सेंद्रिय पद्धतीने डाळिंब शेती करताय? | पुढारी

सेंद्रिय पद्धतीने डाळिंब शेती करताय?

डाळिंब शेती : डाळिंब बाग धरण्यापूर्वी एक महिना अगोदर सेंद्रिय खत, शेणखत, मोठे मीठ, जीवामृत एकत्र करून केलेला पूर्ण डोस झाडाच्या मागे व पुढे असणार्‍या ड्रीपरखाली पसरवून टाकावा. खड्डा घेऊन टाकण्याची गरज नाही. पाच दिवस भरपूर पाणी द्यावे. सहाव्या दिवसांपासून 30 दिवसांपर्यंत रोज एक तास पाणी द्यावे. याच वेळी 16 व्या दिवशी व 26 व्या दिवशी प्रतिलिटर पाण्यासोबत 2 मिली व्हर्मीगोल्ड प्लस+2 मिली बायो एन्झाईम प्लस + 4 मिली देशी गायीचे गोमूत्र + 2 मिली 0:52:34 सेंद्रिय द्रवरूप एन.पी.के. मिक्स करून फवारण्या द्याव्यात.

30 दिवसांनंतर बाग ताणावर सोडावी. बाग ताणावर सोडल्यानंतर दहाव्या दिवशी परत वरील फवारणी द्यावी. बाग ताणावर सोडल्यानंतर पंधराव्या दिवशी व त्यानंतर आठव्या दिवशी अर्धा मिली इथेल अशा दोन फवारण्या द्याव्यात. त्यानंतर आठ दिवसांनी अडीच ते 3 मिली इथेलची फवारणी पानगळीसाठी करावी.

पूर्ण पानगळ झाल्यानंतर बागेची छाटणी करण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा वर सांगितलेला खताचा डोस ड्रिपरखाली पसरवून टाकावा. (खताचे डोसचे प्रमाण एकरी आहे.) छाटणीनंतर बोर्डेची फवारणी झाल्यावर दुसर्‍या दिवशी 2 तास पाणी द्यावे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 1 तास पाणी द्यावे. त्यानंतर पाणी पूर्ण बंद करावे. 15 दिवसांनी 2 तास पाणी द्यावे. त्यानंतर 10 दिवसांनी 2 तास पाणी द्यावे.

बोर्डीनंतर 15 दिवसांनी चिलेटेड झिंक 2 ग्रॅमची फवारणी करावी. त्यानंतर 3 दिवसांनी प्रतिलिटर पाण्यासोबत 2 मिली फ्लॉवर किंग + 2 मिली 12:32:16+2 मिली बायो एन्झाईम प्लसची फवारणी द्यावी. त्यानंतर 3 दिवसांनी प्रतिलिटर पाण्यासोबत 3 मिली लिवोसीनची फवारणी द्यावी.

यावेळी कळी निघालेली असेल. यावेळी प्रतिलिटर पाण्यासोबत 2 मिली पेट्रिक्स + 2 मिली बायो एन्झाईमची फवारणी द्यावी. यानंतर 3 दिवसांनी 1 मिली प्लॅनोपिक्सची फवारणी द्यावी. या ठिकाणी कळी निघेपर्यंतचे अत्यंत महत्त्वाचे खत व फवारणी व्यवस्थापन दिले आहे.

– विलास कदम 

Back to top button