पेंडी खत : पेंडीच्या खतांचे फायदे काय आहेत? | पुढारी

पेंडी खत : पेंडीच्या खतांचे फायदे काय आहेत?

- अभिमन्यू सरनाईक

गळीत धान्यापासून तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या चोथ्यास ‘पेंड’ असे म्हणतात. (पेंडी खत) भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 30 लाख टन पेंडीचे उत्पादन होते. (पेंडी खत) बर्‍याचशा पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असून, त्या खालोखाल स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण आढळते. याशिवाय त्यांच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. नत्राच्या जास्त प्रमाणामुळे अशा खतांना नत्रयुक्त सेंद्रिय खत असेही म्हणतात.

पेंडीच्या प्रकारानुसार पेंडीमध्ये सर्वसाधारणपणे 3.90 ते 7.10 टक्के नत्र, 0.9 ते 2.8 टक्के स्फुरद आणि 0.70 ते 2.50 टक्के पालाश असते. पेंडीचे ‘खाद्य पेंडी’ आणि ‘अखाद्य पेंडी’ असे दोन प्रकार पडतात. खाद्य पेंडी या खतांच्या उपयोगाशिवाय जनावरांना खाऊ घालण्यासाठी सकस अन्न म्हणून उपयोगी पडते. एकूण पेंडीपैकी 85 टक्के अन्न म्हणून उपयोगी आहेत आणि 15 टक्के अखाद्य पेंडी त्याच्या कडवट आणि उग्र वासामुळे वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यास उपयोग होतो. भुईमूग आणि करडईच्या पेंडीत नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या लवकर कुजतात आणि त्यातील अन्नांश पिकांना लवकर उपलब्ध होतात.

भुईमुगाची पेंड पिकांना फारच उपयुक्त असते. पेंडीची पावडर करून ती ओलसर जमिनीत पेरणीपूर्वी घालतात. ही पेंड दीड ते दोन महिन्यात पिकांना लागू पडते. पिकावर एक ते दोन आठवड्यांनंतर पेंडीचा परिणाम दिसतो.

महुआ पेंड मात्र यास अपवाद आहे. कारण, यामधील नत्र जमिनीत टाकल्यानंतर दोन महिन्यांनंतर पिकांना उपलब्ध होतो. पारंपरिक पद्धतीने तेल काढल्यास पेंडीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे विघटन होत नाही आणि त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सावकाश उपलब्ध होतात. परंतु, सुधारित पद्धतीने तेल काढल्यांतर पेंडीमध्ये फक्त 1 ते 2 टक्के तेल शिल्लक राहते. पेंडीचे विघटन लवकर होण्यासाठी ओलाव्याची जरुरी असल्याने जेथे जास्त पाऊस पडतो किंवा पाण्याची उपलब्धता असते तेथे पेंडीचा चांगला उपयोग होतो.

शेंगदाणा पेंडीचा उपयोग लागणीनंतर उभ्या पिकांना करता येतो. पिकांच्या प्रकाराप्रमाणे पेंडीची खते विस्कटून, पेरून किंवा मुळांच्या सान्निध्यात टाकावीत. या खतांचा उपयोग फळबागांसाठी खूपच चांगला होतो.

हे ही वाचा :

Back to top button