हिवाळ्यातील फळबागांचे व्यवस्थापन | पुढारी

हिवाळ्यातील फळबागांचे व्यवस्थापन

* सर्वप्रथम फळबागेची स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.

* पिकांचे पाणी व्यवस्थापन व अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.

* बागेच्या पश्चिम – उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करावी. यामुळे जोराने वाहणार्‍या थंड वार्‍यापासून बागेचा बचाव करता येईल. योग्य प्रकारे प्रतिबंधक झाडांची लागवड केल्यामुळे बागेतील सूक्ष्म हवामान अनुकूल राहण्यास मदत होते. वारा प्रतिबंधक म्हणून प्रामुख्याने करंज, पांगेरा, शेवगा, निर्गुडी, शेवरी, इ. झाडांची लागवड करावी.

* बागेमध्ये आंतर पीक म्हणून डाळवर्गीय किंवा द्विदल चारा पिके घ्यावीत. उदा. वाटाणा, चवळी, घेवडा, ताग, नेपियर, गवत इ. यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. हिवाळी हंगामानंतर या पिकाचा फायदा जमिनीतील सुपीकता वाढण्यासाठी होतो.

* फळबागेस सिंचन देताना विहिरीचे अथवा बोअरचे पाणी असेल तर सकाळी द्यावे. शेत तलाव किंवा पाटपाणी असेल तर सायंकाळी द्यावे. तुषार किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाची पद्धत अवलंबल्यास अधिक फायदा मिळतो. त्यामुळे पिकाचे आणि जमिनीलगतच्या हवेचे उष्णतामान थोडे वाढून योग्य सूक्ष्म वातावरण राहण्यास मदत होते. यामुळे पिकांवर होणारा थंडीचा परिणाम टाळता येऊ शकतो.

* जैविक उपलब्ध साधने, शेडनेट, बारदाना अथवा काळे पॉलिथिन यापैकी उपलब्ध होणार्‍या घटकांनी नवीन कलमांचे संरक्षण करावे.
बागेत वाळलेली पाने, शेणाच्या गोवर्‍या किंवा इतर लाकूड फाटा जाळून शेकोट्या पेटवाव्यात. रात्री अशा जागोजागी पेटवलेल्या शेकोट्या व धूर यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते. पिकांचे संरक्षण होते. मात्र, जाळ किंवा शेकोटी यामुळे बागेतील झाडांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* संपूर्णपणे नियंत्रित संरक्षित शेतीमध्ये हिटिंग कॉइल आणि पंखे याद्वारे सूक्ष्म वातावरण योग्य राखता येते. परदेशामध्ये तापमानात नियमित घट होणार्‍या ठिकाणी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्याकडे यासाठी अधिक प्राथमिक गुंतवणूक करणे फारसे व्यवहार्य ठरणार नाही.

* फळझाडांच्या वाफ्यांमध्ये शक्यतो गवत, विविध प्रकारचे काड, उसाचे पाचट, कडबा किंवा बाजरीचे तूस इ. आच्छादन करावे. यामुळे पिकांतील सूक्ष्म हवामान सुयोग्य राहण्यास मदत होते.

* थंडीच्या काळात फळगळ रोखण्यासाठी झाडाच्या वयोमानानुसार प्रतिझाड 200 ते 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीतून द्यावे.

* हिवाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या थंडीचा परिणाम कृषी क्षेत्रामध्ये घेतल्या जाणार्‍या विविध पिकांवर विशेषतः फळबागांवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.

– डॉ. प्रल्हाद जायभाये, कृषितज्ज्ञ

Back to top button