फुलकिडे : माहीत आहे का? - पुढारी

फुलकिडे : माहीत आहे का?

फुलकिडे : ही कीड वांगी, मिर्ची, टोमॅटो, गोबी, कांदा यावर प्रामुख्याने आढळते. हे किडे अतिशय लहान आणि आकाराने निमुळते असतात. यांचा रंग फिक्‍कट पिवळा आणि करडा असतो. लांबी 1 मि. पेक्षा कमी असते तर ही कीड पानाचा खालच पापुद्रा खरडून पानातील बाहेर येणारा रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला मुरडली जातात आणि त्यांचा आकार द्रोणसारखा होतो. या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो आणि तो पीक मोठे होईपर्यंत राहतो. या किडीमुळे मिरचीमध्ये चुरडामुरडा नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

फळ पोखरणारी अळी (हेलीकोव्हर्पा आर्मिजेरा) :

मिरची आणि टोमॅटो तसेच अन्य भाजीपाला पिकावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. ही कीड बहुभक्षी असून या किडीचे पतंग रंगाने पिवळसर असून पुढील पंख तपकिरी असतात आणि त्यावर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धुरकट असतात. या किडीच्या अळ्या विविध रंगछटेच्या असल्या तरी साधारणत: पोपटी रंगाच्या असतात आणि त्यांच्या पाठीवर दोन्ही बाजूस करड्या रंगाच्या उभ्या तूटक रेषा असतात. सुरुवातीला लहान अळ्या पाने कुरतडून खातात आणि नंतर फळे लागल्यावर त्यास छिद्र पाडून आतील भाग खातात. त्यामुळे फळांची गळ होऊन अधिक नुकसान होते.

शेंडे आणि फळे पोखरणारी अळी :

वांगी पिकाची ही एक सर्वात महत्त्वाची कीड आहे. या किडींचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी आणि पिंगट ठिपके असतात. तर अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. अळ्या प्रथम कोवळ्या शेड्यात शिरून आतील भाग खातात. त्यामुळे शेंडे जळतात. तसेच ही अळी फळे आल्यावर फळे पोखरते आणि फळांना खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात आणि गळून जातात.

– प्रसाद पाटील

Back to top button