तृणधान्यांवर प्रक्रियेची गरज - पुढारी

तृणधान्यांवर प्रक्रियेची गरज

कुठल्याही प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया केली, तर निश्‍चितच जास्त उत्पन्‍न मिळते. त्याला तृणधान्यदेखील अपवाद नाही. मात्र प्रक्रिया उद्योग उभारायचा ठरविले की फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पतींचाच विचार केला जातो. खरे तर तृणधान्यांवर प्रक्रिया करूनही उत्तम उद्योग सुरू करता येतो.

दररोज वापरात येणार्‍या तृणधान्यांपासून आपणाला एकूण उष्मांकापैकी 70-80 टक्के उष्मांक मिळतात. प्रथिने, चरबी, खनिजे आणि जीवनसत्त्व मिळतात. तृणधान्यातील मॅग्‍नेशियम धातूमुळे अस्थमा, डोकेदुखी, उच्च रक्‍तदाब, मधुमेह इत्यादीवर मात करता येते. नायसिनमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. याशिवाय तृणधान्यातील तंतुमय पदार्थांमुळे मूतखडा टाळण्यास मदत होते. तृणधान्यावर प्रक्रिया करून कोणते पदार्थ तयार करता येतात, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

1) ज्वारी : ज्वारीपासून माल्ट तयार करून त्याचा उपयोग शिशू आहार, बिअर, ब्रेड इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो. या व्यतिरिक्‍त ज्वारीपासून पोहे, रवा, लाह्या, शेवया इत्यादी पदार्थ बनविता येतात.

2) बाजरी : बाजरीपासून माल्ट तयार केल्यास त्यांचे जैविक मूल्य आणि उष्मांक शक्‍ती वाढते. शिशू आहारात त्याचा वापर होऊ शकतो. तसेच बाजरीपासून निर्मिती चवदार मसाला पिठाचा नाश्त्यासाठी वापर करता येतो. याशिवाय बाजरी पासून पापडी, गोड-तिखड सांगडे तयार करता येतात.

3) नाचणी : नाचणी मोडवल्यानंतर उच्च प्रतीचा शिशू आहार तयार करता येतो. या व्यतिरिक्‍त काजू, मनुके, साखर, तूप आणि रंग वापरून नाचणीचा हलवा बनविता येतो. याशिवाय नाचणीच्या पापड्या आणि बिस्कीटही बनविता येतात.

4) राजगिरा : लहान मुलांचा आहार तयार करण्यासाठी राजगिर्‍याचा उपयोग होतो. राजगिर्‍याचे लाडू प्रसिद्ध आहेत.

5) ओट : केक तयार करण्यासाठी,बाल आहार आणि नाश्त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ तयार करण्यासाठी ओटचा उपयोग होतो. ओटपासून पीठ आणि पोहेही तयार करता येतात.

6) तृणधान्यांचे मोतीकरण : उभ्या शंकूकार मोतीकरण यंत्राने तृणधान्यांचे मोतीकरण केले जाते. पूर्वप्रक्रिया केलेले तृणधान्य खरबडीत पृष्ठभागावर घासले जाऊन त्यावरील कोंडा निघून जाऊन बारीक स्टिलच्या जाळीतून बाहेर पडतो आणि शेवटी पॉलिश केलेले तृणधान्य मिळते.
– अनिल विद्याधर

हेही वाचलंत का? 

Back to top button