फळपीक : पेरू लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा | पुढारी

फळपीक : पेरू लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा

विलास कदम

गरिबांचे सफरचंद म्हणून पेरू ओळखला जातो. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पेरूचे पीक घेता येते. यासाठी पाण्याची आवश्यकताही कमी लागते. त्यामुळे दुष्काळी भागातही या पिकाची लागवड करता येते. हवामानाच्या द़ृष्टीने हे पीक बरेच लवचीक असल्यामुळे ते वेगवेगळ्या विभागांत येऊ शकते. हिवाळ्यात जास्त थंडी असलेल्या प्रदेशात पेरूच्या फळांची गुणवत्ता चांगली असते. बाजारातही पेरूला नेहमीच मागणी असते. त्यामुळे याची लागवड करून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवता येईल.

सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग विकास या योजनेमुळे पेरूच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. पेरूचे फळ स्वस्त आणि रुचकर असून गरीब माणसाची फळ खाण्याची हौस भागविते. म्हणूनच हे फळ गरिबांचे सफरचंद म्हणून ओळखले जाते. पेरूच्या फळापासून आपणास क जीवनसत्त्व पुरविले जाते. लिंबूवर्गीय फळांपेक्षा जीवनसत्त्वाचे प्रमाण पेरूमध्ये 3 ते 4 पट अधिक आहे. आहारद़ृष्ट्या उत्तम, कणखर, कमी पाण्यावर येणारे आणि आर्थिकद़ृष्ट्या फायदेशीर फळझाड म्हणून पेरूच्या लागवडीकडे पाहिले जाते.

पेरूचे मजबूत लाकूड बाजाच्या पेट्या, नक्षीकाम इत्यादीसाठी उपयोगात आणतात. याची साल आणि सुकलेली पाने यांचा भगवा रंग बनवून तो कपडे रंगवण्यासाठी वापरतात. याची साल आवेवर औषध म्हणून वापरली जाते. पेरूच्या सालीच्या रसाने जखमा बर्‍या होतात. साल पाण्यात उकळून गुळण्या केल्यास दातांचे दुखणे थांबते. पेरू खाल्ल्यामुळे पचनपक्रिया सुधारते, पोट साफ राहते. उष्ण आणि समशितोष्ण हवामानात पेरूची लागवड प्रामुख्याने केली जाते.

परंतु हवामानाच्या दृष्टीने हे पीक बरेच लवचीक असल्यामुळे ते वेगवेगळ्या विभागांत येऊ शकते. हिवाळ्यात जास्त थंडी असलेल्या प्रदेशात पेरूच्या फळांची गुणवत्ता चांगली असते. पाण्याचा ताण जरी पडला तरी पेरूचे झाड तग धरू शकते. पेरूला ठरावीक जमीन पाहिजे, असे नाही. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पेरू उत्तम येऊ शकतो. हलकी मध्यम काळी जमीन पेरूच्या लागवडीस चांगली असते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास सेंद्रिय खतांचा वापर भरपूर प्रमाणात करावा.

हलकी जमीन निवडताना त्या जमिनीत कमीत कमी 1 मिटर खोलीपर्यंत माती असल्याची खात्री करून घ्यावी. पोयट्याची, पाण्याचा निचरा उत्तम होणारी एाकाच प्रतीची जमीन पेरूसाठी आदर्श समजली जाते. पाण्याचा निचरा न होणार्‍या चोपण, चुनखडीच्या जमिनी पेरू लागवडीसाठी निवडू नयेत. पेरूच्या फळातील गरावरून सफेद पेरू आणि गुलाबी पेरू अशा दोन जाती आढळून येतात. सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे.

पेरूच्या आकारमानावरूनही जातीचे वर्गीकरण केले जाते. पेरूची अभिवृद्धी बियांपासून करता येत असली तरी रोपात मातृवृक्षातील सर्व गुण येत नाहीत. त्यासाठी अभिवृद्धी कलमे वापरून करणे चांगले. दाब कलम, गुटी कलम आणि भेट कलमाद्वारे अभिवृद्धी शक्य आहे. यापैकी दाबकलमे जास्त प्रचलित आहेत.

