भिवंडी : भिवंडी शहरात मोबाईल चोरीच्या संशयावरून गुरुवारी (दि.24) एका युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सात आरोपींना अवघ्या तीन तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र या हत्येमध्ये आणखी काही आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय बळावला असून या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि.24) घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवून सात आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. शहरातील गोविंद नगरमधील हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पाईपलाईन नजीकच्या रस्त्याजवळ एका अनोळखी व्यक्तीची कोणीतरी अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास समोर आली होती.
तपासात त्याचे नाव मोहम्मद रहमत शहा आलम (वय 20 वर्षे रा. कलकत्ता पश्चिम बंगाल) असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती तपासात समोर आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे व सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदारमार्फत व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवून अरमान अन्सारी या मुख्य आरोपी सोबत त्याच्यासह सात आरोपींंना ताब्यात घेतले. मात्र आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर मोबाईल चोरीच्या संशयावरून लाकडी दांड्याने तरुणाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात अजूनही काही आरोपी असून त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पोलीस पथक रवाना केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.