एक्झिबिशन डिझायनिंगमधील करिअरवाट | पुढारी

एक्झिबिशन डिझायनिंगमधील करिअरवाट

एखाद्या एक्झिबिशनसाठी ‘एक्झिबिशन डिझायनर’चे पहिले काम हे प्रदर्शनाचे नियोजन करणे, बजेट तयार करणे, टीमसमवेत समन्वय राखणे आणि प्रदर्शनाची आखणी, सजावट व मांडणी करणे होय. सध्या करिअर म्हणून एक्झिबिशन डिझायनर म्हणून युवकांसाठी चांगली संधी आहे.

सध्याच्या काळात विविध उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. म्हणूनच बाजारात आपले उत्पादन स्थिरावण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी त्याचे प्रदर्शन करावे लागते. जर आपण व्यक्‍तिगत पातळीवर एखाद्या उत्पादनाचा प्रसार करण्याची मोहीम हाती घेतली तर त्यात बराच वेळ आणि पैसा जाण्याची शक्यता असते. तसेच अपेक्षित परिणामही हाती लागत नाही. अशा स्थितीत ट्रेड, फॅशन, टूरिझम, हेरिटेज, टेक्नॉलॉजी आदीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी लाखो ग्राहकांचे लक्ष वेधून घेता येते. तसेच उत्पादन खरेदीसाठी ग्राहकांना प्रेरितही करता येते.

आर्ट गॅलरी, मार्केट प्लेस, मॉल, एक्स्पो आदी ठिकाणी आयोजित होणार्‍या प्रदर्शनाची मांडणी करण्याचे काम एक्झिबिशन डिझायनर करतात. प्रदर्शन सुरू करण्यापूर्वी त्याचा कालावधी, बजेट, समन्वय, मांडणी, रचना, सजावट याचे आकलन करावे लागते. प्रदर्शनाचे उद्देश आणि टार्गेट ऑडियन्स कोणते आहे, हे देखील एक्झिबिशन डिझायनरला पाहावे लागते. याशिवाय एक्झिबिशन डिझायनर हा आपल्या ग्राहकांची मानसिकता ओळखूनच आपले उत्पादन आकर्षकरीत्या सादर करण्याबाबत सजग असतो. एक्झिबिशन डिझायनर हा ग्राहकांशी संवाद साधून उत्पादनाचे महत्त्व पटवून देतो. प्रसंगी डेमोही सादर करतो. यावरून संबंधित उत्पादनाचे महत्त्व ग्राहकाला पटण्यास हातभार लागतो.

एक्झिबिशनची तयारी करताना एक्झिबिशन डिझायनर हा आयोजकांशी संवाद साधतो. प्रदर्शनाचे स्वरूप, आकार, खर्च, रचना याची माहिती देतो. यासाठी तो ड्रॉईंग किंवा स्केल मॉडेलचा प्रयोग करून डिझाइन सादर करतो. यानंतर आपल्या टीमच्या मदतीने प्रदर्शनाची तयारी करतो. काही वेळा एक्झिबिशन देशात, विदेशातही भरवले जाते. अशा स्थितीत अन्य राज्यातील, परदेशातील नागरिकांची आवड निवड लक्षात घेऊनच प्रदर्शनाचा आराखडा तयार केला जातो.

एक्झिबिशन डिझायनिंगला करिअर रुपातून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज भासते. या आधारावर उमेदवार या क्षेत्रातील बारकावे समजून घेतो. एक्झिबिशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी अहमदाबाद येथील नामांकित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करता येतो. याशिवाय डिप्लोमा इन डिझायनिंगचा देखील अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण आहे. या अभ्यासक्रमाशिवाय इंटिरियर डिझायनिंग किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमही केला जाऊ शकतो. इंटिरियर डिझायनिंग तसेच इव्हेंट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातही एक्झिबिशन डिझायनिंगचे विस्ताराने अध्यापन केले जाते.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एक्झिबिशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी डिझायनिंग थेरी, मॉडेल मेकिंग, मटेरियल पर्चेस, फॅशन हिस्ट्री, सायकॉलॉजी, ग्राफिक डिझायनिंग, फोटोग्राफी, व्हिज्युअल मर्केडायजिंग, मॅकेजिंग डिझायनिंग, फॅशन स्टायलिंग, फॅशन कन्झूमर बिहेवियर, इव्हेंट डिझायनिंग, द वर्ल्ड ऑफ इव्हेंट डिझायनिंग, कलर कोड अँड पॅलेट टेक्निक, इव्हेंट स्टाइल, साइट सिलेक्शन, सॉफ्टवेअर ऑटो कॅड टू डी, डिझायन एलिमेंट, लायटनिंग, एक्झिबिशन डिझाइन, कॉस्टिंग अँड बजेटिंग, इंडस्ट्रियल डिझाइन, आर्किटेक्चर, ड्राफ्टिंग, स्पेशल डिझायन, इव्हेंट मॅनेजमेंट, थ्रीडी डिझाइन, ग्राफिक डिझाइन आदी विषयांत सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री अभ्यासक्रम देखील करता येतो.

एक्झिबिशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला नामांकित एक्झिबिशन डिझायनर, इंटिरिअर डेकोरेटर, आर्ट डायरेक्टर किंवा सेट डिझायनरकडे सहायक म्हणूनही काम करू शकतो. अनुभव वाढण्याबरोबरच वेतनातही वाढ होत जाते. एक्झिबिशन डिझायनिंगच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केल्यानंतर आपण स्वत:ची कंपनी सुरू करू शकता. सुरुवातीच्या काळात आपल्याला कमी वेतन मिळेल. मात्र कालांतराने अनुभवाच्या जोरावर वेतन वाढत जाईल. सुरुवातीला वीस ते पंचवीस हजार दरमहा सहजपणे कमवू शकता. मात्र अनुभव मिळाल्यानंतर हेच वेतन पन्‍नास हजार किंवा एक लाखापर्यंत पोचते. जर आपण करारपद्धतीवर काम करत असाल तर किती ऑर्डर मिळतील, त्यावर आपले उत्पन्‍न अवलंबून राहील.

Back to top button