EDU दिशा : स्पर्धा परीक्षांतील चालू घडामोडींचे महत्त्व | पुढारी

EDU दिशा : स्पर्धा परीक्षांतील चालू घडामोडींचे महत्त्व

कोणत्याही नागरिकाला दैनंदिन जीवन जगताना सभोवताली काय चालू आहे याची माहिती असणे आवश्यक असते. मात्र स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवाराला एवढा सीमीत द‍ृष्टीकोन ठेवून चालत नाही. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे तयारीचा कालावधी खूप मर्यादित असल्याकारणाने वेळेच्या बंधनात राहून या सर्व गोष्टी होणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत चालू घडामोडींचा योग्य व ठराविक  पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असते. 

अधिकारी हा समाजाच्या द‍ृष्टीने  विचार करणारा तसेच सामाजिक बांधिलकी  जपून कल्याणकारी निर्णय घेणारा असतो या अनुषंगाने प्रत्येक अधिकारी व्यक्‍तीस राज्य, राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्‍या घडामोडी लक्षात घेणे अनिवार्य ठरते. चालू घडामोडींचा अभ्यास म्हणजे सभोवताली घडणार्‍या घटनांचा फक्‍त आढावा घेणे नव्हे तर त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा द‍ृष्टीकोन आत्मसात करणे होय. मात्र याचा अभ्यास करताना सर्वच घडामोडींना सारखेच स्थान देणे उचित ठरत नाही. त्यासाठी परीक्षेच्या अभ्यासाला केंद्रबिंदू मानावे, तसेच यापूर्वी विचारलेल्या प्रश्‍नांचे विश्‍लेषण केल्यास असे निदर्षणास येते की प्रश्‍नांचे खालील प्रकार पडतात. 

प्रकार : 

1) केवळ चालू घडामोडी संबंधातील  प्रश्‍न

2) सामान्य अध्ययनातील विषयासंदर्भातील चालू घडामोडींचे प्रश्‍न

यासाठी  वर्तमानपत्रे वाचन करताना सामान्य अध्ययन विषयांच्या मुद्द्यांशी जोडणी (श्रळपज्ञळपस) करणे आवश्यकअसते. नवीन अभ्यासाला सुरुवात केलेल्या उमेदवारांनी प्रथम प्रत्येक विषयांमधील मुलभूत संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतरच वर्तमानपत्र किंवा इतर स्त्रोतामधून चालू घडामोडींचा अभ्यास करावा यामुळे उमेदवाराचा वेळ वाचतो व महत्वाचा मुद्दा योग्यरित्या समजण्यास मदत होते व चालू घडामोडींकडे बघण्याचा स्पर्धात्मक द‍ृष्टीकोन प्राप्त होतो. चालू घडामोडी या सर्वसाधारणपणे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरुपाच्या असतात. अर्थातच त्यांचा परिणाम मुख्य परीक्षांच्या विषयांवर पडतो. यावरून त्यांचे ढोबळ वर्गीकरण पुढीलप्रमाणे महत्वाचे कायदे, विधेयके, घटनादुरुस्त्या, महत्वाच्या परिषदा, संस्था, नविन बोध, समित्या-आयोग त्यांचे अहवाल, महत्वाची कलमे, आर्थिक घटना व आकडेवारी, न्यायालयीन निवाडे, नवीन योजना अंमलबजावणी इ. याव्यतिरिक्‍त फक्‍त चालू घडामोडीं संबंधित चर्चेतील व्यक्‍ती, नियुक्त्या, निधन वार्ता, ग्रंथ त्यांचे लेखक, पुरस्कार, क्रिडा इ. आणि अशाचप्रकारचे वर्गीकरण होय. 

यासाठी उमेदवारांनी दररोजच्या वर्तमानपत्रांचे वाचन, महिन्यांची मासिके वापरावीत तसेच आठवड्याच्या दर रविवारच्या वर्तमानपत्रांमधील  पुरविण्या वाचाव्यात यामध्ये आठवडाभर घडलेल्या घटनांचा सविस्तर लेखाजोखा असतो. अशाप्रकारे अभ्यास केल्यास अभ्यासाला योग्य न्याय मिळून परीक्षेमध्ये योग्य गुण प्राप्त होतात.

Back to top button