फोनवर बोलायची म्हणून केला पत्नीचा खून | पुढारी

फोनवर बोलायची म्हणून केला पत्नीचा खून

औरंगाबाद : प्रतिनिधी

राजनगर (हर्सूल) येथील महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सतत फोनवर बोलायची म्हणून अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच कविता ऊर्फ सोनी अशोक जाधव (वय, ३०) हिचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात समोर आले. रविवारी (दि. 21) लासूर स्टेशनच्या बाजारातून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

अशोक पंडित जाधव (42, रा. गोळेगाव गदाना, ता. खुलताबाद, ह.मु. राजनगर, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे. तो मिस्त्रीकाम करतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामाला बाहेर गेल्यावर आठ-आठ दिवस घरी न परतणारा अशोक विजयादशमीनिमित्त १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याची पत्नी कविता आणि चार वर्षांची मुलगी आकांक्षा घरीच होते. रात्री जेवण करून ते झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री झोपेतून उठून आरोपी अशोकने कविताच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर तिला विवस्त्र करून अशोकने बाहेरून कडी लावून घेत पळ काढला होता. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिमुकली आकांक्षा जिवाच्या आकांताने रडू लागली. तो आवाज ऐकूण शेजारच्या महिलेने बाहेरची कडी उघडली. त्यावनंतर कविताचा खून झाल्याचे समोर आले होते. प्रथमदर्शनी खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, कविताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर तसेच पती अशोक याच्यावर संशय व्यक्‍त करण्यात आला होता. त्याशिवाय हर्सूल ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी चिमुकलीला बोलते करून नेमके काय घडले होते? याचा जवळपास उलगडा केला होता.

खबर्‍यांचे नेटवर्क आले कामी

आरोपी अशोक जाधव हा निरक्षर आहे. तो मोबाइल वापरत नाही. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान होते. दरम्यान, गुन्हे शाखेने गोळेगाव गदाना या त्याच्या मूळ गावात खबर्‍यांचे नेटवर्क उभारले. त्यानंतर तो लासूर स्टेशनच्या बाजारात असल्याची माहिती मिळाल्यावर रविवारी त्याला पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षम मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अफरोज शेख, सहायक फौजदार शेख नजीर, कॉन्स्टेबल संदीप क्षीरसागर, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्‍वर ठाकूर, प्रमोद चव्हाण, प्रभाकर राऊत यांच्या पथकाने केली.

 

Back to top button