भेंडीची लागवड, काढणी आणि हाताळणी कशी करावी? - पुढारी

भेंडीची लागवड, काढणी आणि हाताळणी कशी करावी?

प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते. खरीप हंगामात बियांची पेरणी जून ते जुलै महिन्यात करावी, उन्हाळी हंगामातील पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करावी. भेंडीचे बी लावल्यापासून साधारणपणे दोन महिन्यांनंतर झाडाला फुले येऊ लागतात. फूल उमलल्यापासून चार ते सहा दिवसांपर्यंत भेंडीची लांबी, जाडी आणि वजन वाढते. साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या दिवसांपर्यंत भेंडीत रेषा तयार होण्यास सुरुवात होते. त्या आधीच भेंडीची काढणी केल्यास ती कोवळी आणि लुसलुशीत राहते.

बाजारात भेंडीच्या कोवळ्या फळांना अधिक मागणी असते. म्हणून फक्‍त कोवळीच फळे तोडावीत. बाजाराच्या द‍ृष्टीने उत्तम प्रतीची भेंडी मिळवण्यासाठी दोन ते तीन दिवसांनी भेंडीची तोडणी करावी. यापेक्षा तोडणीस अधिक उशीर झाल्यास ती खाण्यास निरुपयोगी ठरते. साधारणपणे एका पिकापासून भेंडीच्या सरासरी 15 ते 16 तोडण्या करता येतात. भेंडी सकाळी तोडण्याचे आणखी फायदे म्हणजे ताजेपणा, रंग आणि तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत आणावीत. तोडणी उशिरा केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

पावसाळ्यात केलेल्या लागवडीपासून बीजोत्पादन घेतले जाते. काढलेली भेंडी काळजीपूर्वक हाताळावी. कारण दाबल्यामुळे ती काळी पडण्याचा अथवा मोडण्याचा संभव असतो. तुटलेली, दबलेली आणि कीटकांनी खराब केलेली भेंडी चांगल्या भेंडीमधून वेगळी करावी. वाहतूक करताना जर भेंडी दाबली गेली किंवा खराब झाली तर त्यांना बाजारभाव कमी मिळतो. म्हणून वाहतूक करताना भेंडीची विशेष काळजी घ्यावी. एकमेकांवर आदळून खराब होऊ नये म्हणून भेंडीसाठी विशिष्ट प्रकारची बास्केट किंवा क्रेट वापरावा. जेणेकरून फळांचे वजन खालील भेंडीवर पडणार नाही. भेंडीचे ग्रेडिंग फळांचा आकार, पक्‍वता आणि स्वरूप यावरून करावी.
भेंडी काढणीस तयार झाल्यावर दर दोन ते तीन दिवसांनी तोडणी करावी लागते.

एका पिकाच्या अशा 15 ते 16 तोडण्या होतात; परंतु भेंडी काढण्यासाठी बरेचदा मजूर नाखुश असतात. कारण भेंडीच्या देठावर एकप्रकारची लव असते. भेंडी काढताना त्यामुळे तळहात किंवा बोटांना इजा होऊ शकते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने कृषियंत्र आणि शक्‍ती योजनेमार्फत भेंडी काढण्यासाठी कात्री विकसित केली आहे. तिचा उपयोग केल्यास भेंडी काढताना हातांना त्रास होत नाही. एका मजुराद्वारे दिवसाला 50 ते 60 किलो भेंडी सहजपणे काढता येते. त्यामुळे भेंडी काढणावळीचा खर्चही कमी येतो आणि नफा वाढतो.

– सतीश जाधव

Back to top button