कलम कोणत्याही प्रकारचे असले तरीही हरकत नाही. परंतु ते खात्रीशीर, जातिवंत आणि जास्त उत्पादन देणार्‍या झाडांपासून तयार केलेले असावे. त्यासाठी कलमे सरकारी अथवा खात्रीच्या खासगी रोपवाटिकेतून घ्यावीत. उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावीत आणि जमीन सपाट करावी. जमिनीची आखणी करून खड्डे घ्यावेत.

हे खड्डे उन्हात चांगले तापू द्यावेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला खड्डे भरावेत. खड्डा भरताना तळाशी पालापाचोळा टाकावा. नंतर 15 ते 20 किलो शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम बीएचसी भुकटी आणि पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरावा. पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा जोराचा पाऊस संपल्यावर कलमे शेतात लावावीत. रोपणीनंतर कलमाभोवतालची माती चांगली दाबून घ्यावी आणि पाणी द्यावे. कलमांना आधार द्यावा.

पाऊस वेळच्यावेळी पडत राहिल्यास झाडाची वाढ झपाट्याने होते. उंची एक मिटर झाल्यानंतर झाडाचा शेंडा खुडावा. टोकाकडील भागावर 20 ते 30 सेंमी अंतर ठेवून चारी बाजूंनी विखुरलेल्या 4 ते 5 जोमदार फांद्या वाढू द्याव्यात. मुख्य खोडावरील बगलफूट काढून टाकवी. रोपाची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी पहिल्या वर्षी 150 ग्रॅम नत्र 3 हप्त्यात विभागून द्यावे. दुसर्‍या वर्षी प्रत्येक झाडास 2 घमेली शेणखत आणि 200 ग्रॅम नत्र 3 हप्त्यात विभागून द्यावे. तिसर्‍या वर्षी 4 ते 5 घमेली शेणखत, 250 ग्रॅम नत्र 3 हप्त्यात आणि 125 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालांश जून महिन्यात द्यावे.

चौथ्या वर्षापासून फळधारणेस सुरुवात होते. यावर्षी प्रत्येक झाडास 5 ते 6 घमेली 900 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 300 ग्रॅम पालाश आवश्यक असते. पेरूला प्रथम 3 वर्षे थोडे; परंतु नियमित पाणी देणे आवश्यक आहे. जेथे साधारण 50 सें.मी. पाऊस पडतो आणि जमीन मध्यम भारीची आहे, तेथे हिवाळ्यात 20 दिवसांनी आणि उन्हाळ्यात 10 दिवसांनी पाणी द्यावे. हलक्या जमिनीत 10 ते 15 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले निघाल्यापासून फक्त तयार होईपर्यंत पाण्याची उणीव भासू देऊ नये. एका बहाराची फुले निघाल्यापासून दुसर्‍या धरावयाच्या बहाराची फुले लागण्याच्या काळापर्यंत बागेत पाणी जरूरीपुरते द्यावे.

हवामान, पाणी पुरवठा, किडींचा प्रादुर्भाव होण्याची वेळ, आपल्या भागातील बाजारपेठेत फळांना मिळणारा भाव या बाबी लक्षात घेऊन आंबेबहार, हस्तबहार किंवा मृगबहार यांपैकी एकाची निवड करावी. बहुतांशी उन्हाळी महिन्यांत पाणीपुरवठा अपुरा असलेल्या ठिकाणीच पेरूची लागवड करीत असल्यामुळे मृगबहार धरणे सयुक्तिक होईल.

