जाना था अबुधाबी… पहुंच गए शारजाह | पुढारी

जाना था अबुधाबी... पहुंच गए शारजाह

बेळगाव : प्रतिनिधी 

खेड्यातील दोन  तरुण… दोघांचेही शिक्षण दहावी… पण, परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न… एका एजंटच्या माध्यमातून अबुधाबीमधील मॉलमध्ये कॉम्प्युटर बिल कलेक्टरची नोकरी  ठरली…एजंटला पैसेही दिले; परंतु प्रत्यक्षात अबुधाबीऐवजी त्यांना शारजाहला पाठवले गेले… अन् ज्या मॉलचे नाव सांगितले गेले, तो मॉल तर अस्तित्वातच नाही. त्यामुळे शारजाहला पोचल्यानंतर फसलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कसेबसे बेळगाव परत गाठले.

त्यांना आता एजंटकडून नोकरीही नाही आणि नोकरीसाठी दिलेले पैसेही परत मिळालेले नाहीत.दोघांचे मिळून 50 हजार विमान खर्चावर गेलेच, पण प्रत्येकी 70 हजार रुपये घेऊन एजंट निवांत आहे. आता हे पैसे वसूल कसे करायचे, याची चिंता या दोघांना लागून राहिली आहे. 

बेळगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील फसलेल्या दोघा तरुणांनी आपली कर्मकहाणी नाव व गाव न छापण्याच्या अटीवर ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला सांगितली. चार महिन्यांपासून हे दोघे दुबईत नोकरीसाठी प्रयत्न करत होतेे. त्यावेळी उमर नामक एजंट त्यांना भेटला. त्याने या दोघांना गरजूंना दुबईला नोकरीला पाठविणे हाच आपला व्यवसाय असल्याचे पटवून दिले. दोघांनाही ते पटले अन त्यांची नोकरी पक्की झाली. 

दुबईला गेले अन परतले 

दोघांना अबुधाबीतील एका मोठ्या मॉलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याची हमी या एजंटाने दिली होती. परंतु, विमान तिकीट आणि व्हिसा मात्र त्यांना शारजापर्यंतचाच मिळाला. तेथून पुढे सुमारे 165 किलोमीटर अबुधाबी आहे.  परंतु, या दोन तरुणांनी शारजाह विमानतळावर उतरून तेथेच सदर मॉलबाबत विचारणा केली. त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून ती सर्व बनावट असल्याचे तेथील एका अधिकार्‍याच्या लक्षात आले.  त्याने त्या दोघांना अबुधाबीत असा कोणताही मॉल नसून, तेथे गेलात तर तुम्हाला गवंडी काम किंवा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करावे लागेल, असे स्पबष्ट केले.

आपण फसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दोघांनी एजंटला फोन केला. परंतु, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांनी बेळगावातून  नातेवाईकांच्या माध्यमातून पुन्हा शारजा-बेळगाव तिकीट बुक करून दोन दिवसांपूर्वी बेळगावात पोहोचले.  प्रत्येकी 70 हजारप्रमाणे त्यांना 1 लाख 40 हजारला एजंटने गंडा घातला आहे. ती रक्कम त्याच्याकडे मागत आहेत. परंतु, अद्याप तरी त्याने रक्कम परत देण्याची तयारी दर्शविलेली नाही. 

करार घरभाडेपट्टीचा 

दोघांना दुबईत नोकरी देण्यासाठी उमरने एक करार केला. परंतु, नोकरी अन या कराराचा तीळमात्रही संबंध नाही. त्याने या करारात आपण आपले  घर या दोघांना महिना 500 रूपये भाडे करारावर देत असून, त्यासाठी ठेव म्हणून 70 हजार रूपये घेतले आहेत. त्यांनी घर सोडल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम दिली जाईल, असा करार केला आहे.

 

Back to top button