कीड-रोग : उसाचे बेण्याद्वारे पसरणारे रोग आणि नियंत्रण | पुढारी

कीड-रोग : उसाचे बेण्याद्वारे पसरणारे रोग आणि नियंत्रण

अलीकडे ऊस पिकांवर आढळणार्‍या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. याला एकाच भागात या पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड या गोष्टी कारणीभूत आहेत.

ऊस हे देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. भारतात साधारणपणे 50 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. ऊस पीक लागवड आणि साखर उत्पादन याबाबतीत महाराष्ट्र हे राज्य देशात नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. राज्यात देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी जवळजवळ 25 टक्के म्हणजेच 14.88 लाख हेक्टर क्षेत्र (लागण हंगाम 2021-22) उसाखाली असते. ऊस या पिकांवर आधारित सहकारी आणि खासगी साखर कारखानदारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यशस्वीपणे चालल्यामुळे काही हंगामाचा अपवाद वगळता या पिकाखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ झाली. साखर उद्योगाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव प्रगती केलेली आहे. राज्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उत्कर्षात साखर उद्योगाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. साखर उद्योगाचे यश हे गाळप हंगामात कारखान्याच्या गरजेप्रमाणे शेतकर्‍यांनी निर्माण करून पुरवठा केलेल्या परिपक्व उसाच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

महाराष्ट्रात गळीत हंगाम 2021-22 मध्ये राज्यात एकूण 200, 98 खासगी तसेच 102 सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यातील ऊस पिकाच्या 14. 88 लाख हेक्टर नोंद क्षेत्रातून 1322.39 लाख मे. टनाचे गाळप होऊन 137.20 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले; सरासरी साखर उतारा 10.38 टक्के इतका होता तर प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता साधारणपणे 95 टन इतकी होती. उसाचे व साखरेचे हेक्टरी उत्पादन घटण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी ऊस पिकांवर होणार्‍या रोगांचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. अलीकडे ऊस पिकांवर आढळणार्‍या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. याला एकाच भागात या पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या ऊस जातींची लागवड, ऊस बेण्यांची अनिर्बंध ने-आण, समस्यायुक्त जमिनी, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा असंतुलित व अवेळी वापर ही कारणे आहेत. तर अपुरी पूर्व व आंतरमशागत, किडींचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव, पाण्याचा ताण, अति पाण्याचा वापर, अतिवृष्टी व पूर परिस्थिती, पीक संरक्षण या विषयाबाबत शेतकर्‍यांना मिळणारी अपुरी माहिती, रोग नियंत्रणाबाबत शेतकर्‍यांची उदासीनता, रोग नियंत्रण उपायांचा कमी प्रमाणात अवलंब, हवामानातील बदल अशा विविध कारणांमुळे रोगाच्या वाढीस व प्रसारास योग्य वातावरण तयार झाल्याने उसावरील रोगांचा प्रसार व प्रादुर्भाव वाढत आहे.

ऊस पिकास बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझमा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती आणि हवामानातील बदल यामुळे रोग तसेच विकृती तयार होतात. रोगामुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात रोगाच्या प्रसार आणि तीव्रतेनुसार कमी-अधिक प्रमाणात घट येते. महत्त्वाच्या रोगांचा प्रसार प्रमुख्याने बेण्याद्वारे होत असून ऊस बेणेमळा तयार करत असताना बेणेमळ्यातील रोगांचे प्रभावी नियंत्रण व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

बेण्याद्वारे पसरणारे महत्त्वाचे रोग :

चाबूक काणी, गवताळ वाढ, मर, रेड रॉट (ऊस रंगणे), मोझेक, यलो लीफ सिंड्रोम किंवा यलो लिफ डिसीज, लिफ स्काल्ड (पांगशा फुटणे), रटून स्टंटींग (वाढ खुंटणे), हे प्रमुख रोग बेण्याद्वारे पसरतात.

चाबूक काणी किंवा काजळी

हा बुरशीजन्य रोग स्पोरिसोरियम सिटॅमिनी मुळे होत असून महाराष्ट्रात हा रोग ऊस पिकांवर सर्वत्र आढळतो. राज्यात लागवडीखाली असणार्‍या सर्वच जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात. ऊस पीक वाढीच्या सर्व अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते, कारण लागण पिकातील रोगग्रस्त बेटे काढली जात नाहीत, तसेच खोडवा पिकाचा सुरुवातीचा काळ उन्हाळ्यात राहतो; हवेतील व जमिनीचे तापमान वाढते, तेव्हा या रोगास पोषक वातावरण तयार होऊन या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव जास्त होतो. खानदेश आणि मराठवाडा या भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे.

काणी रोगाची लागण झालेल्या उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता होत गेलेला पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो, तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू. रोगामुळे उसाची पाने अरुंद व आखूड राहतात व त्यामुळे रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. कधी-कधी रोगग्रस्त बेटात जास्त फुटवेदेखील आढळतात. उभ्या उसास रोगाची लागण झाल्यास कांड्यावरील डोळ्यातून काणीयुक्त पांगशा फुटतात. रोगट बेटे कालांतराने वाळून जातात. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर व साखर उतार्‍यावर विपरीत परिणाम होतो. काणी रोगामुळे लागण व खोडवा ऊस पिकाचे उत्पन्न अनुक्रमे 29 ते 70 टक्केपर्यंत घटल्याची नोंद आहे. साखर उतारादेखील 4 युनिटपर्यंत घटतो. तसेच रसाची शुद्धता घटते. या रोगाचा प्रसार मुख्यत्त्वेकरून दूषित बेण्यामार्फत तसेच वारा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत होतो.

