कोकण बोर्डाकडून मायग्रेशनला विलंब | पुढारी | पुढारी

कोकण बोर्डाकडून मायग्रेशनला विलंब | पुढारी

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण बोर्डाचा निकाल दरवर्षी राज्यभर चर्चेत येतो. मात्र याच बोर्डातील विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) प्रमाणपत्रासाठी कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागत आहेत. मायग्रेशन सर्टिफिकेट वेळेत मिळत नसल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी कोकण बोर्डाकडून मायग्रेशन सर्टिफिकेट मिळणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असते. दहावी, बारावीचे निकाल लागून सुमारे दोन महिने उलटले आहेत. विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमांसाठी अ‍ॅडमिशन घेत आहेत. या प्रवेशासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट महत्त्वाचे असते. 

ज्या विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डातून दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या विद्यार्थ्यांना कोकण बोर्डाचे मायग्रेशन मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठ, राज्य बदलून शिक्षण घेताना हे सर्टिफिकेट सादर करावे लागते. ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल, अशा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही. मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु विद्यार्थ्यांना वेळेत मायग्रेशन सर्टिफिकेट मिळत नसल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. कोकण बोर्डात गेल्यानंतर विविध कारणे दिली जात आहेत. आज या, उद्या या, सहीसाठी पाठवले आहे अशी कारणे येथील कर्मचार्‍यांकडून दिली जात आहेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांना अनेकवेळा फेर्‍या कोकण बोर्डात माराव्या लागत आहेत. यामुळे मानसिक, आर्थिक त्रास या विद्यार्थी व पालकांना होत आहे.

कोकण बोर्डातून मायग्रेशनची प्रकरणे निकालात का काढली जात नाहीत, असा सवाल विद्यार्थ्यांमधून होत आहे. मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मायग्रेशनची प्रकरणे प्रलंबित असल्याचे येथे येणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. या फायली पुढे का सरकत नाहीत? विद्यार्थ्यांची अडवणूक का होत आहे? असा संतप्त सवाल पालक विचारू लागले आहेत.

मायग्रेशन सर्टिफिकेट वेळेत मिळाली नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांना यंदा नवीन अभ्यासक्रमांना मुकावे लागणार आहे. काही अभ्यासक्रमांच्या संस्थांनी 31 जुलैपर्यंत ही सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप अनेक प्रकरणे बोर्डाकडे प्रलंबित असल्याने या प्रकरणांचा निपटारा करणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कोकण बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या समस्येत लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई करण्याची मागणी…

कोकण बोर्डाच्या चांगल्या निकालामुळे बोर्डाचे नाव आदराने घेतले जाते. मात्र विद्यार्थ्यांची अशी अडवणूक होत असेल, तर त्याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांचे नुकसान करणार्‍या व अडवणूक करणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.


 

Back to top button