पिकपाणी : शेवग्याची शेती कशी करावी? | पुढारी

पिकपाणी : शेवग्याची शेती कशी करावी?

सतीश जाधव

शेतकर्‍यांना शेतीतून हमखास उत्पन्न मिळण्यासाठी शेवग्याची शेती हा चांगला पर्याय आहे. या शेतीतून शेतकर्‍याला एकरी 70 ते 80 हजार एवढे उत्पन्न मिळू शकते. त्याकरिता तज्ज्ञांनी सांगितलेल्या सूचनांची शेतकर्‍यांनी अंमलबजावणी करावी लागते.

शेवग्याचे झाड आयुर्वेदिकद़ृष्ट्या अत्यंत औषधी समजले जाते. भारतात पूर्वी शेताच्या बांधाबांधावर शेवग्याचे झाड आढळून यायचे. शेवग्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्माची माहिती सगळ्यांनाच कळल्यामुळे शेवग्याच्या शेंगांना जगभरातून मागणी वाढू लागली आहे. भारताबरोबर श्रीलंका आणि केनिया या देशांमध्ये शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. आपल्या देशाचा विचार केला, तर महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये शेवग्याचे व्यापारी पद्धतीने उत्पादन घेतले जाते. शेवग्याची पाने, फुले, शेंगा या सर्वांमध्येच अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे त्याचबरोबर कॅल्शियमसारखी खनिजे आढळून आल्याने देशाबरोबरच परदेशातूनही शेवग्याची मागणी वाढू लागली आहे.

शेवग्याच्या शेतीकडे अनेक शेतकरी वळू लागले आहेत. शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषित व्यक्तींसाठी केला जातो. शेवग्याच्या बियांपासून केलेली पावडर पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरली जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून बेन ऑईल बनविले जाते. राज्यात गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती केली जाऊ लागली आहे. शेतकर्‍यांना शेवग्यापासून मिळणारे उत्पन्न ठाऊक झाल्याने ते शेवग्याची शेती यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत

शेवग्याच्या लागवडीसाठी हलकी, मध्यम तसेच भारी यापैकीही कोणतीही जमीन चालू शकते. शेवग्यापासून चांगले उत्पन्न येण्याकरिता पाणी मात्र हमखास उपलब्ध असले पाहिजे.कडक उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात शेवग्याला अजिबात पाणी मिळाले नाहीतरी हे झाड जगते. मात्र पाणी न मिळाल्याने या झाडापासून शेतकर्‍याला काहीच उत्पन्न मिळत नाही

ज्या शेतामध्ये वर्षभर पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी सात ते आठ महिने शेवग्याचे उत्पन्न शेतकर्‍याला घेता येते. जून ते फेब्रुवारी या काळात केव्हाही शेवग्याची लागवड केली जाते. लागवड करताना 12 × 6 फुटांवर केली पाहिजे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. एकरात सहाशे झाडांची लागवड करता येते. लागवडीसाठी जमिनीत 2 × 2 आकाराचे आणि दीड फूट खोलीचे खड्डे घेतले पाहिजेत.

या खड्ड्यांमध्ये दोन घमेली शेणखत, पाचशे ग्रॅम निंबोळी पावडर, पाचशे सुपरफॉस्फेट टाकून खड्डे जमिनीबरोबर भरले पाहिजेत. ज्यांना जमिनीत खड्डे घेता येणार नाहीत, त्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने जमिनीत खोल सरी केली पाहिजे आणि त्यात वर उल्लेख केलेली खते टाकली पाहिजेत. ही खते टाकून आळे तयार करावे आणि प्रत्येक खड्ड्यात पंचेचाळीस ते साठ दिवसांची रोपे मध्यभागी लावावीत. चांगले उत्पन्न येण्यासाठी शेवग्याच्या अनेक सुधारित जाती बाजारात उपलब्ध आहेत. कोकण रुचिरा, पीकेएस, पीकेएस 2, रोहित 1 अशा अनेक जाती तयार करण्यात आल्या आहेत. कोकण रुचिरा ही जात दापोली कृषी विद्यापीठात 1992 मध्ये विकसित करण्यात आली.

या जातीच्या शेंगांची लांबी 45 ते 55 सेंटिमीटर आहे. या शेंगांचा रंग हिरवा असतो. लागवडीनंतर अडीच ते तीन वर्षांनी पहिले उत्पन्न मिळते. पीकेएस 1 ही जात तामिळनाडूतील पेराकुलम कृषी विद्यापीठाने बनवली आहे. या जातीच्या शेंगांची लांबी तीन ते साडेतीन फूट एवढी असते. लागवडीनंतर सहाच महिन्यात शेतकर्‍याला उत्पन्न सुरू होते. तीन वर्ष सहजतेने उत्पन्न मिळते. चौथ्या वर्षी फुले लागतात आणि उत्पन्नात पन्नास टक्क्यांनी घट होते. चौथ्या वर्षानंतर शेंगा वाकड्या होतात.

