पर्याय हॉटेल मॅनेजमेंटचा  | पुढारी | पुढारी

पर्याय हॉटेल मॅनेजमेंटचा  | पुढारी

विजयालक्ष्मी साळवी

पंधरा-वीस वर्षांपूर्वी एका खासगी वाहिनीवर खाना खजाना नावाचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय ठरला. शेफ संजीव कपूर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले. पुरुषदेखील चांगला स्वयंपाक किंवा एखादा पदार्थ तयार करू शकतो, हे संजीव कपूर यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांनी शेफ किंवा हॉटेल मॅनेजमेंटला ग्लॅमर मिळवून दिले. परिणामी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक तरुण या क्षेत्रात आले. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र केवळ शेफ किंवा सेवा देणे एवढ्यापुरतेच मर्यादित क्षेत्र नाही. हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळण्यापासून ते अभ्यागतांची काळजी घेणे याचाही त्यात समावेश होतो. 

पर्यटन व्यवसायासाठी हा अभ्यासक्रम पूरक मानला जातो. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करणारी मंडळी केवळ पंचतारांकित हॉटेलमध्येच नाही तर नामांकित कॉर्पोरेट कंपन्या, हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात अध्यापक, पंचतारांकित रुग्णालय या ठिकाणी सेवा देत आहेत. एवढेच नाही तर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काही व्यक्तिगत गुणांची देखील आवश्यकता असणे गरजेचे आहे. संवाद कौशल्य, सेवाभाव वृत्ती, नम्रता यांसारखे गुण असणे अत्यावश्यक आहेत.

गेल्या सात वर्षांत भारतीय हॉटेल इंडस्ट्रीत दीडशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यटनस्थळ, धार्मिक स्थळ, थंड हवेचे ठिकाणं, अभयारण्य आदी ठिकाणी हॉटेलला चांगली मागणी असते. पर्यटनाच्या वाढत्या प्रसारामुळे हॉटेल व्यावसायिकांची भरभराट होत आहे. म्हणून तरुण मंडळींचा ओढा या क्षेत्राकडे वाढत चालला आहे. चांगले राहणीमान आणि उच्च वेतनश्रेणी यामुळे तरुणांना हे क्षेत्र उपयुक्त वाटत आहे. परदेशातील हॉटेल आणि हॉस्पॅटिलिटी क्षेत्रातही नाव कमवत आहेत. आपल्या योग्यतेनुसार क्षेत्राची निवड करणे महत्त्वाचे ठरते. अभ्यास आणि सरावाच्या जोरावर अनुभव घेऊ शकतो आणि करिअरचा प्रारंभ करता येतो. 

अभ्यासक्रम : हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जसे की बेकरी अँड कंफेशनरी, हॉटेल रिसेप्शन अँड बुक कीपिंग, रेस्टॉरंट आणि काऊंटर सर्व्हिस यात वर्षाचा डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा, बीएससी हॉस्पिटॅलिटी अँड टूरिझम मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा बीए अभ्यासक्रम, बॅचलर ऑफ व्होकेशनल डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम, फूड प्रॉडक्शनमध्ये सहा किंवा तीन महिन्यांचा कोर्स उपलब्ध आहे. एनसीएचएमसीटी आणि इग्नू यांच्या संयुक्त रुपाने राबविण्यात येणारा तीन वर्षांचा बीएससी प्रोग्रॅम इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

पात्रता :  हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. बारावीत इंग्रजी विषय अनिवार्य असणे गरजेचे आहे. न्यूमॅरिकल अ‍ॅबिलिटी, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञानची माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे आकलन असणे विद्यार्थ्याला फायदेशीर ठरू शकते. याशिवाय मृदूभाषी असणे, सेवाभाव, संवादकौशल्य आदी गुण असणे उपयुक्त ठरते.

नोकरीचे स्वरूप : मॅनेजर, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेव्हरेज, हाऊसकिंपिंग, शेफ, फूड प्रोसेसिंग, मार्केटिंगसारखे जॉब उपलब्ध आहेत. 

संधी कोठे कोठे : हॉटेल मॅनेजमेंटची पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त करणार्‍या व्यक्तीला रेस्टॉरंट, फास्ट फूड, क्रुझ शिप, हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड केटरिंग, एअरलाईन केटरिंग, हॉटेल अँड केटरिंग इन्स्टिट्यूट, रेल्वे, बँक किंवा अन्य मोठ्या संस्थेच्या कॅन्टिनमध्ये जॉब उपलब्ध आहेत. 

Back to top button