चमकी | पुढारी | पुढारी

चमकी | पुढारी

पावसानं थोडी उसंत दिली होती. गव्हाळलेली भाताची लोंबं सूर्यकिरणानं पिवळीधम्मक दिसत होती. दसर्‍याला भात कापणीचा हंगाम जोरात सुरू असायचा. मात्र यंदा पावसानं आपला मुक्काम वाढविल्यामुळे भातपिकाचं नुकसान होत होतं. सखानानाचा पठाराचा ओपा (शेत) आज कापणीला आला  होता. नानानं रात्री माणसांची जुळवाजुळव केली होती. गावापासून डोंगराकडं 10 किमीवर नानाचा भाताचा ओपा होता. यंदा पीकही झोकात होतं.  चांगलं वासाचं वाण नानानं पेरलं होतं. ट्रॅक्टर सांगून रस्त्यावरच मळणी करण्याचा नानाचा विचार होता. पर समदं पावसाच्या बेतावर. चांगली 15 माणसं नानानं सांगितली होती. 

20 गुंठं भात कापायला कितीसा वेळ लागणार?  निदान पावसानं साथ दिली तर दोन तासात रान रिकामे. मनात योजना करत नाना  मारुतीच्या देवळात बसला होता. सोबत रामा देसाई हा जोडीदार होता. आभाळाकडं बघत नाना आपली योजना बसलेल्या रिकामटेकड्यांना सांगत होता. रात्रीचा प्रहर असला तरी आभाळ भरून आलेलं जाणवत होतं. आभाळाकडं बघून नानाचा जीव खालीवर होत होता. मारुतीच्या देवळात भजन आता रंगात आले होते. ‘देवाचिया द्वारी उभा क्षणभरी।’ हा अभंग वारकरी मंडळी सुरात म्हणत होती. नानाचा जीव भातपिकात अडकला होता. देहानं तो मात्र मारुतीच्या देवळातच होता. तेवढ्यात  लख्खकन् वीज चमकली तसा नानाचा चेहरा काळवंडला. 

नानाचा भाताचा ओपा म्हणजे हमखास पीक. डोंगरातून येणारं पाणी थेट भाताच्या शेतातच! त्यामुळे भाताला वाळूसरा कधीच बाधत नव्हता. वर्षाची धान्याची बेजमी या रानातून होत होती. नाना उठला. घराकडं गेला. त्याचं चित्त कशातच लागत नव्हतं. काहीतरी चाहूल लागल्यासारखं त्याला वाटू लागलं. रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. 

पक्ष्यांच्या किलबिलाटाने नानाला येरवाळीच जाग आली. तो उठला. त्यानं आकाशाकडं पाहिलं. आकाश निरभ्र दिसत होतं. त्याला हायसं वाटलं. तोंड धुवून तो लागलीच ट्रॅक्टरवाल्याकडे गेला. त्याला सूचना देऊन त्यानं माणसांची गाठ घेतली. त्यांच्याशी बोलणी करून लवकर जाऊन भात कापून मळणी करण्याचं नियोजन नानानं केलं. 

सकाळचं नऊ वाजलं तसा नाना माणसं गोळा करून पठाराकडं निघाला. डोंगराकडंनं येणारं  वताडं त्यानं धरलं. त्याला बांध घालून पाणी बाजूला काढलं. भातकापणीला सुरुवात झाली. सरासरा भाताच्या कुडप्या ट्रॅक्टरात पडू लागल्या. रानाच्या  दुसर्‍या टोकाला नाना आला अन् त्याला थोडसं भातपीक आडवं पडल्यासारखं वाटलं. तो पुढं गेला अन् दचकला. रानात उभ्या पडलेल्या भातात कोण महिला निपचित पडली होती. नाना दचकला. नानानं सगळ्यांना ओरडून बोलावलं. तशी सगळी मजूर माणसं तिकडं धावली. बाईला बघून सगळेच घाबरले. बाई मरण पावली होती. 

नानानं  पोलिस पाटलांना माहिती दिली. पोलिस  पाटील आले. त्यांनी  पोलिसांना वर्दी दिली. आता नानाची भातकापणी खोळंबली. ‘आयला, हे अन् काय लिचांड’ असं  पुटपुटत तो बांधावर बसला. घटनास्थळीच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. भाताच्या ओप्यात पोलिस काही सापडते का ते शोधू लागले. पोलिसांच्या शोधमोहिमेने नानाचे धान्य मात्र मातीतच  झडू लागले.  पण नाना काहीच बोलू शकत नव्हता. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. अंदाजे 42 वयाच्या महिलेचा मृतदेह होता. तिच्या अंगाला जखमा दिसत नव्हत्या. गळा आवळल्याचे मात्र स्पष्टपणे दिसत होते. पोलिसांना घटनास्थळी  ओळखीचा काहीच पुरावा सापडला नाही. पोलिस निघून गेले. नानानं पुन्हा उरलेल्या भातकापणीला जोर केला.

दुपार होईल तसं काळे ढग आकाशात गर्दी करू लागले. वीज आवाज देऊ लागली तसं नानाचं काळीज धडधडू लागलं. एकदाचं भात कापून ट्रॅक्टर बाहेर पडला अन् जोरदार पावसाला सुरू झाली. ट्रॅक्टर ट्रॉली झाकताना मजुरांची तारांबळ उडाली होती. 