शेंगांवर तपकिरी रंगाचा थर दिसून येऊ लागतो त्यामुळे बाजारात किंमतही कमी मिळते. पीकेएस 2 ही जातही पेराकुलम कृषी विद्यापीठानेच तयार केली आहे. हा वाण संकरीत आहे. लागवड केल्यानंतर सहा महिन्यानंतर पहिले पिक मिळते. वर्षातून दोन वेळा बहार मिळतात. शेंगांची लांबी दोन ते अडीच फूट लांब एवढी असते. तीन वर्षांपर्यंत या जातीच्या वाणापासून उत्पन्न घेता येते. रोहित 1 हा वाण दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. व्यापारी तत्त्वावरील लागवडीसाठी हा वाण चांगला समजला जातो. या वाणाच्या शेंगा दीड ते दोन फूट लांबीच्या असतात.

सहाव्या महिन्यातच शेंगांची विक्री करता येते. वर्षातून दोन वेळा बहार मिळतात. लागवडीपासून सुमारे दहा वर्षे याच वाणापासून शेतकर्‍याला उत्पन्न मिळते. ओडिसा शेवगा ही शेवग्याची जात असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र ओडिसा ही शेवग्याची जात नाही. या पद्धतीने जर शेवग्याची लागवड केली तर ती शेतकर्‍याला आर्थिकद़ृष्ट्या काहीच फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे या पद्धतीने शेवगा लागवड करू नये.

हमखास पाणी असलेल्या जमीन क्षेत्रात शेवग्यापासून एकरी दीड ते सव्वादोन लाख रुपये दर वर्षाला मिळू शकतात. फेब्रुवारीपर्यंतच ज्या जमिनीत पाणी मिळते, त्या जमिनीत एकरात 80 ते 85 हजार एवढे उत्पन्न मिळते. सध्याच्या बाजारभावानुसार शेवग्याला प्रती किलो 25 ते 60 रुपये असे, दर मिळतात. शेवग्याला फार पाणी लागत नाही. तसेच मजुरांवरही फारसा खर्च करावा लागत नाही. यामुळेच शेवग्याची शेती शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते. अनेक शेतकर्‍यांनी कमी पाण्यातही शेवग्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आणि आडवी अशी दोनदा नांगरट केली जाते.

या नांगरटीद्वारे जमीन भुसभुशीत केली जाते. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर एकरी एक ट्रॉली या प्रमाणात शेणखत दिले जाते. शेणखत दिल्यानंतर 10-10 फुटांवर सर्‍या पाडून सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी दिले तर चांगले उत्पन्न मिळते. लागवडीनंतर साधारण तीन आठवड्याने प्रत्येक झाडाला 50 ग्रॅम याप्रमाणे 10:26:26 हे खत दिले. 40 दिवसांनी 15:15:15 या खताचा डोस प्रती झाड 100 ग्रॅम याप्रमाणे दिला पाहिजे. दोन महिन्यानंतर प्रती झाड 200 ग्रॅम या प्रमाणात 10:26:26 असा खताचा डोस द्यावा. त्यानंतर महिन्याच्या अंतराने सहाव्या महिन्यापर्यंत 10:26:26 हे खतच प्रती झाड 200 ग्रॅम या प्रमाणात दिले पाहिजे.

शेवग्याच्या झाडावर कीड आणि रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसतो. ढगाळ वातावरण पडले तर शेवग्याच्या झाडावर कीड पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ढगाळ वातावरण पडल्यास प्रतिबंधात्मक फवारणी करून घेणे आवश्यक ठरते. अनेक दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले तर पंधरा दिवसाच्या अंतराने कीडनाशकाच्या दोन फवारण्या घेणे आवश्यक आहे. काही शेतकरी शेवग्याच्या पिकासाठी गांडूळ खताचाही वापर करतात. प्रती झाड 200 ते 300 ग्रॅम या प्रमाणात गांडूळ खत दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.

शेवग्याला पाणी दिल्यानंतर मे महिन्यापर्यंत उत्पादन मिळू शकते. काही शेतकरी एप्रिलमध्येच शेवग्याचे पाणी बंद करतात आणि शेवगा काढून घेतात. त्यानंतर शेवग्याचे झाड पाणी नसल्याने कोरडे पडते. मे महिन्यात सर्वत्र कोरडे हवामान असते. त्यामुळे या काळात झाडाची छाटणी केली पाहिजे. छाटणीनंतर बोडीपेस्टचे मिश्रण झाडाला लावावे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर 10:26:26 या खताची मात्रा प्रती झाड 200 ग्रॅम याप्रमाणे महिन्याच्या अंतराने दिली पाहिजे. या काळात झाडावर डेर वाढीला लागले आहे, असे दिसल्यास ते त्वरेने काढून टाकणे आवश्यक असते. अशा डेरांना फूलधारणा होत नाही, मात्र हे डेर झाडाचे अन्नद्रव्य शोषून घेतात.

