ग्लॅडिओलसची लागवड करताना… | पुढारी

ग्लॅडिओलसची लागवड करताना...

ग्लॅडिओलस हे फूल आता महाराष्ट्रात व्यापारी पीक बनले आहे. बाजारात लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा, जांभळा अशा रंगांच्या ग्लॅडिओलसच्या फुलांना वर्षभर मागणी असते. हे कमी कलावधीत जास्त उत्पादन देणारे फूल पीक आहे. महाराष्ट्रात ग्लॅडिओलस या फूल पिकाची लागवड वर्षभर करता येते. परंतु, जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड करावी. आपल्याकडील वातावरणात उन्हाळ्यातही शेडनेटमध्ये हे पीक उत्तम प्रकारे घेता येते.

ग्लॅडिओलसची लागवड कंदापासून केली जाते. लागवडीसाठी प्रामुख्याने 3 ते 6 से. मी. आकाराचे कंद निवडावेत. लागवड गादीवाफा किंवा सरी वरंबा पद्धतीने करता येते. लागवडीनंतर साधारपणे 60 ते 80 दिवसांनी काढणी सुरू होते. ती पुढे महिनाभर चालते.
फुलांचा दांडा काढताना दांड्यावरील सर्वात खालचे फूल कळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागण्याच्या अवस्थेत खालची चार पाने सोडून कापून काढावीत. काढणीनंतर फुलदांडे पाण्यात बादलीमध्ये ठेवावेत. ग्लॅडिओलसचे एकरी उत्पादन हे किती कंद पेरणीसाठी वापरले यावर अवलंबून असते. साधारपणे 70 ते 75 हजार प्रतिएकरी ग्लॅडिओलसचे फुलदांडे मिळतात.

– नवनाथ वारे

Back to top button