पाऊस थांबला. पोलिस गावात फिरू लागले. मयत महिला कोण? याबाबत चौकशी करत होते.  मात्र जवळपासच्या गावातील ती महिला नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. दोन दिवस होऊनही संबंधित महिलेची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी मयत महिलेच्या अंगावर असलेल्या वस्तू पुन्हा तपासून  पाहण्यास सुरुवात केली. सदर महिला विधवा असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. कानात बुगडी, नकली होती पण नाकातली चमकी   तेवढी सोन्याची होती. हीच चमकी पोलिसांना महत्त्वाची वाटू लागली. 

पोलिसांनी अनेक सराफांना बोलावून घेऊन त्या चमकीची चौकशी केली. मात्र ही आपल्या भागातील नसल्याचे सर्वांनी स्पष्ट केले. मात्र एका सराफाने ही चमकी आंध्र प्रदेशच्या सरहद्दीवरील गावात मिळत असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांना प्रश्‍न पडला, 100 कि.मी. अंतरावरही महिला आलीच कशी?

पोलिसांनी त्या भागात चौकशी सुरू केली. दहा-बारा गावे तपासल्यानंतर एका ट्रक ड्रायव्हरने तो मृतदेह ओळखला. ‘ही माझी सासूच आहे . सुशीला त्यांचं नाव आहे.’ असे म्हणताच  पोलिसांनाहायसे वाटले. ‘आपली सासू पंढरीला गेली म्हणून आपण लक्ष न दिल्याचे’ त्याने सांगितले.

‘मला मेहुणा नाही, त्यामुळे मी सासूजवळच राहतो.’ पोलिस त्याला घेऊन त्याच्या गावामध्ये पोहोचले. मयत सुशीलाविषयी गावात माहिती गोळा करू लागले. मात्र मयत सुशीला यांचे वागणे चांगले असल्याचे समजून आले. मग तिला का मारले अन् कशासाठी? हा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. पोलिसांनी मयत महिलेच्या मुलीकडे चौकशी केली. मात्र तिनेही काही स्पष्टपणे सांगितले नाही. ‘आई आठ-आठ दिवस पंढरपूरला राहते आणि शिवाय माझा नवराही आठ-आठ दिवस ड्रायव्हर असल्याने बाहेरगावी राहतो.’ एवढ्या लांब येऊनही पोलिसांना काहीच धागा लागत नव्हता. मुलगीची चौकशी करून पोलिस मेटाकुटीला आले.

 पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.  नानाच्या शेतात  पुन्हा चौकशी केली. मात्र तुटलेल्या माळेचे काही मणीच फक्त तिथे पोलिसांना सापडले. मयताच्या अंगावरील  चमकी वगळता सोन्याचा कुठलाच दागिना नव्हता. त्यामुळे मारेकरी हा जवळचाच असावा. पण मुलगी आपल्या आईला का मारेल अन् जावई तरी का मारेल? असे प्रश्‍न   पोलिसांना भेडसावत होते. 

 पोलिसांनी पंढरपूर गाठलं. तिथे प्रत्येक मठात- हॉटेलमध्ये मयत महिलेचा फोटो दाखविला. मात्र काही उपयोग झाला नाही. पण गावापासून दूर असलेल्या एका  मठात पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी मात्र पोलिसही चक्रावले. मयत महिला व सोबत एक पुरुष बर्‍याचदा नवरा-बायकोसारखे राहत होते. पोलिसांनी मयत महिलेचा व जावयाचा फोटो दाखविला तसे मॅनेजरने लगेच ओळखला. पोलिसांनी जावयाला उचलले. जावयाला चांगलाच झोडपला. मग मात्र ‘आपले व सासूचे अनैतिक संबंध होते’ असे  त्याने सांगितले. 

‘एका एकादशीला मी उशिरा घरी  आलो. बाहेर जेवून आलो होतो. देवळात भजनाचा आवाज येत होता. मी समजलो, सासूबाई भजनात असेल. दार ढकलून मी आत आलो. अंधारात अंथरुणात शिरलो. मला वाटले, बायकोच आहे. पण माझा झोपेत असणार्‍या सासूशीच संग झाला. मी उठलो आणि  चक्रावलो. मात्र सासूनेच पुन्हा पुढाकार घेतला अन् आम्ही  वारंवार पंढरपूरला जाऊ लागलो. मात्र मी तिचा खून केलेला नाही.’ 

पोलिसांनी मयताच्या मुलीला बोलावून घेतले. दरडावून विचारले तेव्हा ‘होय, मीच मारलं माझ्या आईला’ असं म्हणून ती रडू लागली. 

‘आमच सगळं आनंदात सुरू होतं. कुटुंबही छानच होतं. पण अलीकडे आई पंढरपूरला गेल्यानंतर माझा नवराही आठ-आठ दिवस गायब होऊ लागला. त्यामुळे मला शंका आली. मी आमच्या एका नातेवाईकाला पंढरपूरला पाठवलं. मला धक्काच बसला. माझी आई आणि माझा नवरा चक्क हातात हात घालून पंढरपूरच्या वाळवंटात फिरत होते. मला प्रचंड राग आला. त्यादिवशी नवरा ट्रकवर गेला होता. मी तिचा गळा दाबला, सगळं दागिनं काढून घेतलं अन् नवर्‍याचा मित्र यासीन याला दिलं. त्या बदल्यात त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावायची असं ठरलं. त्यानं त्याप्रमाणं केलं.’

तिला अटक झाली.

Back to top button