चावी कारागृहाची | पुढारी | पुढारी

चावी कारागृहाची | पुढारी

जगमोहन राठोड हा नागपूर शहराच्या एका उपनगरात आपली बायको आणि दोन मुलांसह रहात होता. नागपूरच्या मध्यवर्ती शासकीय रूग्णालयात जगमोहन हा शवविच्छेदनाचे काम करायचा, दिवसभरात साधारणत: चार ते पाच मृतदेहाचे त्याला शवविच्छेदन करायला लागायचे. शवविच्छेदनानंतर वेगवेगळ्या कारणांनी संबंधिताचे नातेवाईक जगमोहनला हजार-पाचशे रूपये द्यायचे, शिवाय सरकारी पगार होताच, त्यामुळे जगमोहनला कधी पैशाची कमतरता भासली नाही. मात्र शवविच्छेदनाच्या कामामुळे त्याला दारू पिण्याचे जबरदस्त व्यसन लागले होते. दर तास-दोन तासांनी एखादी क्वार्टर रिचवल्याशिवाय त्याला चैन पडायचे नाही. त्यासाठी या शासकीय रूग्णालयापासून जवळच असलेल्या एका देशी दारू दुकानात तो दारू पिण्यासाठी जायचा. याच ठिकाणी त्याची छाया नावाच्या महिलेशी ओळख झाली. छाया हिलासुध्दा दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे तिच्या सासरच्या आणि माहेरच्याही लोकांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले होते, त्यामुळे ती तशी विनापाशच होती.

जगमोहनची आणि छायाची ओळख झाल्यानंतर छायाचा दारूचा खर्च जगमोहनच भागवू लागला, त्यामुळे त्यांच्यात हळूहळू अनैतिक संबंध निर्माण झाले. आपल्या कुटुंबियांना याचा थांगपत्ता लागू नये म्हणून जगमोहनने छायाला शहराच्या दुसर्‍या टोकाला एका भाड्याच्या घरात नेवून ठेवले. हा दुसरा घरोबा झाल्यानंतर हळूहळू जगमोहनचे आपल्या घराकडे दुर्लक्ष होवू लागले, चार-चार दिवस तो आपल्या घराकडेच जात नसे. या काळात त्याचा आणि छायाचा एकमेकासोबत दारू पिवून नुसता धांगडधिंगा चालू असायचा. राहण्या-खाण्यासह दारूचीही फुकटात सोय होत असल्यामुळे छाया जगमोहनला सोडायला तयार नव्हती आणि ऐन उतारवयात एक तरूण बाई जीवनात आल्यामुळे जगमोहनही हळूहळू तिच्यात गुंतत चालला होता.

होता होता जगमोहनच्या या लफड्याची बातमी जगमोहनच्या बायकोच्या कानावर गेली आणि दररोज उठून भांडणाचा नुसता येळकोट सुरू झाला. जगमोहनची बायको त्याला दररोज शिव्या घालायचीच, पण त्याने छायाला ज्या ठिकाणी नेवून ठेवले होते, त्या ठिकाणी जावून छायाशी भांडणे काढायची. ही भांडणे हळूहळू भांडणे न राहता दोघींमध्ये भररस्त्यात हाणामार्‍याही सुरू झाल्या. या सगळ्यामुळे जगमोहन पुरता भंडावून गेला होता.

याच दरम्यान छायाचे दारू पिणे प्रमाणाच्या बाहेर जावू लागले आणि तिने जगमोहनकडे आपल्यासाठी स्वतंत्र घर विकत घेवून देण्यासाठी तगादा लावला. भरीस भर म्हणून छायाचा बाहेरख्यालीपणाही वाढला आणि दारूच्या नशेत ही बया कुणाबरोबरही फिरू लागली. जगमोहनने त्याचा जाब विचारला तर ती त्याच्याच मर्दानगीची खिल्ली उडवायची. त्यामुळे तर जगमोहनचे टाळकेच सटकले. हिच्यासाठी आपण घरदार सोडून आलो, हिला आसरा दिला आणि आज ही आपल्यावर उलटली म्हणून त्याच्या अंगाचा नुसता तिळपापड व्हायचा. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत छायाचा काटा काढायचा त्याने प्लॅन केला. एकेदिवशी रात्रीच्या वेळेस त्याने गोड बोलून छायाला गावाबाहेर दूर अंधारात नेले, तिला भरपूर दारू पाजली आणि ती दारूच्या नशेत असतानाच तिचा गळा आवळला.

