किडींचे सर्वेक्षण | पुढारी

किडींचे सर्वेक्षण

कीड व्यवस्थापनामध्ये किडीची संख्या, किडीची अवस्था आणि नुकसानीचा प्रकार इत्यादी बाबी कीड नियंत्रणासाठी माहीत असणे आवश्यक असते.

नुकसान करणार्‍या बाबी आपणास समजल्यानंतर आपणास योग्य त्या प्रकारची उपाय योजना करणे सोपे जाते. आणि किडींमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करता येते. पर्यायाने उत्पादनामध्ये घट येत नाही. यासाठी पिकामध्ये किडीचे सर्वेक्षण करावे लागते.
सर्वेक्षणाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
1. प्रलोभन सापळे वापरून नर पतंगांची संख्या किती आहे, याचा अंदाज काढणे, उदा. कपाशीची हिरवी बोंडअळी, ठिपक्याची अळी, शेंदरी बोंडअळी इत्यादींचे प्रलोभन सापळे (पेशेमेन ट्रॅप) शेतात हेक्टरी 4-5 या प्रमाणात लावून प्रती दिवस किती नर पतंग आकर्षित होतात, याची पडताळणी करता येईल. पतंगाची संख्या सुमारे 8-10 एकसारखी तीन-चार दिवस आढळून आल्यास नियंत्रणाची उपाय योजना करणे आवश्यक आहे, असे समजावे.
2. दुसरा प्रकार प्रत्यक्ष शेतात किडींचे/प्रादुर्भावाची निरीक्षणे घेऊन नियंत्रणाचे उपाय करणे आवश्यक आहे किंवा नाही, हे ठरविले जाते. यात अनेकदा ठराविक ठिकाणी. संपूर्ण विभागातील विखुरलेल्या शेतात निरीक्षणे घेेणे याला फिक्स प्लॉट सर्व्हे म्हणतात.
निरीक्षणासाठी शेतात अंदाजे 5 ठिकाणी निरीक्षणे घ्यावीत. शेताचे अंदाजे चार भाग पाडून सारख्या अंतरावर 5 ते 20 ठिकाणी पिकांवर निरीक्षणे घ्यावी. झाडांची संख्या आणि ठिकाण पिकाप्रमाणे बदलावेत. कपाशीची झाडे सुमारे 20 राहतील. अथवा ज्वारीसारख्या पिकाची संख्या सुमारे 20 ठिकाणी राहतील किंवा तूर, हरभरा, भुईमूग, प्रती मीटर लांबीतील झाडांची संख्या राहील. धानात (भात) 5-20 बुंधे राहतील. संत्रा पिकांची 5 झाडे राहतील इत्यादी याप्रमाणे पिकानुसार पद्धतीचा अवलंब करून किडीची प्रती झाड/प्रती पानसंख्या अथवा प्रादुर्भावाची टक्केवारी काढता येईल. या मोजणीवरून आर्थिक नुकसानीची पातळी बरोबर (ई. टी.एल.) आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करता येते. आर्थिक नुकसानपातळी गाठली असल्यास कीड नियंत्रणाचे उपाय योजता येतात.
– अनिल विद्याधर

Back to top button