कोल्हापूर : विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पडतील : उदय सामंत  (video) | पुढारी

कोल्हापूर : विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पडतील : उदय सामंत  (video)

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत, त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. याबाबत योग्य ती खबरदारी घेऊनच परीक्षा घेतल्या जातील. मुंबईमध्ये ऑनलाइन परीक्षा घेताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हीच परिस्थिती उत्पन्न होऊ नये, यासाठी नियोजनपूर्वक परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचं दडपण असणार नाही, असे  उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उदय सामंत यांनी आज शिवाजी विद्यापीठात येऊन अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबतचा आढावा प्रशासनाकडून घेतला. 

संबंधित बातम्या

सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठात एज्युकेशनचे नऊ हजार विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पाच लाख जणांनी हे पेज ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिलेली आहे. सध्या कोरोनाचा अजूनही प्रभाव आहे. सध्याची परिस्थिती ही महाविद्यालये सुरू करण्याची नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्यात येतील. 

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सीमाभागातील शिनोळी या गावात अर्धा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभा करण्यात येत असून जानेवारी महिन्यापासून याठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

ग्रंथालय सुरू करण्याबाबतही आठ दिवसांपूर्वी आपली बैठक झाली आहे. यामध्ये तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. ग्रंथालय सुरू करण्याबाबत नियमावली ठरवून लवकरच ग्रंथालय सुरू करण्यात येतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असताना जर संस्थाचालक फी विद्यार्थ्यांकडून घेत असतील तर अशा संस्था चालकांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल करावी निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

Back to top button