प्रसूतीच्यावेळी गायीची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या माहिती | पुढारी

प्रसूतीच्यावेळी गायीची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या माहिती

गायीला विताना आडोसा हवा असतो. माणसांची किंवा गुरांची वर्दळ असल्यास गाय वेणा थांबवते. वितांना गायीला मदत लागल्यास ती तत्काळ मिळण्यासाठी एखाद्या माणसाने गायीच्या नजरेत न पडेल अशा बेताने हजर राहावे. प्रसूती पूर्ण होईपर्यंत तेथेच असावे. मात्र गायीला मदत लागल्याखेरीज त्याने गायी जवळ जाऊ नये.

सामान्यत: वासरू जन्मताना त्याच्या पुढील पायात दोन खुरांची जोडी दिसू लागते. वासराची खूर बाहेर पडल्यानंतर तासाभरात नाकपुड्या दिसल्या नाही तर मदत आवश्यक ठरते. गुडघ्यापर्यंत पाय बाहेर आल्यानंतर म्हणजे सुमारे दोन तासांत वासराचे तोंड आणि डोके दिसू लागते. पाय बरोबरीने बाहेर पडत असल्याची तसेच डोके सरळ बाहेर येत असल्याची खात्री करून घ्यावी. डोके बाहेर पडल्यानंतर जोराने वेणा घेऊन खांदे आणि पाठोपाठ चौकापर्यंतचा भाग सहज बाहेर पडतो. यानंतर चौके बाहेर पडण्यासाठी गाय पुन्हा जोराने वेणा देते आणि नंतर सर्व वासरू आपोआप बाहेर पडते.

वेणा (कळा) सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने पानमोठीचा, फुगा दिसू लागतो. सामान्यत: हा थोड्याच वेळात पाणमोट फुगते. क्वचित वासरू थोडेफार बाहेर आल्यावर पानट फुगते. अगदी क्वचित बाहेर पडलेल्या वासराभोवती पान मोट तशीच राहते. ती फोडून वासरू मोकळे करावे लागते.

वर सांगितलेल्या पद्धतीपेक्षा अन्य कोणत्याही पद्धतीने वासरू बाहेर येत असल्यास मदतीची गरज लागते. अशा वेळी ताबडतोब पशुवैद्यकीय मदत मागवावी.

नवप्रसूत गायीची काळजी

प्रसूतीचे वेळी येणार्‍या वेणामुळे गायीला अतोनात कष्ट होतात. निकोप प्रकृती असणार्‍या गायी विश्रांती घेऊन ताबडतोब उभ्या राहतात. वासराला चाटतात.

समोर अन्न-पाणी असल्यास ते खातात-पितात. प्रकृतीमुळे अगर वयोमानामुळे गाय थकल्याने बसून राहते. वासरांना चाटत नाही. अशावेळी वासरू उचलून त्यांच्या समोर ठेवावे.

गाय व्याल्यानंतर मागचे चौक (शेवटीच्या आजूबाजूचा भाग) सहन होईल इतक्या गरम पाण्याने धुवावे. नंतर मागच्या पायातील जागा, कास आणि सड स्वच्छ धुवावेत. सर्व शरीर कोरड्या खरखरीत कापडाने स्वच्छ पुसून कोरडे करावे.

नुकत्याच व्यालेल्या गायीला, सुमारे पाव किलो गूळ, कोमट पाण्यात घालून कालवून पाणी प्यायला द्यावे. काही ठिकाणी गायीला दोनशे ते अडीचशे ग्रॅम तेलही पाजतात. अनेक ठिकाणी गायीला एक-दोन आठवडे एक-दोन किलो बाजरी उकडून देतात. बर्‍याच वेळी त्यात 100 गॅ्रम हळीव, प्रत्येकी 200 ग्रॅम, बाळंतशेप मेथी आणि मीठ आणि गोडतेल प्रत्येकी 50 ग्रॅम, काळे जिरे आणि सुंठीची पूड आणि एक किलो गव्हाचा कोंडा यांचे मिश्रणही गायींना व्याल्यानंतर देतात. यामुळे पचन सुधारते आणि दूधही वाढते असा समज आहे. काही दिवसानंतर हळूहळू गुरांना नेहमीचा खुराक देतात. अलीकडे संतुलित आहार पशुखाद्य सर्रास वापरात आल्यापासून गायींना असा खास खुराक देण्याची चाल कमी होत आहे.

गाय व्याल्यानंतर सुमारे पाच ते सहा तासांत तिची वार आपोआप गळून पडते. वार उन्हाळ्यात बारा ते अठरा तासांत आणि हिवाळ्यात 24 तासांत पडली नाही तर त्यावर पशुवैद्यकीय उपाय योजना करावी लागते. पूर्वी अडकलेली वार हाताने सुटी करण्याचा प्रघात होता. यासाठी गर्भाशयातील प्रत्येक दलापासून वार हळूवार हाताने सोडून घेत असत. वार नुसती ओढल्याने, सुटण्याची खात्री नसते. इतकेच नव्हे तर, यामुळे गर्भाशयात इजा होऊन, रक्तस्राव होण्याच्या अथवा गर्भाचे उलटून बाहेर पडण्याचा धोका असतो. यासाठी पशुवैद्यकीयाखेरीज, इतरांना हे काम करू देऊ नये. पशुवैद्यकीय सल्ला घेतलेला कधीही चांगला.

अलीकडील विचारानुसार वार अडकल्यास हाताने ती सोडविल्याने फायद्यापेक्षा अपाय होण्याचा संभव अधिक असतो. गर्भाशय हाताळल्याने त्याला इजा झाल्याने अथवा जंतुजन्य दोषामुळे वार काढलेल्या गायी व्याल्यानंतर लवकर माजावर येऊन गाभण राहत नाहीत. वरचेवर उलटतात, त्याऐवजी गर्भाशयात सल्फा किंवा अँटिबायोटिक औषधे सोडून जंतूंचा प्रवेश टाळल्याने आणि वार निसर्गत: आपोआप थोडीशी अवकाशाने पडली तरी अशा गायी व्याल्यावर लवकर माजावर येऊन भरल्यानंतर गाभण राहतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या गायीची वार अडली असेल, ती वेळेआधी सोडविण्याचा पशुवैद्यकांजवळ आग्रह धरू नये.

– विलास कदम

Back to top button