डाळिंबाच्या बागेमध्ये घ्या ‘ही’ आंतरपिके | पुढारी

डाळिंबाच्या बागेमध्ये घ्या 'ही' आंतरपिके

फळबाग शेतीमध्ये डाळिंब हे चांगले उत्पन्न देणारे फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, डाळिंबाची लागवड करताना तसेच या पिकाची वाढ होत असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब बागेची काळजी घेणे आवश्यक असते.

लागवडीपासून अनेक शेतकरी डाळिंबाच्या रोपांना बांबूच्या काठ्यांचा आधार देतात. मात्र, या झाडाला आधाराची गरज नसते, असे काही तज्ज्ञ सांगतात. फळ लागल्यावर त्या वजनाने झाडाच्या फांद्या तुटू नयेत याकरिता झाडांना थोडा आधार द्यावा लागतो. त्याकरिता जमिनीत खड्डे घेऊन गॅल्वनाईज्ड तारेने झाड दगडाला बांधून ठेवावे आणि बाबूंना तारेचा आधार द्यावा. बांबूंमध्ये बाजूला डांबर लावावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्याकरिता 60 × 60 × 60 या आकाराचे खड्डे घ्यावे लागतात. प्रत्येक खड्ड्याच्या तळाला झाडांच्या पालापाचोळ्याचा पंधरा ते वीस सेंटिमीटर जाडीचा थर द्यावा लागतो. हा पालापाचोळा पूर्णपणे वाळलेला असावा. या पालापाचोळ्याच्या थरावर 20 ते 25 किलो शेणखत अथवा कंपोस्ट खत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने जमीन भरून घ्यावी. प्रत्येक खड्ड्यात 1 याप्रमाणे तयार केलेली कलमे लावावीत. 5 × 5 मीटर अंतराने प्रतिहेक्टरी 400 झाडे लावावीत.

5 वर्षांनंतर झाडांची वाढ बघून प्रत्येक झाडाला 10 ते 50 किलो शेणखत, 600 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश हा डोस दरवर्षी द्यावा. डाळिंबाच्या झाडाला आंबीया, मृग आणि हस्त असे तीन बहार येतात. यापैकी कोणत्याही एका बहाराची फळे आपण घेऊ शकतो. आंबीया बहार जानेवारी ते फेब्रुवारी या काळात येतो. मृग बहार जून जुलै महिन्यात येतो. तर हस्त बहार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतो. बहार धरताना झाडांना पाणी देण्यापूर्वी एक महिना अगोदर बाग पूर्णपणे नांगरून घ्यावी. त्यानंतर झाडांची आळी खणावीत व मुळ्या उघड्या करून जारवा छाटावा.

डाळिंबाचे फळ तयार होण्यासाठी फुले लागल्यानंतर सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागतो. आंबीया बहारातील फळे जून ते ऑगस्टमध्ये, मृग बहारातील फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये तर हस्त बहारातील फळे फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये तयार होतात. डाळिंबाच्या फळाची साल पिवळसर करड्या रंगाची झाली म्हणजे ते फळ तयार झाले असे समजले जाते. फळाची साल या रंगाची झाल्यानंतर फळे तोडावीत. डाळिंबावर येणारा प्रमुख रोग म्हणजे मर रोग. याला आरोहा असेही नाव आहे. डाळिंबाच्या मुळाशी सतत पाणी राहिले तर तेथे बुरशी येते. त्यातूनच या झाडावर कीड आणि रोग पसरतो. फळांवर ही कीड आल्यास झाडाची वाढ खुंटते. या बुरशीमुळे झाडाला पुरेसा अन्नपुरवठा होण्यात अडचणी निर्माण होतात.

जमिनीतून पुरेसे अन्न न मिळाल्याने झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. या बुरशीची लागण झाल्यावर डाळिंबाचे झाड निस्तेज दिसू लागते. झाडाची पाने पिवळी पडतात. फळे गळून पडू लागतात. काही दिवसानंतर झाड पूर्णपणे वाळलेले दिसून येते. ज्या जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही अशा ठिकाणी डाळिंबाची लागवड केल्यास झाडावर हा रोग पसरतो. त्याकरिता चुनखडी असलेल्या जमिनीत डाळिंबाची लागवड करणे चुकीचे ठरते. डाळिंबाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी न देणे, आंतर मशागत न करणे, रोग आलेली कलमे लावणे या कारणांमुळेही डाळिंबाच्या झाडावर हा रोग पडतो. त्यामुळे व्यवस्थित निचरा होत असलेल्या जमिनीवरच डाळिंबाची लागवड करावी.

डाळिंबाच्या बागेमध्ये घ्या ‘ही’ आंतरपिके

लागवडीच्या वेळी निंबोळी, पेंड, शेणखत, कॉपर ऑक्झीक्लोराईड, ट्रायकोडर्मा यांचा प्रमाणाप्रमाणे वापर करावा. डाळिंबाच्या बागेमध्ये पहिल्या दोन वर्षांत दोन ओळींमध्ये कांदा, काकडी, मूग, चवळी यांसारखी आंतरपिके म्हणून घेता येतात. ही पिके उंचीला फारशी असत नाहीत. जर वारंवार ढगाळ हवामान असल्यास आणि हवेत आर्द्रता असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषधाची फवारणी करावी लागते. डाळिंब हे फळ व्यवस्थित मार्गदर्शनाने चांगले वाढू शकते. आणि या बागेतून चांगले उत्पन्नही मिळू शकते. (उत्तरार्ध)

– शैलेश धारकर

Back to top button