चिनी भाषेत करिअर करायचंय? | पुढारी | पुढारी

चिनी भाषेत करिअर करायचंय? | पुढारी

भारत आणि चीनमधील संबंध प्राचीन काळापासून आहेत. भारताला चीनचे आणि चीनला भारताचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वर्षानुवर्षे भारत आणि चीन यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक, व्यापारी, औद्योगिक, साहित्य क्षेत्रात परस्परांत सहकार्य राहिल्याने रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे.  चीनच्या विकासात आपल्यालाही सहभागी व्हायचे असेल आणि करिअरचा आलेख वाढवायचा असेल तर चिनी भाषा ज्ञान हे एक सर्वोत्तम साधन म्हणून पाहता येईल. भारतातील युवा पिढीला चिनी भाषेच्या शिक्षणाने रोजगाराचे नवे द्वार खुले होऊ शकते. 

जागतिकीकरणामुळे दोन देशांतील सीमा पुसट होत चालल्या आहेत. आज जगातील एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात नागरिक पोहोचत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विविध देशांदरम्यान सांस्कृतिक संबंंधांबरोबरच व्यापारी घडामोडींना वेग आला आहे. अशा स्थितीत उभय देशात चांगला संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहकांची मोठी संख्या असल्याने चीन आणि भारतावर जगाची नजर आहे. दोन्ही देशात आर्थिक आणि व्यापारी संबंध सातत्याने वाढत चालले आहेत. याप्रमाणे चिनी भाषेचे ज्ञान करिअरला चालना देणारे ठरेल.

चिनी भाषाच का? : आजच्या घडीला रोजगाराच्या द‍ृष्टीने चिनी भाषा शिकणे हे लाभदायी ठरत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. चीन हा आशिया खंडातील सर्वात विकसित देश आहे. भारत आणि चीनची अर्थव्यवस्था मजबूत असल्याकारणाने दोन्ही देशांतील आर्थिक राजनैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर देवाण-घेवाण वाढत चालली आहे. चीनचे लघू आणि मध्यम उद्योग भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणूनच अशा उद्योजकांना भारतात चिनी भाषेचे ज्ञान असणार्‍यांची गरज भासत आहे. आय.टी., औषध, रसायन, वैज्ञानिक, संशोधन, विकास योजना आदी क्षेत्रांत शिक्षक आणि अनुवादकांची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर चीनमध्ये इंग्रजी भाषेचे माहीतगार कमी असल्याने दुभाषकांची गरज वाढत चालली आहे. 

संबंधित बातम्या

मांडरिन चिनी भाषेचे स्वरूप : चीनच्या विविध भागांत वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. उत्तर आणि दक्षिण-पश्‍चिम चीनचे बहुतांश नागरिक मांडरिन भाषेचा वापर करतात. चीन भाषेत उत्तम संवाद प्रस्थापित करायचा असेल, संशोधन करायचे असेल किंवा करिअर करायचे असेल तर मांडरिन स्टँडर्ड लिपी येणे महत्त्वाचे आहे. मांडरिन भाषेचे चिन्हांच्या माध्यमातून लेखन आणि वाचन केले जाते. चिनी भाषेत एकूण 50 हजार लिपिचिन्ह आहेत. चिनी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना किमान 5 हजार लिपिचिन्हांची माहिती असणे गरजेचे आहे. भारतात मात्र त्याचे अध्ययन इंग्रजी अक्षराच्या माध्यमातून केले जाते. 

रोजगाराची संधी : तज्ज्ञांच्या मते, टूरिस्ट गाईड आणि अनुवादकच्या रूपातून चिनी भाषेच्या तज्ज्ञांना मोठी मागणी वाढली आहे. भारत आणि चीन यांच्यात सुमारे 50 अब्ज डॉलरचा व्यापार सुरू आहे. हा व्यापार आगामी काळात देखील वाढणार आहे. मोठ्या संख्येत कॉर्पोरेट हाऊसचे इक्झिकेटिव्ह चिनी भाषा जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कारण त्यांना चीनमध्ये व्यापार करायचा आहे आणि व्यापार करण्यासाठी चीन भाषा अवगत असणे गरजेचे आहे. या आधारावर चीन भाषेत रोजगाराचीं चांगली संधी आहे. याशिवाय चीन सरकारशी संपर्क साधण्यासाठी चीन भाषेत पत्र व्यवहार गरजेचे असतेे. जेव्हा चीनचे एखादे शिष्टमंडळ भारतात येते तेव्हा त्यास प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात महत्त्व दिले जाते. या कामासाठी चिनी भाषेचे ज्ञान असणार्‍या तज्ज्ञांची गरज भासते. परकीय सेवेत जाणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जेव्हा चीनमध्ये जातात तेव्हा त्यांना चिनी भाषा येणे अनिवार्य आहे. शेवटी चिनी भाषेत अध्यापनात रोजगाराची देखील संधी उपलब्ध आहे. विविध भाषा अ‍ॅकॅडमीशिवाय टूर अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि हॉटेल इंडस्ट्रीत चीन भाषिक तज्ज्ञांची मागणी वाढली आहे. 

प्रशिक्षण कालावधी आणि पात्रता : भारताच्या विविध विद्यापीठांत चीन भाषा अभ्यासक्रमाबरोबरच अन्य अभ्यासक्रमही शिकवले जातात. या अभ्यासक्रमात सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवीसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. यासाठी किमान पात्रता ही बारावीत किमान 45 टक्के गुण अशी आहे. तसेच पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही स्ट्रिमच्या पदवी अभ्यासक्रमात 45 टक्के गुण असण गरजेचे आहे.

वेतनमान : चिनी भाषेचे ज्ञान असणार्‍या युवकांची वेतनस्थिती तुलनेने चांगली राहते. प्रारंभीच्या काळात 20 ते 30 हजार दरमहा उत्पन्‍न मिळवू शकते. अनुभवानुसार वेतनात वाढ होत जाते. स्वतंत्र अनुवादक म्हणून काम करताना आपल्याला प्रतिशब्दानुसार अनुवादासाठी मोबदला मिळतो. 

Back to top button