खत व्यवस्थापन : सेंद्रिय खतासाठी कुजवा उसाचे पाचट - पुढारी

खत व्यवस्थापन : सेंद्रिय खतासाठी कुजवा उसाचे पाचट

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षांपासून एकाच जमिनीवर उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. आणि उत्पादन खर्च मात्र वाढत चालला आहे. तसेच रासायनिक खतांच्या आणि पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे आणि गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचे पाचट शेतातच जाळल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. त्यामुळे जमिनीचा सामू 8.50 च्या वर गेला आहे.

अशीच पुनरावृत्ती दरवर्षी होत राहल्यास ऊस पिकाखालील क्षेत्र क्षारपाड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे उसाचे पाचट शेतातच जाळणे, हे आहे. म्हणून शेतजमिनीचा पोत आणि सुपीकता टिकून राहण्यासाठी ऊसाचे पाचटाचे सेंद्रिय खत तयार करून शेतजमिनीचे व्यवस्थापन करण्याचा विचार पुढे आला आहे. सेँद्रिय खत तयार करण्यासाठी उसाचे पाचट कुजविण्याच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. त्या खालीलप्रमाणे.

सर्व सरी पाचट पद्धत

सर्व सर्‍यांमध्ये  पाचट ठेवून उसाचे खुंट उघडे केले जातात आणि सरीत जेथून पाणी दिले जाते तेथील 5 ते 6 फूट अंतरावरील पाचट काढले जाते. या पद्धतीत खते फेकून न देता दोन हप्त्यात पहारीने द्यावीत.

सरी आड सरी पाचट पद्धत

यात सरी आड सरीत पाचट दाबले जातात आणि मोकळ्या सरीतून खते आणि पाणी देता येते. ज्यावेळेस ऊस तोडीच्या वाहनामुळे सरी-वरंबा सपाट झालेले असतात आणि पाणी देण्याची अडचड होते, अशा वेळी या पद्धतीचा वापर करावा.

उसाच्या पट्ट्यात पाचट कुजविणे

या पद्धतीमध्ये 2:1 या पद्धतीने उसाची लागवड केली जाते आणि पट्ट्यात पाचट दाबायचे असतात. तसेच मोकळ्या सरीतून खते आणि पाणी दिले जाते.

खड्डा पद्धत

या पद्धतीमध्ये सर्व पाचट प्लॉटच्या बाहेर काढुन खड्यात टाकून कुजविले जाते आणि नंतर वापरले जाते.

ढिग पद्धत

या पद्धतीमध्ये सर्व पाचट प्लॉटच्या बाहेर काढुन ढिग करून कुजविले जाते आणि नंतर वापरले जाते.

यांत्रिकी पद्धत

या पद्धतीमध्ये सर्व पाचट शेतातच ट्रॅक्टरला जोडलेल्या अवजारांच्या साहाय्याने बारीक केले जाते आणि नंतर वापरले जाते.
अनिल विद्याधर

हेही वाचलंत का? 

Back to top button