात येतो.

अशाप्रकारे मुख्य परीक्षेमधील पेपर क्र. 3 ते 9 असे एकूण 7 पेपर्स प्रत्येकी 250 गुणांसाठी म्हणजे एकूण 1750 गुण व मुलाखतीमधील एकूण 275 गुण असे सर्व मिळून 2025 गुणांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते व अंतिम निकाल प्रसिद्ध केला जातो.

Back to top button