आय.टी.आय. करा, करिअर उज्ज्वल बनवा | पुढारी

आय.टी.आय. करा, करिअर उज्ज्वल बनवा

आय.टी.आय. हा असा अभ्यासक्रम आहे की, तो प्राप्‍त केल्यानंतर आपण सहजपणे नोकरी मिळवू शकतो. सर्वसाधारणपणे अनेक सरकारी नोकरीत किंवा खासगी कंपनीत आय.टी.आय.चे प्रमाणपत्र मागितले जाते. जर आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर सरकारी नोकरीसाठी तत्काळ अर्ज करू शकतो.

आय. टी. आय. म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा देशातील सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रम मानला जातो. विशेषत: ग्रामीण भागातील युवा मंडळींना आय.टी.आय. अभ्यासक्रमाने रोजगार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिशयन, इलेक्ट्रॉनिक, लेथिंग, सॉफ्टवेअर, प्लंबिंग, हार्डवेअर टेक्नॉलाजी, वेल्डिंग, टी.व्ही. अँड रेडिओ, मशिनरी यासारख्या क्षेत्रात कौशल्य प्राप्‍त करून देणार्‍या अभ्यासक्रमाने देशातील लाखो युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. या अभ्यासक्रमाच्या मदतीने एखाद्या मोठ्या कंपनीत कुशल तंत्रज्ञ म्हणून काम करू शकतो किंवा स्वत:चा व्यवसाय देखील सुरू करू शकतो. त्यामुळे या अभ्यासक्रमाला नेहमीच मागणी राहिली आहे. मुलींना देखील आय.टी.आय.मध्ये पूरक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ड्रेस डिझायनिंग, ब्युटिशियन यासारख्या अभ्यासक्रमांमुळे सामान्य कुटुंबातील तरुणी कमी कालावधीत रोजगार मिळवू शकते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. काही अभ्यासक्रम सातवीनंतरचे देखील आहे. मात्र, ज्यांना नोकरी लवकर हवी असेल, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्‍त आहे. 

संबंधित बातम्या

• अभ्यासक्रम कोठे उपलब्ध : आय.टी.आय.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सरकारी आणि खासगी नोकरीसाठी सहजपणे अर्ज करता येतो. या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड असतात. आय.टी.आय.चे देशभरात सरकारी आणि खासगी संस्था, कॉलेज आहेत. तसेच विद्यापीठातही विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. ऑनलाईनवर कॉलेज, शिक्षण संस्थांची माहिती मिळू शकते. गुणवत्तेनुसार ट्रेड मिळतो. अर्जात ट्रेडचे पसंतीक्रमांक द्यावे लागतात. गुणांनुसार ट्रेड मिळतो.

• ट्रेड कसा निवडावा? : उमेदवार आपल्या आवडीनुसार कोणताही ट्रेड निवडू शकतो आणि आय.टी.आय.चा डिप्लोमा प्राप्त करू शकतो. विशेष म्हणजे सर्वच ट्रेड सर्व आय.टी.आय.मध्ये उपलब्ध नसतात. आपल्या आवडीचा अभ्यासक्रम संबंधित संस्थेत आहे की नाही, त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. कोणत्या संस्थेत कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कालावधी देखील अभ्यासक्रमानुसार निश्‍चित केलेला असतो. सहा महिने, एक वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष याप्रमाणे अभ्यासक्रमाचा कालावधी असतो. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनकेशनसारख्या अभ्यासक्रमाचा कालावधी दीर्घ असतो तर वेल्डिंग, कारपेंटर यासारख्या अभ्यासक्रमांना सरासरी सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी असतो. थिरॉटिकल आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही पातळीवर हे अभ्यासक्रम शिकवले जातात. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात अधिकाधिक प्रॅक्टिकल करण्यावर भर दिला जातो. कोणत्याही क्षेत्राचे प्राथमिक ज्ञान या अभ्यासक्रमात दिलेले असते. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी संबंधित क्षेत्रात चांगलाच पारंगत होतो. 

• आयटीआयचे शुल्क : जर आपल्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मात्र, खासगी संस्थेतून आय.टी.आय. अभ्यासक्रम करत असाल तर त्यांच्या नियमानुसार शुल्क भरावेच लागेल. आय.टी.आय.साठी आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थिनी पात्र ठरतात. 

• आय.टी.आय. डिप्लोमानंतर नोकरी : आय.टी.आय. डिप्लोमा/सर्टिफिकेट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी कोठे मिळेल, हा प्रश्‍न असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्यासमोर नोकरीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अनेक सरकारी संस्थांत दरवर्षी जागा निघतात आणि त्यांना आय.टी.आय. डिप्लोमाधारक उमेदवार हवे असतात. म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराचा फारसा प्रश्‍न राहत नाही. 

 सार्वजनिक ठिकाणी रोजगाराची संधी : सरकारच्या सावर्जनिक उपक्रमांतील संस्थांत आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार मिळतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी रेल्वे, बीएसएनएल, आयओसीएल, ओएनजीसी, राज्य-राज्यांतील बांधकाम खाते आदी ठिकाणी रोजगाराची हमी मिळते. याशिवाय भारतीय लष्करात देखील नोकरी करण्याची संधी आय.टी.आय.धारकांना मिळते. नौदल, हवाई दल, सीआरपीएफ आणि अन्य निमलष्करी दलाच्या तुकड्यातही आय.टी.आय.पदवीधारकांना नोकरी मिळते. 

• खासगी क्षेत्रात नोकरीची संधी : खासगी क्षेत्रात आय.टी.आय.धारकांना विपूल संधी असते. बांधकाम, वस्त्रोद्योग, ऊर्जा, तेल कंपन्या, इलेक्ट्रिक कंपन्या, वेल्डिंग, इलेक्ट्रॉनिक वस्तूनिर्मिती करणार्‍या कंपन्या आदी ठिकाणी आय.टी.आय.धारकांना मोठी मागणी असते. आय.टी.आय.धारक नोकरी किंवा व्यवसाय दोहोंपैकी एक पर्याय निवडू शकतात. शक्य असेल तर दोन्ही पर्याय एकाचवेळी हाताळू शकतात. अर्थात उमेदवाराच्या कौशल्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. 

• स्वयंरोजगार : आय.टी.आय. अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. अशा व्यवसायासाठी सरकारी दरबारी प्रोत्साहन देण्याबराबेरच अनुदान आणि कर्जही दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लघू, मध्यम उद्योगांना कर्जाची सोय केली जाते. एखाद्या आय.टी.आय.धारकास उद्योग उभारणीसाठी कर्ज हवे असेल तर उद्योग केंद्र मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करते. आज शहर आणि ग्रामीण भागात कुशल कारागिर म्हणजेच प्लंबर, सुतार, बांधकाम मजूर, शेतमजूर, पेंटरची कमतरता आहे. म्हणून  आय.टी.आय.अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वयंरोजगार सुरू करू शकता. 

Back to top button