या बहारातील फळांना फळमाशीचा त्रास कमी प्रमाणात संभवतो. मृगबहार धरावयाचा असल्यास मार्च महिन्यापासून पाणी कमी कमी करत जाऊन एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात बाग ताणात टाकावी. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर बागेत टिचणी करून घ्यावी. पाऊस सुरू होताच दरझाड 450 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश द्यावे. राहिलेले 450 ग्रॅम नत्र त्यानंतर दोन हप्त्यांत 1-1 महिन्याच्या अंतराने विभागून द्यावे. मृगबहारात फूलधारणा जून-जुलै महिन्यांत होऊन फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात. फळे चांगल्या गुणवत्तेची मिळतात. फळधारणेनंतर पाऊस नसल्यास आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे. म्हणजे फळे सुकत किंवा गळत नाहीत.

पेरूची कलमे लावल्यानंतर दुसर्‍या वर्षापासून त्यांना फुले-फळे धरू लागतात. झाडांच्या चांगल्या वाढीकरिता पहिली 4 वर्षे झाडांवर फळे घेऊ नयेत. कारण या काळात झाडांस योग्य वळण देऊन झाडांची चांगली वाढ होणे आवश्यक आहे. या काळात फळांचे उत्पादन मिळत नसल्याने आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. भुईमूग,भाजीपाला यासारखी आंतरपिके किफायतशीर आहेत. मात्र उंच वाढणारी आणि झाडांना स्पर्धा करणारी आंतरपिके घेऊ नयेत.

महाराष्ट्रामध्ये मृगबहार मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. या बहाराची फळे नोव्हेंबर महिन्यापासून तयार होऊ लागतात आणि जानेवारीपर्यंत फळे मिळतात. पिकलेल्या फळांचा गडद हिरवा रंग बदलत जाऊन तो पिवळट होतो आणि फळ हातास नरम वाटते. फळे काढल्यानंतर 2 ते 3 दिवस टिकत असल्यामुळे दूरच्या बाजारात फळे पाठवायची असल्यास पूर्ण पिकण्याच्या अगोदरच ती काढून घ्यावीत.

साधारणपणे फळे देठापासून मोकळी केली जातात. काही वेळा फळे थोडासा देठ आणि दोन पाने ठेवून काढतात. परंतु देठ इतर फळांना लागून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून देठाचा भाग न ठेवता फळे तोडणे उत्तम. फळे झाडावरून काढल्यावर ती गवतात ठेवावीत आणि नंतर प्रतवारी करून बांबूच्या करंड्यात भरावीत. फळे करंड्यात भरताना पानांचा रस नरम थर म्हणून उपयोग होतो.

पेरूवर फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पूर्ण वाढ झालेली मादी फळांच्या सालीमध्ये भोक पाडून अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणार्‍या अळ्या फळ पोखरून गरावर पोसतात. त्यामुळे फळे कुजतात. अळ्या मोठ्या होतात. तसतसा फळांचा कुजलेला भाग वाढत जाऊन फळे गळतात. फळमाशीचा जीवनक्रम फळामध्ये पूर्ण होत असल्याने तिचा बंदोबस्त करणे अवघड आहे. याकरिता किडींचा जास्तीत जास्त त्रास पावसाळ्यात होतो म्हणून आंबेबहार घेऊ नये. झाडाखाली पडलेली फुले आणि फळे गोळा करून पुरून टाकावीत. फुले आणि फळे येण्याच्या मोसमात कार्बावरील 2 किलो 500 लिटर पाण्यात किंवा 0.03 टक्के फॉस्फॉमिडॉन, 150 मि. लि. 500 लिटर पाण्यात दर हेक्टरी 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

गरीब आणि श्रीमंत अशा सर्व थरांतील लोकांत पेरूचे फळ लोकप्रिय आहे. पेरूच्या फळामध्ये पेक्टीनचे प्रमाण अधिक असते. पेरूच्या फळापासून जेली उत्कृष्ट होते. तसेच जाम, सॅलेड, चीज, पुडींग, आईस्क्रीम पावडर, रस हे पदार्थ कमी पिकलेल्या पेरूंच्या फळांपासून तयार करतात. पोटभर पेरू खाल्ला तर ते एक पूरक अन्न होते. अशा पद्धतीने कोणत्याही शेतकर्‍याला पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येईल.

 

Back to top button