‘गॅप ईयर’चे नियोजन करताना… | पुढारी | पुढारी

‘गॅप ईयर’चे नियोजन करताना... | पुढारी

जयदीप नार्वेकर

बारावीनंतर किंवा उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी एखादे वर्ष गॅप किंवा ब्रेक घेण्याचा विचार करतात. हे वर्ष अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक असू शकते. जर तुम्ही या कालावधीत सहलीचे नियोजन करत असाल तर त्यासाठी पैशाची जमवाजमव बरीच करावी लागेल. जर तुम्ही काम करायचे ठरवले असेल तर त्यासाठी आर्थिक नियोजनाचा विचार करावा लागतो. याशिवाय वाहतूक, आरक्षणाचा खर्च, जेवण आणि विमा याही गोष्टी आल्या. 

आपण वेळ कसा घालवणार आहोत, यावर सर्वकाही गोष्टी अवलंबून आहेत. सहलीचे नियोजन करताना आणि पूर्ण झाल्यानंतर आर्थिक घडी कशी बसवता येईल, याचा विचार प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वेळ आपल्याला निवांतपणा किंवा मानसिक शांतता हवी असते. अशा स्थितीत काही युवामंडळी सहा महिने किंवा वर्षासाठी मनसोक्‍त भटकंती, पुस्तक वाचन किंवा अन्य कामात लक्ष देऊन मनाला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादे वर्ष गॅप घेण्याचे निश्‍चित केल्यानंतर सुरुवातीला, गॅप घेतलेल्या काळात आणि नंतरच्या काळात आर्थिक स्थिती कशी राहील, याचे आकलन करणे गरजेचे आहे. तसेच निर्णय घेण्याचे नक्‍की केल्यावर काही गोेष्टींची पडताळणी करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

स्वत:ला प्रश्‍न विचारा : गॅप घेण्यापूर्वी एकदा मनाला विचारा की, खरोखरच आपल्याला गॅप घ्यायचा आहे का? ही वेळ योग्य आहे. आठवडाभर, महिनाभर किंवा वर्षभरासाठी गॅप आपल्यासाठी खरोखरच गरजेचा आहे का? असे स्वत:ला प्रश्‍न विचारून त्यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे. गॅप झाल्यानंतर आपण पुन्हा तितक्याच वेगाने कामाला लागणार आहोत का? गॅपमुळे आपला मानसिक ताण हलका होणार आहे का? या प्रश्‍नांचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्यावर जर काही आर्थिक जबाबदारी असेल तर ती जबाबदारी पार पाडत वर्षभराचा किंवा सहा महिन्यांचा का असेना गॅप घेतलेल्या काळात आर्थिक नियोजन बिघडणार तर नाही ना, याचेही आकलन करणे गरजेचे आहे. 

नियोजनाबाबत स्पष्टता : ज्या वर्षात आपण गॅप घेणार आहोत, त्या वर्षाचे वेळापत्रक आपल्या डोक्यात प्राथमिक रूपात तयार असणे गरजेचे आहे. या काळात आपण काय करणार आहोत, कसा वेळ घालवणार आहोत, यात सुसूत्रता असावी. प्रवास, इंटरशिप, नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश, सामाजिक कार्य आदींबाबत स्पष्टता असावी. याशिवाय असंख्य पर्याय आपल्यासमोर असतात. त्याची निवड करून त्याद‍ृष्टीने सुट्टीचे वेळापत्रक तयार करावे जेणेकरून आपण ज्या कामासाठी सुट्टी किंवा लाँग ब्रेक घेतला आहे, ते काम अर्धवट होऊ नये आणि अनावश्यक गोष्टीत आपला वेळ खर्ची पडणार नाही. 

सुट्टीच्या दिवसांचे चिज करा : वैयक्‍तिक आणि व्यावसायिक विकास अधिक चांगल्या रितीने होण्यासाठी काही मंडळी लाँग किंवा वर्षभरासाठी गॅप घेण्याचे नियोजन करतात. या काळात प्रत्येक दिवस आणि क्षण उपयोगी कसा ठरेल, याचाच विचार करणे आवश्यक आहे. अनेक देश वर्किंग हॉलिडे व्हिसाची सोय उपलब्ध करून देतात. त्यात सुट्टीबरोबरच कामाचाही आनंद कसा घेता येईल, याची आखणी केलेली असते. या काळात केलेले सामाजिक कार्य देखील आपल्याला अनुभव देतात. सुट्टीच्या काळातील अनुभव भविष्यात आपले करिअर आणखी चांगले होण्यासाठी उपयोगी पडते. 

बदल स्वीकारा : अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेला असाल किंवा तेचतेच काम करून कंटाळा आला असेल तर काही काळ गॅप घेणे हिताचे ठरते. नव्याने सुरुवात करण्यासाठी काही वेळ विश्रांती घेणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. या काळात मानसिक थकवा दूर करण्याबरोबरच आपल्या जीवनशैलीत काही बदल करता येईल का, हा विचार करावा. आहार आणि विहाराबाबत आपल्याकडे नेहमीच तुलना होते. सुट्टी निमित्ताने आपण भटकंती करत असतो आणि या काळात विविध संस्कृतींचा अनुभव येत असतो. या माध्यमातून आपल्या व्यक्‍तिमत्त्वात काही बदल करता येईल का, याचा विचार करावा. परदेशात भटकंती करताना पाश्‍चात्य मंडळींची जीवनशैली, राहणीमान, कामाबाबतची शिस्त, वेळेचे बंधन या गोष्टींचे आकलन करून आपल्या कामात त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, याचा विचार करावा.

अनुभव शेअर करा : मानसिक थकवा, नैराश्य दूर करण्यासाठी घेतलेला गॅप किंवा ब्रेक हा अनेकांसाठी संस्मरणीय ठरतो. देश-विदेशातील पर्यटन, अभ्यासदौरा, मित्रमंडळींचे गेट टू गेदर, सहल, नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश यांसारख्या उपक्रमातून आपण ब्रेक साजरा करत असतो. या काळात आलेला अनुभव कधी कधी रोमहर्षक आणि प्रेरणादायी असतो. आपण या सुट्टीकालीन काळातील अनुभव इतरांना शेअर करावेत. आपल्या अनुभवातून नवीन गोेष्टी शिकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अन्य मंडळींना प्रेरित करणे गरजेचे आहे. 

भविष्यातील अडचणी दूर होण्यासाठी किंवा नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी अशा प्रकारचा गॅप काही मंडळींना आवश्यक असतो. त्यामुळे गॅप ईयरचे नियोजन करताना आर्थिक बाजू ढासळणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असून या काळातील अनुभव देखील भविष्यात उपयोगी कसा ठरेल, याचाही विचार करणे तितकेच गरजेचे आहे.

Back to top button