EDU दिशा : पंचकर्म निष्णात बना | पुढारी

EDU दिशा : पंचकर्म निष्णात बना

आज संपूर्ण भारतभर बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन अँड सर्जरी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदाचार्य) हा पदवी अभ्यासक्रम 12 वी विज्ञान शाखेनंतर आणि निट प्रवेश परीक्षेनंतर करण्यात येतो. महाराष्ट्रात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एस.यू.एच.एस.) हा अभ्यासक्रम सुमारे 60 महाविद्यालयांतून चालवते. दरवर्षी सुमारे अडीच ते तीन हजार डॉक्टर्स उत्तीर्ण होऊन वैद्यक व्यवसाय करतात. पुढे पदव्युत्तर पदवी एम.डी./एम.एस. अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयात मर्यादित जागा असून खासगी आयुर्वेद महाविद्यालयाची फी सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. तसेच या पदव्युत्तर जागा ही मर्यादित आहेत. अशा विद्यार्थ्यांना एक पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्राचा अ‍ॅडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म हा 1 वर्षे कालावधीचा आणि दर आठवड्याच्या शेवटी शनिवार/रविवारी सुट्टी दिवशी दोन-दोन तास हा अभ्यासक्रम थेअरी, प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन असा चालतो. वर्षाच्या अखेरीस विद्यापीठ परीक्षा घेत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

या अभ्यासक्रमांतर्गत स्वेहन, स्वेदनादी, पूर्वकर्मे, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्‍तमोक्षण, शिरोधारा, शिरोबस्ती, हद्बस्ती, जानुबस्ती, कटिबस्ती, नेत्रबस्ती आदी कर्मेस प्रात्यक्षिक शिकवली जातात. तसेच रुग्ण परीक्षण अनुभवावर एक लघुशोध निबंध तयार करून घेतला जातो. या अभ्यासक्रमात भरपूर प्रात्यक्षिके असल्याने विद्यार्थी परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने, आयुर्वेद पंचकमांतर्गत निदान, चिकित्सा करणे व आत्मविश्‍वासाने पंचकर्माची प्रॅक्टिस करून त्यामध्ये निष्णात बनणे अशी या अभ्यासक्रमाची योजना आहे.  विशेष म्हणजे स्वत:ची खासगी प्रॅक्टिस, नोकरी सांभाळून करता येणारा हा अभ्यासक्रम आहे.          – डॉ. सुनील बी. पाटील

Back to top button