

सिडको (नाशिक) : आठ दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याचा राग मनात धरून दुचाकी वर जाणाऱ्या युवकाचा धारदार शस्त्राने निघर्णपणे खून केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड गाव लगत स्वामी नगर परिसरात घडली असुन याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत दोन संशयितांना दोन तासातच गजाआड केले आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रशांत भदाणे ( वय २५, रा .ओंकारेश्वर महादेव मंदिर स्वामी नगर अंबड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
शनिवार (दि.28) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास प्रशांत भदाणे हे दुचाकीवरून स्वामी नगरमधून जात असताना संशयित आरोपी सुफियान अनिस अत्तांर (वय १८, रा. स्वामी नगर, अंबड) आणि विक्की बंटी प्रसाद (वय २०, रा. माऊली लॉन्सजवळ, अंबड) हे रस्त्यावर उभे होते. त्यांनी मागील वाद पुन्हा उकरत प्रशांतचा पाठलाग केला आणि धारदार शस्त्राने गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांतच्या अंगावर गंभीर वर्मी घाव झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, उपनिरीक्षक नितीन फुलपगारे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला आणि केवळ दोन तासांत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
आठवड्याभरापूर्वी अंबड औद्योगिक वसाहतीत प्रशांत भदाणे आणि सुफियान यांच्यात दुचाकीच्या कटावरून वाद झाला होता. त्यावेळी प्रशांतने सुफियानच्या गालावर चापट मारली होती. हीच रागाची ठिणगी मनात धरून सुफियानने मित्राच्या मदतीने प्रशांतचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मयत प्रशांत भदाणे अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करत होता.