मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट | पुढारी | पुढारी

मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट | पुढारी

कोल्हापूर : गौरव डोंगरे

मोबाईल हा केवळ संभाषणाचे साधन उरला नसून त्यामध्ये तुमचे महत्त्वाचे फोन नंबर, कागदपत्रे, फोटो असतात. बसस्थानक, आठवडी बाजारातून मोबाईल चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेकजण तर पोलिसांत तक्रार देण्यासाठीही फिरकत नाहीत. 

तुमचा मोबाईल बँक खाते, आधार कार्ड यासह महत्त्वाच्या व्यवहारांशी लिंक असल्याने तुमच्या खिशातील मोबाईल किती सुरक्षित आहे याकडेही पाहण्याची गरज आहे. बसस्थानके, आठवडी बाजार, वर्दळीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे.

लॉकडाऊननंतर मध्यवर्ती बस स्थानक सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या परिसरात दिवसाआड मोबाईल चोरीचे प्रकार घडतात. एस.टी.मध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईलवर हात साफ करत आहेत. बाहेरगावचे प्रवासी अनेकदा त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. यामुळे गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ होताना दिसून येते.

मोबाईल सांभाळा

चोरीनंतर तुमच्या मोबाईलचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन बँकिंग, रेशन, बँक खाते, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड अशा वेगवेगळ्या खात्यांशी आता थेट मोबाईलशी संबंध येतो. तुमचे गोपनीय पिन नंबर मोबाईलवर येतात. यामुळे मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन नसून ती तुमची कुंडलीच बनली आहे.

ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढत असून तुमचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी येणारे ओटीपी क्रमांक अत्यंत गोपनीय ठेवावे लागतात. मोबाईल क्रमांक हा अनेक खात्यांशी लिंक आहे. तसेच मोबाईलमध्ये महत्त्वाचे फोन नंबर, कागदपत्रे, फोटो असल्याने याचा गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी मोबाईलबाबत अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच मोबाईल चोरीस गेल्यास त्याची तत्काळ नोंद करून सिम कार्ड बंद करणे आवश्यक आहे.

– संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल


केवळ 32 गुन्हे नोंद


शहरातील आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार घडत असले तरी विशेष बाब म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर 2020 या नऊ महिन्यांच्या कालावधीत केवळ 32 मोबाईल चोरीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी 15 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Back to top button