कीड नियंत्रण : डाळिंबांचे करा रक्षण - पुढारी

कीड नियंत्रण : डाळिंबांचे करा रक्षण

– विलास कदम

डाळिंबांचे करा रक्षण : महाराष्ट्रातील दाणेदार फळ म्हणून डाळिंब ओळखळे जाते, राज्यातील बहुतांश भागात या फळ शेतीची लागवड केली जाते. या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींची शास्त्रीय माहिती शेतकर्‍यांना अवगत नसल्यामुळे हाताला आलेले फळ वाया जाते.

फळांवर प्रादुर्भाव करणार्‍या किडींवर एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केल्यास शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळता येते. डाळिंब पिकावर प्रामुख्याने मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, माईट्स, खवले कीड इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

डाळिंबांचे करा रक्षण :

बहार धरल्यानंतर ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते त्यावेळी कोवळ्या शेंड्यावर, फुलावर तसेच कोवळ्या फळावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो.

त्यामुळे शेंडे चिकट होऊन त्यावर काळ्या बुरशींची वाढ होते. मावा ही कीड कळ्यातील रस शोषून त्यावर उपजीविका करते. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. कळ्या, फुले, फळे गळून पडतात.

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधित या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

डाळिंबावर फूलकिड्यांचा वावर

डाळिंबावर फूलकिड्यांचा वावर उमलेल्या फुलावर दिसून येतो. त्याला टरड्या असेही म्हणतात. फूलकिड्यांची पिले स्त्रवणार्‍या रसावर उपजीविका करतात. त्यामुळे पुढे फळांवर खडबडीतपणा येतो किंवा पांढरे पट्टे दिसतात.

पांढरी माशीचे वास्तव्य पानांच्या मागील बाजूस असते. त्या राखाडी आणि पांढर्‍या रंगाच्या असतात. किडीची पिले पानातील पोषक द्रव्ये शोषत असतात तर प्रौढ माशी कोवळ्या पानातील पेशीद्रव्यावर उपजीविका करतात.

त्यामुळे पानावर चिकट द्रव स्रवल्याने काळ्या बुरशीची वाढ होते आणि झाडाची वाढ थांबते.

पिठ्या ढेकूण या किडीवर आवरण असल्याने कीटकनाशक शरीरापर्यंत पोहोचण्यास अडचण होते.

झाडावरील फळांवर कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर स्थिर राहून ते पेशींद्रव्य शोषतात.

या किडीमुळे फळ चिकट होत असते. किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फळांची गळती होते.

माईटस खवले कीड या किडींचा प्रादुर्भाव डाळिंबावर कमी प्रमाणात होतो. या किडीसुद्धा झाडाच्या पानातील रस शोषतात. फांद्या आणि कोडावर या किडींचे वास्तव्य असते. झाडाचा चिकटपणा या किडींमुळे वाढतो.

कीड नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता

कीड नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. तणांचा बंदोबस्त करावा. छाटणीचे नियोजन करताना झाडावर फांद्यांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. माईट्स खवले कीड, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडीवर उपजीविका करणार्‍या परोपजीवी किडींचा वापर करावा.

पांढर्‍या माशींच्या नियंत्रणासाठी बागेत…

पांढर्‍या माशींच्या नियंत्रणासाठी बागेत पिवळ्या रंगाचे कार्डशिटस् त्यावर चिकट पदार्थ किंवा एरंडेल तेल लावून अडकवावेत.

पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणाकरिता झाडाच्या खोडाजवळ भुकटी मिसळावी. त्यामुळे झाडावर चढणारे ढेकूण नियंत्रण होईल.

त्याचबरोबर व्हटॉसिलीयम लेकॅनी या परोपजीवी बुरशीचा फवारणीकरिता वापर करावा. कीटकनाशकांच्या द्रावणात फिश ऑईल रोझीन सोप प्रती लिटर 25 गॅ्रम प्रमाणात मिसळावे. कीटकनाशकाच्या द्रावणात स्टीकरचा वापर करावा.

परोपजीवी कीटक बागेत सोडले तर कीटकनाशकाची फवारणी करू नये. कीटकनाशकाची फवारणी आवश्यकता असेल तेव्हाच करावी.

डायमेथोएट 30 ई.सी. प्रमाण 15 मि.लि., मोनाक्रोटोफॉस 36 ईसी. 20 मि.लि., मॅलथिऑन 50 ईसी., 20 मि.लि., डायक्लोराव्हास 20 ईसी. 20 मि.लि., क्लोरपायरिस 15 मि.लि. या कीटकनाशकांची फवारणी आणि निंबोळी अर्क 5 टक्के यांचे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने-पालटून फवारणी करावी.

Back to top button