कांद्याचे प्रकार आणि अर्थकारण | पुढारी

कांद्याचे प्रकार आणि अर्थकारण

महाराष्ट्रात विशेष करून नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात पोल कांदा, खरिपाच्या अंतिम कालावधीत, रब्बीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये रांगडा कांदा आणि त्यानंतर रब्बी कांदा घेतला जातो. पोल आणि रांगडा कांदा लाल रंगाच्या जातीचा असून, उन्हाळी कांदा फिकट लाल-पांढरा असतो. लाल जातीचा कांदा जास्त दिवस टिकणारा असतो; परंतु पांढर्‍या आणि फिकट लाल जातीचा कांदा 4 ते 5 महिने टिकू शकतो. या तिन्ही प्रकारचा कांदा साधारपणे मे पासून नोव्हेंबरपर्यंत घेतला जातो. कांद्याच्या काढणीची वेळ ऑक्टोबरपासून मे महिन्यांपर्यंत असते.

ऑक्टोबर ते मार्चपर्यंत काढला जाणारा कांदा साठवणुकीसाठी योग्य नसल्याने त्या त्या वेळी वापरण्यात येतो; परंतु एप्रिल ते मे महिन्यात आलेला उन्हाळी कांदा पुढच्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत साठविला जातो आणि किमान 4 ते 5 महिन्यांच्या कालावधीकरिता अशा साठविलेल्या कांद्याचे पीक खराब झाल्यास त्या त्या वेळी बाजारात त्याची आवक कमी-जास्त होते आणि बाजारभावामध्ये फरक पडतो; परंतु साधारपणे अशा कालावधीमध्ये कांद्याची कमतरता भासत नाही किंवा भाव आटोक्यात असतात. मात्र, उन्हाळी कांद्याचे उत्पादन जर कमी असेल तर साठविलेला कांदा ऑक्टोबरमध्ये पुरवठा करण्यासाठी कमी पडतो आणि त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

– अनिल विद्याधर

Back to top button