

नाशिक : हेल्थ प्रॉडक्टच्या विक्रीतून आलेले पैसे, दिलेला लॅपटॉप व मोबाइल परत न करता एका डॉक्टरची सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजन बाजीराव पाटील (रा. वृंदावननगर, आडगाव शिवार) हे इंदिरानगरमध्ये येथील गुरु गोविंदसिंग कॉलेजमागे असलेल्या सिसोदे हेल्थकेअर या फर्मचे काम पाहतात. या ठिकाणी पाटील यांच्या ओळखीचे संशयित आरोपी राजेंद्र किसनभाई सोनवणे (रा. नाथजीनगर, सुरत) व नवीन रमेश पाटील (रा. शिवरामनगर, भाडणे, ता. साक्री, जि. धुळे) यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आर्थिक फसवणूक करून फिर्यादीच्या सिसोदे हेल्थकेअर प्रॉडक्टची विक्री केल्यानंतर आलेले १ लाख ५५ हजार रुपयांचे पेमेंट कंपनीच्या खात्यात न घेता स्वत:कडे रोख स्वरुपात घेतले. त्यापैकी एक लाख २० हजार रुपये एवढीच रक्कम कंपनीच्या अकाऊंटला जमा केली व उर्वरित ३५ हजार रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. तसेच कंपनीकडून वापरण्याकरिता दिलेला लॅपटॉप व मोबाइल घेऊन पळून जाऊन पाटील यांची फसवणूक केली. फिर्यादीच्या ऑफिसमधील एक लाख ३५ हजार रुपयांची रोकड, बँकेचे पाच धनादेश व त्यांची दुचाकी असा दोन लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज घेवून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.