

अशोक मोराळे, पुणे
आरोपी कितीही चतुर असला तरी, तो अपराध करताना एखादा तरी पुरावा मागे ठेवतोच. येरवडा पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेली पुरुषाची टोपी आणि चप्पलवरून घरातून बेपत्ता झालेल्या महिलेच्या ‘मर्डर मिस्ट्री’चा छडा लावला...
ऑगस्ट 2022 सालची पुण्यातील ही घटना आहे. सोमवारी दुपारी दोन वाजले होते. तेवढ्यात येरवडा पोलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षातील फोन वाजला. साहेब... साहेब...! ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळील झाडीत अडगळीच्या जागेत एका महिलेचा मृतदेह पडलाय. माहिती मिळताच तत्कालीन पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह पाहताच महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
चक्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी जवळच त्यांना एक पिशवी मिळून आली. त्यामध्ये काही कागदपत्रे होती. त्यातील एका कागदावरून चक्रे यांनी महिलेची ओळख पटविली. तिचे नाव गीता होते. महिलेची ओळख तर पटली होती. परंतु तिचा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा छडा आता चक्रे यांना लावायचा होता. शवविच्छेदनासाठी गीता यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला. डॉक्टरांनी त्यांचा खून झाल्याचे आपल्या अहवालात सांगितले. त्यानुसार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद खटके यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी गीता या त्यांच्या मुलीसोबत खेडशिवापूर येथून आल्या होत्या. मुलीने त्यांना घरी आणून सोडले होते. रात्री साडेअकरा वाजता त्यांची मुलगी आपल्या घरी निघून गेली. मात्र, रविवारी पहाटे दीड वाजता गीता परत घरातून निघून गेल्या. घरातील लोकांना वाटले नेहमीप्रमाणे येईल परत. त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याच्या कारणातून यापूर्वी देखील त्या घरातून निघून गेल्या होत्या, परंतु यावेळी मात्र त्या परत आल्याच नाहीत.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या चक्रेंच्या गाठीशी पोलिस खात्यातील तपासाचा चांगला अनुभव होता. यापूर्वी त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावला होता. आपल्या पोलिसी नजरेतून त्यांनी आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना महिलेच्या पिशवी बरोबरच पुरुषाची एक टोपी आणि चप्पल मिळून आली होती. घरातून निघाल्यानंतर गीता काही कॅमेर्यात दिसून येत होत्या. मात्र, घटनास्थळाच्या परिसरात त्या कशा आल्या, त्यांच्यासोबत कोण होते हे दिसून येत नव्हते. टोपी आणि चप्पल काय तोच पुरावा पोलिसांकडे होता. सुरुवातीपासून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून शोध घेतला. त्यावेळी एक व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडली. एका रिक्षात गीता बसल्या असताना त्यांच्यासोबत तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. लागलीच पोलिसांनी आपल्या खबर्याना सुद्धा अलर्ट केले होते. त्यातील एकाने परफेक्ट काम बजावले. त्याने काढलेल्या बातमीत परिसरातील एका कामगारानेदेखील एक व्यक्ती गीता यांच्यासोबत रिक्षात बोलत असताना पाहिले होते.