रोगाचे नियंत्रण :

बेणेमळ्यातील बेणे लागणीसाठी निवडावे. ऊस बेण्यास लागणीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राद्वारे 54 सें.ग्रे. तापमानास 150 मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर बेण्यास कार्बेंडॅझिमयुक्त बुरशीनाशकाची (उदा. बावीस्टीन) प्रक्रिया करावी. याकरिता 100 ग्रॅम बुरशीनाशक 100 लिटर पाण्यात मिसळावे व त्या द्रावणात बेणे 15 मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी. अथवा उती संवर्धित रोपांचा वापर करावा. मध्यम रोगप्रतिकारक जातींची उदा. कोसी 671, को 86032, व्हीएसआय 434, कोएम 0265, कोव्हीएसआय 03102, एमएस 10001, व्हीएसआय 08005 लागण करावी. नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे मुळासहित काढावीत व जाळून नष्ट करावीत. काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वी बेटेनिर्मूलन झाले तर रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. प्रथम काणीयुक्त फोकारे प्लास्टिकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यावीत व नंतर बेटे काढावीत. साखर कारखान्याच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने काणीग्रस्त बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावी करता येईल. उन्हाळ्यात ऊस पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

गवताळ वाढ

गवताळ वाढ किंवा गवतीवाढ हा रोग बेण्याद्वारे व किडीद्वारे पसरणार्‍या फायटोप्लाझमामुळे होतो. को 419, कोएम 0265, कोसी 671, को 86032 व व्हीएसआय 434 या जातीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण सरासरी 10 टक्केपर्यंत आहे आणि ते वाढत असल्याचे दिसून येत आहे. या रोगाचा प्रसार प्रसार मुख्यत्त्वेकरून दूषित बेण्यामार्फत व किडीद्वारे (मावा, तुडतुडे) होतो. गवती वाढ रोगामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळात ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात व बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते.

बेटांत फुटव्यांची संख्या कधी-कधी 100 पेक्षा जास्त आढळते. रोेगामुळे उसाच्या पानामध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होत असल्याने पाने पिवळी किंवा पांढरी पडतात. रोगट बेटात गाळण्यालायक ऊस तयार होत नाहीत. रोगट उसावरील पाने अरुंद व आखूड होतात. पूर्ण वाढ झालेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात व कांड्यावरील डोळ्यातून पिवळसर (केवड्यासारख्या) पांगशा फुटतात. रोगट ऊस नंतर पोकळ पडतो व वाळतो. गवताळ वाढ रोगामुळे 5 ते 20 टक्केपर्यंत ऊस उत्पादनात घट येते. खोडवा पिकात रोगामुळे जास्त प्रमाणात बेटे पिवळी पडतात व मरतात. रोगाचे प्रमाणदेखील सुरुवातीच्या काळात जास्त आढळते; त्यामुळे रोगग्रस्त खोडवा पिकातील उसांची संख्या घटते.

गवती वाढ रोगाच्या नियंत्रणासाठी बेणेमळ्यातील रोगमुक्त बेणे लागणीसाठी निवडावे. बेणेमळ्यासाठी मूलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्यास बाष्प उष्ण हवा प्रक्रिया 54 सें.ग्रे. तापमानास 1.5 तास मिनिटे करावी किंवा उती संवर्धित रोपांचा वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगट बेटे काढावीत व जाळून नष्ट करावीत. सामूहिक पद्धतीने बेटे निर्मूलन हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.

बेणे छाटण्याचा कोयता अधूनमधून उकळत्या पाण्यात किंवा जंतूनाशकात (उदा.लायसॉल) बुडवावा. उसावरील रस शोषण करणार्‍या किडींचा बंदोबस्त वेळीच करावा, जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही. रोगाचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या पिकाचा खोडवा घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी जेणेकरून रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील.

येलो लीफ डिसीज (येलो लीफ सिंड्रोम)

हा रोग विषाणूजन्य असून येलो लीफ व्हायरसमुळे (प्रकार : लिटीओव्हिरीडी) होतो. हा व्हायरस मावा (मेलानाफीस सॅकाराय आणि ‘फॅलोसिफ’ मायडीस) या किडीद्वारे पसरतो. तसेच बेण्याद्वारे देखील हा रोग पसरतो. या रोगामुळे 4 ते 10 टक्केपर्यंत उसाचे आणि साखरेचे उत्पादन घटल्याची उदाहरणे आहेत. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते. दक्षिण भारतात या रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून को86032 ही उसाची प्रमुख जात धोक्यात येणाची शक्यता आहे.

येलो लीफ डिसीज रोगाची लक्षणे :

या रोगाची लक्षणे पिकाचे वय 7 ते 8 महिन्यांचे झाल्यावर दिसायला लागतात. रोगाची लागण झाल्यावर सुरुवातीस पानाची मध्यशिर खालच्या बाजूने पिवळी पडते. प्रथमत: 3 ते 6 नंबरच्या पानांवर रोगाची लक्षणे आढळतात. कालांतराने पिवळेपणा मध्यशिरेपासून बाजूस वाढत जावून पुर्ण पान पिवळे पडते. हळूहळू उसाची सर्व पाने पिवळी पडतात. काही वेळेस रोगग्रस्त पाने शिरेेलगत लालसर दिसतात. किडींचा प्रादुर्भाव, अतिथंडी तसेच अन्नद्रव्याचा ताण याबाबींमुळे रोगाची तीव्रता वाढते.

रोग नियंत्रणाचे उपाय : उती संवर्धित रोपापासून बेण्याची वाढ केलेेल्या बेणेमळ्यात रोेगाचे नियंत्रण होते, म्हणून अश्या बेणेमळ्यातून लागणीसाठी बेणे घ्यावे.

– डॉ. जी. एस. कोटगिरे,
ऊस रोग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे 

Back to top button