छायाचा खून केल्यानंतर कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून जगमोहनने सगळी जय्यत तयारी केली होती. तो पोस्टमार्टेमचे काम करीत असल्यामुळे ती हत्यारे नेहमी त्याच्या मोटारसायकलच्या डिक्कीत असायची. त्याचप्रमाणे कोणकोणत्या कारणाने मृतदेहाची ओळख पटते हेही त्याला पुरते ठाऊक होते. त्यामुळे त्याने आपल्याकडील ब्लेडने छायाच्या चेहर्‍याची सगळी त्वचा काढून टाकली, काही प्रमाणात तिचे नाक विद्रुप केले, हातावरील गोंदण कापून काढले, ओळखीच्या सगळ्या खाणाखुणा नष्ट करून टाकल्या. त्यानंतर त्याने तिची सगळी कपडे काढून जवळच टाकून दिली, जेणेकरून कुणीतरी या महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा भास निर्माण केला आणि निश्‍चिंतमनाने तो आपल्या मूळ घरी परतला.

दुसर्‍या दिवशी पोलिसांना छायाचा मृतदेह मिळाला, पण जगमोहनने तो इतका विद्रुप करून टाकला होता की कुणालाही या मृतदेहाची ओळख पटविणे अशक्य झाले होते. ओळख न पटल्यामुळे जवळपास आठवडाभर छायाचा मृतदेह शवागारातच पडून होता. विशेष म्हणजे छायाच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही जगमोननेच केले होते. छायाच्या मृतदेहाचा पंचनामा करताना त्या ठिकाणी पोलिसांना एक कुलुपाची चावी मिळाली होती, पण त्यावरून काही सुगावा लागला नव्हता. मात्र पोलिस आपल्या पध्दतीने तपास करीतच होते. 

दरम्यान ज्या भाड्याच्या घरात जगमोहन आणि छाया रहात होते, त्या घराच्या घरमालकाने पोलिसांना खबर दिली होती की आपल्या घरातील भाडेकरू गेल्या जवळपास आठवडाभरापासून बेपत्ता झाले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या बंद घराला भेट दिली असता घराला भलेमोठे कुलुप दिसले. सहज म्हणून पोलिसांनी छायाच्या मृतदेहाजवळ सापडलेली चावी या कुलुपाला लावली तर कुलुप उघडले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता भिंतीवर जगमोहन आणि छायाचा एक फोटो टांगलेला दिसला, शिवाय दारूच्या अनेक मोकळ्या बाटल्या, त्याचप्रमाणे जगमोहन व छायाचे कपडेही मिळून आले.

पोलिसांनी ताबडतोब संशयावरून जगमोहनला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. सुरूवातीला जगमोहननेही इतर गुन्हेगारांप्रमाणे बराच आव आणण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या चौदाव्या रत्नापुढे त्याचे काही चालले नाही, जगमोहनने पोपटाप्रमाणे आपला गुन्हा कबूल केला. छायाची ओळख पटू नये म्हणून जगमोहनने अगदी आटोकाट प्रयत्न केले, मात्र या झटापटीत त्याच्या खिशातून पडलेल्या एका कुलुपाच्या चावीने त्याचा घात केला आणि या चावीनेच जगमोहनसाठी कारागृहाचे दार उघडून दिले. शेवटी पाप कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कोणत्या ना कोणत्या काणाने वाचा ही फुटतेच. आपल्या सुखी संसारात रमला असता आणि भलत्या सलत्या मार्गाला लागला नसता तर जगमोहनला उर्वरीत आयुष्य काळकोठडीत घालवावे लागले नसते.

– सुनील कदम, कोल्हापूर

Back to top button