शेडनेट हाऊस कशासाठी? | पुढारी

शेडनेट हाऊस कशासाठी?

हरित गृहासाठी आच्छादन म्हणून शेडनेटचा वापर केल्यास त्यास ‘शेडनेट हाऊस’ म्हणतात. शेडनेट हाऊसचा मुख्य उद्देश उन्हाची तीव्रता कमी करून रोपांना बाह्य संरक्षण देणे हा होय.

जी. आय. किंवा एस. एस. गोल किंवा चौकोनी पाईप वापरून शेटनेट हाऊसची उभारणी करता येते. आणखी कमी खर्चात शेडनेट हाऊसची उभारणी करता येते. आणखी कमी खर्चात शेडनेट हाऊस उभारायचे झाल्यास बल्ली, बांबू, सुरू किंवा निलगिरीचा वापर करून लाकडी सांगाड्यात शेडनेट उभारता येते. परंतु पाईपच्या तुलनेत लाकडी सांगाड्याचे आयुष्यमान कमी असते.

बाजारामध्ये 30 टक्के, 50 टक्के आणि 75 टक्के प्रमाणाची शेडनेट उपलब्ध आहे. ही शेडनेट विविध रंगांत म्हणजे हिरवा, पांढरा, चंदेरी, करडा आणि काळ्या रंगात उपलब्ध असते. हिरव्या रंगाची शेडनेट खास करून रोपवाटिकेसाठी वापरली जाते. पांढर्‍या चंदेरी आणि करड्या शेडनेटचा उपयोग पीक लागवडीसाठी केला जातो. शेडनेटचे आयुष्य सरासरी 24 ते 30 महिन्यांपर्यंत असते. शेडनेटमध्ये कोथिंबीर, मिरची, ढोबळी मिरची, कोबी वर्गीय पिके, कारली, काकडी, टोमॅटो अशा पिकांची लागवड करता येते. शेडनेटमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी फॉगर यंत्रणेचा वापर करता येतो. शेडनेटमधील पिकांना पाणी आणि खत देण्यासाठी ठिबक सिंचनाचाच वापर करणे फायद्याचे असते.

  शेडनेट हाऊसचे फायदे

  •  शेडनेटमुळे प्रखर उन्हाची तीव्रता कमी होऊन रोपांना संरक्षण मिळते.
  •  खुल्या लागवडीच्या तुलनेत कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  •  बियाण्यांची उगवणशक्‍ती वाढते. उत्पादन आणि उत्पादकताही वाढते.
  •  बाष्पीभवनाचा दर कमी होऊन पाण्याची बचत होते.
  •  ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये 25 ते 30 टक्केपर्यंत बचत होते.
  •  मनुष्यबळामध्ये बचत होते.
  •  दर्जेदार उत्पादन मिळते.
  •  बिगर हंगामी पिके आणि उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड शेडनेट हाऊसमध्ये केल्यास खूप जास्त बाजारभाव मिळतो.
  •  रोपवाटिकेसाठी शेडनेट हाऊसचा उपयोग रोपे, कलमे तयार करण्यासाठी उत्तम प्रकारे करता येतो.

– विनायक सरदेसाई

Back to top button