परिणामी शेतकर्‍याला मिळणारे उत्पादन कमी होते. म्हणूनच हे डेर तत्काळ काढले पाहिजे. सप्टेंबरमध्ये काही काळ पाऊस थांबताच फूलगळ होते. त्यामुळे अशा वेळी पंधरा दिवसाच्या अंतराने झाडावर संजीवकाची फवारणी दोनदा करावी. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत शेवग्याच्या शेंगा मिळतच राहतात. शेवग्याच्या एका झाडाला साधारणपणे सातशे शेंगा लागतात. शेंगांमध्ये जर गर चांगला असेल तर त्याची जाडीही चांगली असते.

शेंगांची निर्यात करायची असेल तर शेंगांची लांबी दोन ते अडीच फूट असली पाहिजे. अशा शेंगांचे वजन 200 ते 225 ग्रॅमपर्यंत भरते. एका झाडापासून जवळपास साडेदहा किलो एवढ्या शेंगा मिळतात. त्या काढल्यानंतर त्याची प्रतवारी केली जाते. पहिल्या प्रतीची शेंग, दुसर्‍या प्रतीची शेंग अशी वर्गवारी करून या शेंगा मागणीनुसार कोणत्या बाजारपेठेत पाठवायच्या याचा निर्णय शेतकर्‍याला घ्यायचा असतो. शेंगांना चांगला भाव मिळणार का, हे तुम्ही कोणती बाजारपेठ निवडता यावर अवलंबून असते. शेवग्याच्या लागवडीनंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती खताची मात्रा वेळेवर दिली तसेच कीड प्रतिबंधक औषधांची फवारणी वेळेवर केली तर या पिकापासून शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळते.

वाळलेल्या शेंगांच्या बियांची पावडर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे आपल्या शेंगांच्या पावडरची अनेक देशांमध्ये निर्यात होते. अनेक जण आपल्या बंगल्याच्या तसेच फार्म हाऊसच्या भोवतीही शेवग्याच्या शेंगा लावतात. अशा लागवडीपासूनही आपल्याला उत्पन्न मिळू शकते. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार पीकेएम-2 हा वाण निर्यातीसाठी योग्य आहे. त्यामुळे या वाणाचीच लागवड करावी. याखेरीज दत्त शेवगा, शबनम, जीकेव्हीके 1 व जीकेव्ही 3, चेनमुरींगा, चावाकाचेरी आदी जातीही आपल्याला आढळून येतात. मात्र पीकेएम-2 सारखे उत्पन्न कोणत्याचा वाणातून मिळत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वर्षभर ज्या जमिनीत पाण्याची उपलब्धता आहे, त्या जमिनीत पाच ते आठ टन शेंगाचे उत्पन्न मिळते. यातून सुमारे 80 ते 90 हजार एवढा फायदा शेतकर्‍याला मिळतो. अनेक शेतकर्‍यांनी बागायती शेतीमध्ये एकरी 70 हजार ते सव्वालाख रुपये एवढे उत्पन्न शेवग्याच्या शेतीतून मिळवले आहे. शेवग्याला स्थानिक बाजारपेठेबरोबरच पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. शेवग्याची स्वतंत्र लागवड करण्याबरोबरच सीताफळ किंवा आवळा, आंबा, पेरू यांसारख्या फळझाडांमध्ये शेवगा आंतरपीक म्हणूनही घेता येतो

हलक्या तसेच माळरानाच्या जमिनीतही शेवग्याचे पीक चांगले येते. चांगल्या उत्पादनासाठी शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा दिली पाहिजे. शेणखत व लेंडीखत जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर दिले पाहिजे. निंबोळी पेंड व गांडूळ खताचा वापर ज्यांना शक्य आहे, त्यांनी करावा. दुसर्‍या वर्षी प्रत्येक झाडापासून पंधरा ते वीस किलो एवढ्या शेंगा मिळतात. पुढे जसजसे वय वाढते तसतसे शेवग्याच्या शेंगांचे उत्पन्नही वाढते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने विचार केला तर शेवग्याची शेती ही चांगलीच फायदेशीर ठरते, असे दिसून येते. भरपूर पाण्याची पिके घेण्याऐवजी कमी खर्चिक शेवग्याची शेती शेतकर्‍यासाठी वरदान ठरणारी आहे.

 

 

 

 

Back to top button