कांदा पीक लागवड कशी करावी? | पुढारी

कांदा पीक लागवड कशी करावी?

कांदा हे हिवाळी हंगामातील पीक असून, महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.

कांद्याची वाढ आणि बीजोत्पादन हे तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यावर अवलंबून असते. कांद्यामध्ये लहान दिवसांत वाढणार्‍या (शॉर्ट डे) आणि मोठ्या दिवसांत वाढणार्‍या (लाँग डे) अशा दोन प्रकारच्या जाती असतात. म्हणूनच खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी वेगवेगळ्या जाती निवडणे आवश्यक असते. लहान दिवसात वाढणार्‍या जातीपेक्षा मोठ्या दिवसांत वाढणार्‍या जाती चांगल्याप्रकारे वाढू शकतात. परंतु; जास्त दिवसांत वाढणार्‍या जाती कमी दिवसांत लावल्या तर त्यांची फक्त पालेवाढ होते आणि कांदे चांगले पोसत नाहीत.

कांदा पिकाच्या लागवडीनंतर गाठ थोडी मोठी होत असताना 12 ते 15 अंश सेल्सिअस, कांदा पोसत असताना 15 ते 20 अंश सेल्सिअस आणि कांदा काढणीच्या वेळी 25 ते 30 अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते. कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांत तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढते.

Back to top button