कामासाठी बैलांची निवड करताना… | पुढारी

कामासाठी बैलांची निवड करताना...

बैल हा शेतीकामासाठी आणि ओझे वाहण्यासाठी वापरला जातो. बैलाची निवड करताना तो कोणत्या कामासाठी पाहिजे हे महत्त्वाचे असते. शेतकाम आणि ओझे वाहण्यासाठी वापरण्यात येणारे बैल हे शारीरिकद़ृष्ट्या दणकट असणे महत्त्वाचे असते. बैलाची निवड करताना त्याचे वजन महत्त्वाचे असते. बैलाची आपल्या वजनाच्या 1/8 ओझे ओढण्याची ताकद असते. थोड्या वेळाकरिता बैल सामान्य ओढीच्या दहापट अधिक ओझे जोमाने ओढू शकतो. बैलाचे निरीक्षण करताना बैलांमध्ये दोष नाहीत, याकडे लक्ष ठेवावे. जसे शिंगाच्या बुडाजवळ भिरूड असणे, गाठ असणे, पायाच्या खुरात दोष असणे, मागील पायात रिंगणी असणे वगैरे.
बैलाची निवड करताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.

1) बैल हा मजबूत शरीरयष्टीचा असून अंगाखांद्याने भरभक्कम बांध्याचा असावा.
2) बैलाची कार्यक्षमता जास्त असावी आणि वेगवेगळ्या हवामानात तग धरणारा असावा.
3) शक्यतो तरुण वजनगट असावा जणेकरून तो दीर्घकाळ काम करू शकेल.
4) जनावर चपळ आणि तल्लख वृत्तीचे असावे. कपाळपट्टी रुंद असावी.
5) बैलाची कातडी मऊ, चमकदार आणि घट्ट असावी.
6) बैलाच्या समोर उभे राहून पाहिल्यास छातीचा घेर मोठा असावा आणि समोरील दोन्ही पाय मजबूत आणि समांतर असावे.
7) मागे उभे राहून पाहिल्यास छातीचा मागील घेर मोठा असावा तसेच मागील पाय मजबूत आणि समांतर असावे.
8) फासळ्या लांब-रुंद घेरदार असाव्यात.
9) शिंगे आटोपशीर आणि मजबूत असावी, तसेच नाकपुड्या मोठ्या आणि रुंद असाव्यात.
10) पायाची हाडे मोठी आणि दोन्ही पाय लांबलचक असावीत.
11) बैलाची पाठ सपाट आणि रुंद असावी, तसेच शेपूट लांब आणि शेवटी निमुळती असावी.
12) बैलाची जोडी समान उंचीची, सारख्या वयाची आणि सारख्या आकाराची असावी.
13) बैल दिसण्यास रुबाबदार, डोळे मोठे आणि पाणीदार असावेत.
14) बैलाला चालवून पाहिल्यास त्याची चाल रुबाबदार आणि वेगवान असावी.

Back to top button