बुगडी | पुढारी | पुढारी

बुगडी | पुढारी

डी. एच. पाटील, म्हाकवे

आज थंडीचा गारठा जोरात होता. झाडांची पानं-फळं पार गारठून गेली होती. धुक्यानं तर चादरच पांघरली होती. अंधुकसं धुकं होतंच. बागेत आंब्याच्या झाडांचा मोहोर गळून पडत होता. ढगाआडून सूर्य आपली मान बाहेर काढून आल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होता. सकाळची नीरव शांतता अंगाला भेदून जात होती. सूर्यनारायण वर आला तसा रात्रभर थंडीनं पाय दुमडून झोपलेलं एक कुत्रं जागं झालं. अंगाला आळोखं-पिळोखं देत त्यानं अंग झाडलं. डोंगराच्या पलीकडं सूर्य वर येत होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी पानांवर पडलेलं दव मोत्याप्रमाणे चमकत होतं. चमकणारं दव पिऊन पक्षी किलबिलाट करत होते.

मायाप्पा मेंढपाळानं तीन दगडाची चूल पेटवली. त्यावर चहाचं आंधण ठेवलं, तशी त्याची बायको उठली. आपलं आवरून डाव्या हाताच्या तळव्यावर तंबाखूची राखुंडी घेऊन ती दात घासू लागली. दात घासता घासता तिनं तोंडातून पिचकारी मारली. तशी थोडीसी पिचकारी मायाप्पाच्या अंगावर गेली. तो खवळला. तिच्या आईचा त्यानं उद्धार सुरू केला. तसं तिनं  घाईगडबडीत तोंड धुतलं. मायाप्पाला चहा ओतून दिला. मायाप्पानं थोडसं बकरीचं दूध पिळलं, अन् त्यानं हातात कुर्‍हाड घेतली. मग तो घोडं घेऊन डोंगराकडं निघाला.

बकर्‍यांच्या तळावर लहान पिलांना डालग्यात कोंडून घातलं होतं. त्यांना झाडपाला आणण्यासाठी तो डोंगरावर आला होता. दोन लिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यानं घोड्याच्या पाठीवर घातल्या. पुढं आल्यावर शिवबाभुळीचं झाडं दिसलं. तसं त्यानं घोड्याला थांबविलं अन् तो पुढे गेला. झाडांच्या बुंध्यापासून थोडी घळ सुरू होत होती. तो झाडावर चढणार तेवढ्यात त्याचं लक्ष घळीकडं गेले. तो दचकला. घळीत कसलं तरी पोतं होतं. त्यानं कुतूहलानं पोत उघडलं त्यात कुणा मुलाचा मृतदेह बांधून टाकला होता. तो पाहून तो घाबरला. पळतच घोड्याजवळ आला. अन् त्याच्यावर सावरून बसत त्यानं घोड्याला टाच मारली.

तो तळावर आला. बायकोला सांगून तो पोलिस पाटलांच्याकडं गेला. वस्तुस्थिती त्यानं पाटलांना समजावून सांगितली. तसे पाटील त्याच्याबरोबर डोंगरावर आले. शहानिशा करून त्यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली.  अर्ध्या तासानं पोलिस घटनास्थळी पोहोचले. आता सूर्य बराच वर आला होता. गावात बातमी समजताच बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाच्या गळ्यावर वेगवेगळ्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी जवळपास काही सापडते का ते पाहिले. बराच तपास केल्यानंतर एक बुगडी पोलिसांना मृतदेहापासून थोड्याशा अंतरावर दिसून आली. पोलिसांनी ती जप्त केली. जमलेल्या पैकी कोणीही त्या मुलीला ओळखत नव्हते. पोलिसांनी गावात जाऊन चौकशी केली, मात्र त्या मयत मुलीची ओळख पटली नाही. दोन दिवस झाले तरी त्या मुलीची ओळख पटत नव्हती. पोलिस अगदी वैतागून गेले होते. तीन दिवसांनंतर मात्र जवळच्या जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनला एक सात वर्षाची मुलगी हरविल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावेळी फिर्यादी महिलेला ओळख पटविण्यासाठी त्या पोलिस स्टेशनला बोलविण्यात आले. मृतदेह पाहताच ‘छकुली’ म्हणून त्या महिलेने आक्रोश केला.  मयत मुलगी सुहाना 7 वर्षांची होती. ती इटानगरमध्ये राहणार्‍या मुमताजची मुलगी होती. वडील वारले होते. ओळख पटताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. दिवसभर सुहानाच्या गावात त्यांनी चौकशी केली. तिच्या शाळेतही चौकशी केली. मात्र सुहाना हुशार मुलगी होती एवढीच माहिती मिळाली.

वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये गळा आवळून तिचा खून करण्यात आला होता. त्यामुळे तिच्या खुनाचा उद्देश काय होता? हे शोधणे महत्त्वाचे होते. 

मुमताजची दिवसभर पोलिसांनी चौकशी केली, मात्र ‘माझ्या मुलीला मी का मारू? माझ्या नवर्‍याची ही एकच निशाणी होती,’ असं ती म्हणत होती. मुमताज विधवा होती. तिच्या खासगी आयुष्यात पोलिसांनी डोकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथेही तिचं चारित्र्य स्वच्छ निघालं. मग सुहानाचा मारेकरी कोण? हा प्रश्‍न पोलिसांच्या समोर होता. आता मायाप्पाच्या मेंढराचा तळ हालला होता. तो आता कर्नाटककडे निघाला होता.

पोलिसांनी आठ दिवस तपास करूनही खुनी सापडत नव्हता. मुमताज  बचतगटाचं काम करत होती. तिथे पोलिसांनी चौकशी केली. तिथे मात्र अंधुकसा धागा पोलिसांना मिळाला. राजेश आरडे नावाचा एकजण तिला या कामात मदत करत होता. त्याच्याबरोबर मुमताजची खास दोस्ती होती.

पोलिसांनी राजेशला चौकशीला आणले. मात्र आपली व मुमताजची फक्‍त मैत्री होती, मात्र तिच्या मुलीच्या खुनाशी माझा काहीच संबंध नाही, असे तो सांगत होता. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. राजेशच्या घरातही पत्नीकडे पोलिसांनी चौकशी केली, मात्र आपल्याला यातील काहीच माहीत नसल्याचे तिने सांगितले; पण आपल्या घरातील सासूबाईच्या दोन बुगड्या काही दिवसांपासून गायब आहे, असे तिने जबाबात नमूद केले. बुगडीचे वर्णन ऐकले अन् पोलिसांचे डोळे चमकले.

पोलिसांनी राजेशला उचलले. दोन तास चांगलाच झोडपला. ‘होय साहेब, आम्हीच मारलं तिला’, असं म्हणून तो हात जोडू लागला. ‘मुमताज व मी एकत्र काम करत असताना आमचे प्रेमसंबंध जुळले. आठवड्यातून आम्ही एकदा कामासाठी बाहेर जात होतो. त्यादिवशी मुमताज सुहानाला घेऊन आली होती. आम्ही गाडीवरून डोंगरावर आलो. गाडी बाजूला लावून सुहानाला तिथे बसविले. आम्ही खालच्या घळीत आलो. दहा मिनिटांनी सुहाना तिथे आली. आम्हाला नको त्या अवस्थेत बघून ती ओरडली. ‘मी हे सगळ्यांना सांगणार’ असं बोलू लागली. म्हणून मी तिचा गळा दाबला. अन् दिली घळीत टाकून. मुमताजची समजूत काढली. आपण लग्‍न करू, सुखी संसार करू, अशी गळ घालून या प्रकरणावर पडदा टाकला.’

सध्या राजेश अन् मुमताज जेलची हवा खात आहेत.

Back to top button