चहा च्या क्षेत्रात करिअर करायचंय? | पुढारी

चहा च्या क्षेत्रात करिअर करायचंय?

भारत हा चहा तयार करणारा, निर्यात करणारा सगळ्यात मोठा देश आहेच, शिवाय चहासाठी भारत हीच एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे या संबंधित कुठल्याही घटकाला भारतात चांगलीच संधी आहे. जर आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करण्याची इच्छा असेल, तर ती टी मॅनेजमेंटमध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते.

केवळ भारतामध्येच नाही, तर जगभरामध्ये चहा हे ‘रिफ्रेश’ करणारं पेय म्हणून वापरलं जातं.

चहाच्या क्षेत्रामध्ये आपण स्पेशलायझेशन करण्यासारखी अनेक संधी उपलब्ध आहेत. या सगळ्या संधींना, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांना एकत्रितपणे ‘टी मॅनेजमेंट’ अशी संज्ञा वापरली जाते. यातील एक महत्त्वाचा विभाग म्हणजे, चहाचं परीक्षण. यामध्ये आपली कसोटी लागत असते. तसंच, या क्षेत्रामध्येही संशोधनाला महत्त्व आहे. याशिवाय, चहाच्या उत्पादनाची देखरेख करणं, नियोजन करणं, ब्रोकर्स, सल्लागार आणि अशा अनेक विभागांमध्ये आपण काम करू शकतो.

चहाच्या क्षेत्रामधल्या कामाचे मुख्यत: सात भाग केले जातात. यामध्ये नियोजन, प्रत्यक्ष लागवड, प्रक्रिया, लिलाव, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि संशोधन या कामांचा समावेश आहे. या प्रत्येक कामामध्ये पुन्हा अनेक छोटे छोटे विभाग केले जातात. प्रक्रिया करण्याच्या कामामध्ये तोडलेल्या चहा पत्तीचे तुकडे करणं, एकत्र करून त्याची पावडर बनवणं या कामांचा समावेश केला जातो. हे काम मुख्यत: कारखान्यांमध्ये केलं जातं.

यानंतर चहाचं पॅकिंग होऊन ते लिलाव केंद्रांपर्यंत पोहोचवलं जातं. या ठिकाणी चहाचे निरनिराळे नमुने तपासले जातात आणि त्यांचं ब्रँडिंग केलं जातं. सामान्यत: टी ब्रोकर्सना लागवडीच्या क्षेत्रातलीही माहिती असते आणि सद्यस्थितीतील बाजाराचा ट्रेंडही माहीत असतो. त्यांच्याकडून हा माल विकत घेतला जातो आणि मग मार्केटिंग विभागाकडून जाहिरात केली जाते. यामध्ये यांत्रिकीकरणाचा मोठा बदल झाला असला, तरी अजूनही त्यात मानवी श्रमांचं आणि मतांचं महत्त्व जास्त आहे.

भारतामध्ये चहाचं सगळ्यात वेगानं वाढणारं क्षेत्र हे आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरीजवळ आहे. एकाच बागेत अनेक प्रकारच्या चहांची लागवड करता येते. चहाचं झाड हे कायम राहत असल्यानं वेगवेगळ्या सिझन्समध्ये त्याच झाडाची पानं तोडली जातात. या प्रत्येक सिझनसाठी एक वेगळी टोपली असते. या प्रत्येक वेगळ्या सिझनच्या टोपलीसाठी वेगळी हाताळणी आवश्यक असते.

साधारणत: अ‍ॅग्रीकल्चरल सायन्स किंवा वनस्पतीशास्त्र, खाद्य शास्त्र यांच्या पदवीधरांना अधिक चांगली संधी मिळू शकते. एमबीएच्या पदवीधारकांना मार्केटिंगमध्ये काम मिळू शकतं. फ्रेशर्सना या क्षेत्रात सुरुवातीला लागवडीच्या कामामध्ये सहायक म्हणून प्रवेश मिळू शकतो. योग्य त्या अनुभवाच्या जोरावर काही वर्षांनी आपण सहायक व्यवस्थापकाच्या जागेपर्यंत मजल मारू शकतो.

अनुभवाच्या जोरावर चांगला पगार मिळू शकतो. तसंच, त्यानंतर चहाच्या बागेचा मुख्य व्यवस्थापक म्हणूनही नियुक्ती होऊ शकते. सामान्यत: कामाला सुरुवात केल्यापासून 12 ते 15 वर्षांमध्ये मुख्य व्यवस्थापकाच्या जागेवर पोहोचू शकतो. चहाचं परीक्षण करण्यासाठी आधी काही वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतरच व्यावसायिक चहाचं परीक्षण करू शकतो. या क्षेत्रात काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती स्वत:ची आवड. सतत बाहेर जाण्याची किंवा दौर्‍यांची सवय असणं गरजेचं आहे.

– अनिकेत प्रभुणे

Back to top button