डिझायनिंगच्या वाटांवर… | पुढारी

डिझायनिंगच्या वाटांवर...

डिझाईन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ कलात्मकताच अंगी असून, चालत नाही. या क्षेत्रातील विविध करिअरवाटा चोखाळताना कुशाग्रबुद्धी, उत्तम संवाद कौशल्य आणि टीमवर्कचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

ज्वेलरी डिझायनिंग : ‘असोचेम’च्या एका अहवालानुसार, रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगात भारतात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. अलीकडच्या काळात विविध डिझाईनचे दागिने तयार करणार्‍या संस्थांची संख्या वाढली आहे. भारतात अमृतासिंह, पूनम सोनी, फराह खान, अल्पना गुजराल आदी प्रमुख दागिन्यांचे डिझायनर होत.

अभ्यासक्रम / प्रशिक्षण : कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. डिझायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे हे सर्वसाधारणपणे मुलाखतीवर अवलंबून असते. काही प्रकरणात अतिरिक्त अ‍ॅपिट्यूटड टेस्टदेखील द्यावी लागते. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जेमकट, सोर्टिंग, दागिन्यांचे डिझाईन, स्टोट सेटिंग, फॅब्रिकेशन आदींसंबंधित तांत्रिक कौशल्य शिकवण्याचे काम करते.

करिअरच्या संधी : दागिन्यांचे डिझायनर, फॅशनेबल ज्वेलर,
जेमोलॉजिस्ट आणि सीएडी डिझायनर.

फॅशन डिझायनिंग : फॅशन, कपडे, ट्रेंड, रंगाबाबत आपल्याला आवड असेल, तर फॅशन उद्योग निश्चितच आपल्या करिअरला पूरक ठरू शकतो. या उद्योगात अनेक प्रकारच्या करिअरचे पर्याय आहेत. जसे की, अ‍ॅक्सेसरी डिझायनिंग, फॅशन स्टायलिस्ट, वॉर्डरोब डिझायनर आदी. हे क्षेत्र युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे. भारताच्या आघाडीच्या फॅशन डिझायनरमध्ये मनीष मल्होत्रा, मसाबा गुप्ता, नीता लुला, सव्यासाची, अ‍ॅश्ले रुबेलो यांचा समावेश होतो.

अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण : फॅशन उद्योगात करिअर करणारे विद्यार्थी बारावी पूर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी स्वत: अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर फॅशन डिझायनिंगच्या पदवी आणि अन्य क्षेत्राच्या पदवीधर फॅशनच्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळण्याबरोबरच पदव्युत्तर पदवी मिळवू शकतात.

करिअरच्या संधी : फॅशन डिझायनर, फॅशन कॉर्डिनेटर, फॅशन सल्लागार, टेक्निकल डिझायनर, सीएडी डिझायनर आणि फॅशन जर्नालिस्ट.

फुटवेअर डिझायनिंग ः जर फॅशन, ग्लॅमर, स्टाईल आपल्याला आकर्षित करत असेल, तर फुटवेअर डिझायनिंगमध्ये करिअर करू शकता. जिमी चू, फेरोगामीसारखे आंतरराष्ट्रीय ब्रँडस् देशात लोकप्रिय होत आहेत. भारताच्या आघाडीच्या फुटवेअर डिझायनरमध्ये नुपूर नागपाल, आकाश साकिया, नमह शहा, वृंदा गुप्ता आदींचा समावेश आहे.

अभ्यासक्रम / प्रशिक्षण : फुटवेअर, लेदर गुड, अ‍ॅक्सेसरीज डिझायनिंग किंवा फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवीला प्रवेश घेऊ शकतो. करिअरच्या संधी : फुटवेअर डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा मार्केटिंग विभाग.

टेक्सटाईल डिझायनिंग : भारतात टेक्सटाईल डिझायनरला पेहराव आणि फर्निंशिंग क्षेत्रात डिझाईन करावे लागते. ते आपल्या विचारातून रफ स्केच साकारतात आणि त्याला तांत्रिक रूपाने वैशिष्ट्य प्रदान करतात. जेणेकरून त्याला मशिन, लूम किंवा प्रिंटिंग टेबलवर ठेवता येईल. भारतातील प्रमुख टेक्सटाईल डिझायनरमध्ये डी. व्ही. गज्जर, राहुल जैन, मीरा मेहता आणि जदुनाथ सुपकर यांचा समावेश होतो.

अभ्यासक्रम / प्रशिक्षण : बहुतांश मोठ्या शहरांत पॉलिटेक्निक आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत.

करिअरच्या संधी : टेक्सटाईल उद्योग, स्वतंत्र व्यवसाय.

Back to top button