शाळा बंद, पण शिक्षण सुरुच; 'या' पद्धतींचा करा अवलंब!  | पुढारी

शाळा बंद, पण शिक्षण सुरुच; 'या' पद्धतींचा करा अवलंब! 

मार्च महिन्यापासून आतापर्यंत कोरोनाचा विळखा कायम आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. जो – तो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत शाळा बंद आहेत. मात्र शिक्षण सुरू ठेवण्याचे पर्याय शिक्षक, पालक आणि प्रशासकही शोधत आहेत. 

शाळा १ जुलैनंतर टप्प्याटप्प्याने सुरू होतील असे प्रशासनाने सांगितले. परंतु बाधित लोकांचे प्रमाण वाढत असताना ३१ जुलै ही डेडलाईन दिली. तरीपण कोरोनाचा कहर काही थांबलाच नाही. आता ३१ ऑगष्टपर्यंत शाळा बंदची घोषणा झालीय. आता पालक शिक्षकांना फोन करून पर्याय विचारू लागले. आम्ही यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्नात आहोत.

१) व्हॉट्सॲप ग्रुप- प्रत्येक वर्ग शिक्षकांनी पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलाय. या माध्यमातून त्या- त्या वर्गासाठी दररोज सकाळी ८ पूर्वी दिवसभराचे वेळापत्रक दिले जाते. ते वेळापत्रक स्वाध्याय वहीत लिहून घेणे व दिवसभर उदा. वाचन, उपक्रम, स्वाध्याय, चाचणी सोडविणे असे स्वयंशिस्तिने अभ्यास सुरू आहे.

२) टिलिमिली कार्यक्रम- महाराष्ट्र शासनामार्फत सह्याद्री वाहिनीसह अनेक वाहिनीवर हा कार्यक्रम सुरू आहे. आमचे शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेरित करतात.

३) स्मार्ट पीडीएफचा वापर-  या पीडीएफ अनेक तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. त्याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांना, त्या पीडीएफच्या माध्यमातून पाठासंबंधी अधिक माहिती व स्वाध्याय देतो.

४) ऑडिओ  क्लिपचा व रेकॉर्डेड व्हिडिओचा वापर- इंटरनेटच्या माध्यमाने mp३ स्वरूपातील गाणी, कविता याच्या ऑडिओ क्लिप व काही वाटते घटकांचे प्रत्यक्ष अध्यापन फलकावर करून त्याचे व्हिडिओ तयार करून ग्रुपवर शेअर करतो.

५) ऑनलाइन टेस्ट – आम्ही तंत्रस्नेही शिक्षक ऑनलाइन टेस्टच्या लिंक तयार करून त्या लिंक वर्गवार मुलांना देऊन मुले त्या टेस्ट सोडवितात व त्याचा स्कोर किती लगेच स्वतःच तपासतात.

६) युट्यूब चॅनेलचा वापर – इतिहास, भूगोल, विज्ञानातील काही संकल्पना समजून घेण्यासाठी, शिक्षक पाठातील क्यू आर कोड व आवश्यक लिंकद्वारे दीक्षा ॲप व युट्यूबचा वापर करतात.

७) आकाशवाणीचा वापर-  लॉकडाऊनच्या काळात आकाशवाणी कोल्हापूरने आम्हाला बालजगत कार्यक्रमात मुलांच्याकडून त्यांच्या स्वरचित कथा, कविता, काही प्राण्यांच्या आवाज यांच्या ऑडिओ आम्ही मागविल्या. बालजगत कार्यक्रम २ऑगस्ट व ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ ते ११:३० या वेळांत प्रसारित केला.

८) शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे, अभ्यासमालेचा वापर – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण संचालक  दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाने तयार झालेली शाळा बंद… पण शिक्षण चालू आहे ही अभ्यासमाला सुरु आहे. या अभ्यास मालेची लिंक व्हॉट्सॲप ग्रुपना देवून मुलांचा सहभाग वाढविला आहे. 

९) गुगल मीट ॲप व झूम क्लाउड ॲपचा वापर – सर्व पालकांना प्ले स्टोअर वरून गुगल मीट ॲप व झूम क्लाऊड ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. फोन करून विशिष्ट सूचना देत किंवा मिटिंगला कसे जॉईन व्हायचंय याची माहिती दिली. संध्याकाळी ७ ते ८ मुलांना जॉईन होण्याचे आवाहन केले. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. अशा मुलांना शेजारील मित्राकडे बसण्याचे आवाहन केले. १० जुलै पासून दररोज एक तास या ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष अध्यापन सुरु केले आहे.

त्याबरोबर १) स्वाध्याय वही व २) स्वाध्याय पुस्तिका – यांच्या वापरातून मुलांना कार्यात गुंतून ठेवले.

– विनायक राजाराम चौगले, 

विषय शिक्षक, वि. मं. वाघापूर, ता. भुदरगड 

मोबाईल- ९४२११०१५२१

Back to top button