paddy farming : भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, हा करा उपाय | पुढारी

paddy farming : भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, हा करा उपाय

पावसाने आता थोडी उसंत दिली आहे. पिके जोमाने डोलू लागली आहेत, पण भात शिवारात काही किडींचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. तो खालीलप्रमाणे आहे…

करपा : पानांवर शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे करड्या रंगाचे ठिपके आढळतात. पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असलेला दिसून येतो. असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो, रोप पेरात मोडते. लोंबीच्या देठाचा भाग काळा पडून कुजतो. लोंबी रोगग्रस्त भागात मोडून लोंबत राहते. लोंबीतील दाण्यावर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.

उपाययोजना : ट्रायसायक्लॅझोल 1 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नत्रयुक्‍त खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी.

पर्णकोष करपा :चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके पडतात. रोगग्रस्त भागात बुरशी आत शिरून खोड कमकुवत करते. खोडाचा चिवटपणा कमी होऊन रोप कोलमडते. पीक करपते. लोंबी भरत नाही. दाटीने वाढलेल्या शेतात रोग मोठ्या प्रमाणात पसरतो.

उपाययोजना : शेतातील पाण्याचा पूर्णपणे निचरा करून प्रोपीकोनॅझोल 1 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी चुडातील आतल्या भागातील खोडावर होईल याची दक्षता घ्यावी.

Back to top button