मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न | पुढारी

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न

महाराष्ट्रातील शाळा १६ मार्च २०२० पासून बंद आहेत. तेव्हापासून मुले घरीच आहेत. शिक्षक वर्क फ्रॉम होम करत आहेत. तेव्हापासून आजतागायत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. वयस्क, मधुमेह, हृदयविकार असलेल्या लोकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडतो आहे. सगळेच नागरिक तणावाखाली वावरत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवायचे मोठे आव्हान आहे.

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरही ऑनलाईन शिक्षण चालू आहे. सुरुवातीला स्वाध्याय देण्यापुरते मर्यादित असलेले हे शिक्षण आता प्रत्यक्ष अध्यापनापर्यंत पोहोचले आहे. या ऑनलाईन शिक्षणाच्या तासिकेला उपस्थितीचे प्रमाण पाहिले तर प्राथमिक स्तरावर २५ ते ३५ टक्केच आहे. माध्यमिक स्तरावर हेच प्रमाण थोडे अधिक आहे इतकेच.

ऑनलाईन शिक्षणात खरा अडथळा ठरतोय ते खेड्यातील अनेक पालकांकडे ॲड्रॉईड मोबाईल नाहीत. ज्यांच्याकडे आहेत, त्यापैकी काहींना मोबाईल ऑपरेट करता येत नाही. काही ठिकाणी तर रेंजची समस्या आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण अखंडितपणे चालू ठेवायचे मोठे आव्हान आहे.

काही पालक ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्याबाबत आग्रह धरत आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे.

सध्या चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये सुद्धा अनेक समस्या आहेत. पद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या प्रात्यक्षिकला अत्यंत कमी वाव आहे. शिवाय एक तासापेक्षा अधिक काळ मुलांची एकाग्रता राहत नाही. आणखी एक बाब म्हणजे गोरगरिबांची मुले ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचितच आहेत. एकंदरित सर्वच पातळ्यांवर ऑनलाईन शिक्षण अपयशी ठरत आहे. तरी सुद्धा शिक्षकांनी चिकाटी सोडलेली नाही. मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणाची सर्वच स्तरावर गरज निर्माण झाली आहे. समस्यांवर मात करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळाची गरज आहे. 

 

-संभाजी पाटील

मुख्याध्यापक, विद्या मंदिर तिटवे, ता. राधानगरी

(राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित)

मो. ९०४९८७०६७४

Back to top button