दुधाळ जनावरे आणि सकस आहार | पुढारी

दुधाळ जनावरे आणि सकस आहार

दूधवाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार हा खूप महत्त्वाचा आहे. गायी, म्हशींच्या पचनसंस्थेवर गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबून आहे. हे लक्षात घेऊनच चारा, पाणी व इतर आहार याबाबतचे नियोजन करायला हवे.

गायी, म्हशींच्या आहारात सुकी वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयरीत्या ठरवावे. दुधाळ गायी, म्हशींच्या आहारात एकदल, द्विदल चार्‍याचा समावेश करावा. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चार्‍याचे मिश्रण करावे. गायी, म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्न घटकांची योग्य प्रमाणात गरज असते.

दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते. दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात. म्हणूनच दूध निर्मितीसाठी दुधाळ गायी, म्हशींच्या आचळांमार्फत साधारणतः 400 ते 450 लिटर रक्ताचे अभिसरण होते. म्हणजेच गायी, म्हशींच्या रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार केले जातात. आपण खाद्यामार्फत अन्नघटक पुरविले नाहीत, तर जनावरे स्वतःच्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा वापरतात. शेवटी याचा एकंदरीत परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. हे सर्व टाळण्याकरिता जनावरांसाठी समतोल आहार व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

हिरवा चारा : गायी, म्हशींचे प्रकृतिमान सुधारणे, दूध उत्पादन वाढवणे आणि वाढलेले दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे असते. हिरवा चारा वाळलेला चारा व खुराक यांच्या माध्यमातून आपण जनावरांना समतोल आहाराचा पुरवठा करतो. जनावरांच्या आहारातील खुराक हा त्यांच्या दूध उत्पादनावर ठरावला जातो. चार्‍याचे प्रमाण हे त्यांच्या शारीरिक वजनानुसार ठरवितात.

पूर्ण वाढ झालेल्या जनावराला त्याच्या वजनाच्या 6 टक्के हिरवा चारा, 1 ते 1.5 टक्के वाळलेला चारा द्यावा लागतो. 300 किलोच्या जनावरांसाठी 18 किलो हिरवा चारा, 3 ते 5 किलो वाळलेला चारा 24 तासांसाठी आवश्यक असतो. चांगला पौष्टिक हिरवा चारा जनावरांना दिल्याने दूध उत्पादनात वाढ होते. त्याव्यतिरिक्त आलाप खुराकावरील खर्चही कमी होतो. जनावरांच्या आहारात सुकी वैरण, हिरवा चारा व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्त्रीयरीत्या ठरवावे. साधारणपणे 400 किलो वजनाच्या जनावराला 12 किलो शुष्क आहार द्यावा. त्यातील दोन तृतीयांश भाग सुका वैरणीच्या आणि एक तृतीयांश हिरवा चार्‍याच्या स्वरूपात द्यावा. जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी 300 ते 400 ग्रॅम पशुखाद्याची गरज असते. दुधावाटे बाहेर पडणार्‍या कॅल्शिअम, फॉस्फरस या घटकांच्या भरपाईसाठी खाद्यासमवेत 50 ते 100 ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.

6 ते 7 किलो लुसर्न चारा, बरसीम किंवा चवळी चारा जनावरांना दिल्याने आलापावरील खर्च कमी होतो. दुधाळ जनावरांच्या आहारात एकदल, द्विदल चार्‍याचा समावेश करावा. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चार्‍याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चार्‍यात मका, बाजरी, ज्वारी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब—ीड नेपिअर-6 आणि हायब—ीड नेपियर गवताचा समावेश असतो.

एकदल चार्‍यात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त, तर प्रथिनांचे प्रमाण कमी असते. द्विदल प्रकारातील हिरव्या चार्‍यात बरसीम, लुसर्न, चवळी स्टायलो, दशरथ गवत यांचा समावेश असतो. द्विदल चारा एकदल हिरव्या चार्‍याच्या तुलनेत जास्त पौष्टिक असतो यामध्ये प्रथिने, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते.

हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांच्या कोठीपोटातील प्रोपिऑनिक आम्लाचे प्रमाण वाढते. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते, तर उच्च गुणवत्तेच्या कोरड्या चार्‍याने सिटिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढते. यामुळे दुधातील फॅट उत्पादनात वाढ होते. हिरव्या चार्‍यात प्रथिने,
स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असतात. हिरवा चारा चिकाच्या किंवा फुलोर्‍यात असताना जनावरांना खायला द्यावा. अशा चार्‍यातून जास्तीत जास्त अन्नघटक मिळू शकतात. हिरवा चारा पालेदार असावा. हिरवा चारा व गवतामध्ये लवकर विरघळणार्‍या साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे जनावरांना हिरवा चारा दिल्याने रवंथ करण्याच्या प्रकियेला कमी वेळ लागतो. तसेच, पचन क्रियेमध्ये प्रोपिऑनिक आम्लाचे प्रमाण वाढते आणि मिथेन वायूचे कोठीपोटातील प्रमाण कमी होते. अप्रत्यक्षरीत्या पर्यावरण संरक्षण होते. हिरव्या चार्‍यामध्ये कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रजनन क्षमता चांगली राहते.

वाळलेला चार्‍याचा वापर : वाळलेल्या चार्‍यामध्ये ज्वारी, मका, बाजरी यांची कडबा कुट्टी, भात पेंढा, गव्हांडा आणि पर्याय नसल्यास सोयाबीनचे कुटार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वाळलेल्या चार्‍यात 5-10 टक्के पाण्याचे प्रमाण असते. हिरव्या चार्‍यात 70 ते 85 टक्के पाण्याचे प्रमाण असते. यामुळे जनावरांना पोट भरल्याचा समाधान वाटते. सुका चारा खाल्याने दुभत्या जनावरांच्या कोठीपोटातील सिटिक आम्लाचे प्रमाण वाढते. सिटिक आम्ल दुधातील फॅट तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने कोरड्या चार्‍यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

– डॉ. कुलदीप देशपांडे

Back to top button