हे दिवस संपतील, अध्ययन-अध्यापनाचे कार्य अविरत चालू ठेवू! | पुढारी

हे दिवस संपतील, अध्ययन-अध्यापनाचे कार्य अविरत चालू ठेवू!

मी सेंट झेविअर्स स्कूल, महाड येथे गेली 12 वर्षे शिक्षिका म्हणून अध्यापनाचे कार्य करत आहे. परिवर्तन काळाची गरज आहे. अन्य क्षेत्रांबरोबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने आमूलाग्र बदल घडून येत आहेत. अगदी गुरुकुल पद्धतीपासून  प्रारंभ झालेल्या ज्ञानदानाच्या व्याख्या रोज बदलताना दिसतात. मात्र आज कोरोना या जागतिक महामारीच्या समस्येमुळे संपूर्ण विश्व बंदिस्त आहे. पण तरीही त्यातून मार्ग न काढेल तो मनुष्य कसला!? अर्थात, या महामारीमुळे आणि पर्यायाने सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे आलेल्या संकटांमुळे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतच आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्यामध्ये वरच्या वर्गात प्रवेश मिळूनही मुलांना आजतागायत शाळेचे दर्शन होऊ शकले नाही. ‘हे वर्ष फुकट जाणार’ असा पालक-विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक गोंधळ असताना ऑनलाईन अभ्यासाची नवसंकल्पना उदयास आली, अन घरातच चैतन्यमय शालेय वातावरण निर्माण झाले, मुलांना शिक्षक घर बसल्या मोबाईल वा अनेक माध्यमातून दिसू लागले; अभ्यास सुरू झाला. कुठे ऑनलाईन कुठे ऑफलाइन पर्याय स्वीकारले गेले. शिक्षक मुलांना शिकवू लागले.

या काळात एक शिक्षिका म्हणून ऑनलाईन अध्यापन करताना माझ्या अनुभवांच्या शिदोरीत भर पडत आहे. अर्थात, प्रत्यक्ष शिकवण्याचे समाधान या पर्यायात मिळत नसेल ही कदाचित, पण  तीच उर्मी, तळमळ या शिकवण्यात नाविन्यता आणून देते. परंपरागत पध्दत मागे पडून नव-तंत्रज्ञानाची ओळख होत आहे. स्मार्ट टिचिंग आणि डिजिटल स्किल्स कळल्याने आत्मविश्वास निर्माण झाला, आई वडील स्वतः मुलांना वेळ देऊन अभ्यास घेऊ लागले. त्यामुळे मुलांची शैक्षणिक मानसिकता त्यांना कळत असावी. जिथे बऱ्याचदा शिक्षक आणि शाळेस जबाबदार धरले जायचे. असो. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहणं ही तेवढंच गरजेचं आहे. या पद्धतीमध्ये मुलांना कितपत आकलन झालं किंवा होत आहे हे कळत नाही. त्यावर आधारित अभ्यास पूर्ण करतात का किंवा केला तर मोबाईल वर तपासणे ही मोठी समस्या बनली आहे.

संबंधित बातम्या

त्यात मुलांची मानसिकता हा मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण, एवढे महिने घराच्या बाहेर न पडता, कोंडून घेऊन अभ्यास करणे म्हणजे तसं म्हटलं तर बालमनावर अन्याय आहे. परंतु, वाढत्या स्पर्धेत टिकायचं आहे. त्यात पालकांची जबरदस्ती आणि शाळेची अपरिहार्यता यामुळे ही मुलं घेतात मोबाईल हातात, पण किती मनापासून प्रतिसाद देत असतील हा ही प्रश्न निर्माण होतो. बरीच मुलं ग्रामीण भागात राहतात. ज्‍या ठिकाणी रेंज नसते तेथील मुलांना शिकवण्यापासून  किंवा आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने वंचित रहावं लागतं. पण पालकही यावर पर्याय शोधून मुलांना शिक्षण देतच आहेत, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक! 

मुलांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी ‘हे ही दिवस संपतील’ असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून अध्ययन- अध्यापनाचे कार्य अविरत चालू ठेवू! विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास सोडू नये, पालकांनी पाल्याचं मनोबल वाढवून त्यांना स्वयं अध्ययनासाठी मार्गदर्शन करून प्रेरणा द्यावी. शिक्षक सदैव पाठीशी असतातच, त्यांच्याकडे संवाद साधावा कारण शिक्षक केवळ पेशा म्हणून काम न करता हरेक विद्यार्थ्यांचा पालक म्हणूनही तितकीच काळजी करतो. शेवटी एक शिक्षिका म्हणून ‘घेतला वसा टाकणार नाही’, असं अभिमानाने सांगून सर्वांचे सुयश चिंतिते!

सौ. प्रिया आदेश शहा. हायस्कूल

शिक्षिका, सेंट झेविअर्स स्कूल,

महाड,रायगड

फोन नं.9423822975

ई-मेल आयडी:-

priyashaha171978@mail.com

Back to top button